आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोरा हवा मला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळकर आवाजात अन्वीने समजावलं, ‘बाबा, नोरा दुकानात नाही मिळत.’ मला काहीच कळेना, ‘बरं ठीक आहे, जिथे मिळतं ते दिसलं की सांग. आपण घेऊ.’
 
अन्वीसोबत खाली पार्कमध्ये निघालो होतो. एक मुलगा रिमोट कंट्रोलचे विमान उडवत होता. अन्वीला गाड्या, हेलिकॉप्टर वगैरे कोणतीच खेळणी आवडत नाहीत. अगदी टिपिकल म्हणजे बाहुल्या, आर्ट-क्राफ्ट, साॅफ्ट टॉइज अशाच गोष्टी आवडतात. त्या विमानाकडे बोट दाखवत अन्वीला विचारलं, ‘हे बघ, कसलं भारी आहे. तुला घेऊयात का आपण हे?’
नाक मुरडत अन्वीचं उत्तर आलं, ‘मला नाही आवडत असलं काही.’
मी जास्त आग्रह न करता, हातातल्या फोनमध्ये लक्ष घालत विचारलं, ‘तुला मुलग्यांचं काहीच कसं आवडत नाही?’
दहा-वीस सेकंदांनंतर हळू आवाजात उत्तर आले - ‘नोरा’.
मला वाटलं, असेल काही नवीन प्रकारचं खेळणं. जास्त विचार न करता लक्ष फोनमध्येच ठेवून बोललो, ‘हं, घेऊयात. पुढच्या वेळी स्टोअरला गेलो की, मला आठवण कर घ्यायची.’
आधी मोठ्याने खिदळण्याचा आवाज आला, मग खेळकर आवाजात अन्वीने समजावलं, ‘बाबा, नोरा दुकानात नाही मिळत.’ मला काहीच कळेना, पण फोनमध्ये मी इतका गुंतून गेलो होतो की, त्यावर विचारसुद्धा केला नाही. ‘बरं ठीक आहे, जिथे मिळतं ते दिसलं की सांग. आपण घेऊ.’
माझं फोनमधलं लक्ष काढण्यासाठी अन्वी जाग्यावरच थांबली, माझा हात ओढत डोळे चमकावत बोलली,  ‘बाबा, नोरा… नोरा… नोरा...’
फोनमधलं लक्ष काढून तिच्याकडे बघितलं. थोडंसं हसू, थोडासा वैताग असं बेमालूम मिश्रण होतं. विषय संपवायच्या सुरात मी आटोपतं घेतलं. ‘अरे हो, घेऊयात ना तुला नोरा. कसं असतं ते तरी सांग.’
डोक्यावर हात मारून, ‘बाबा, तुला कळत कसं नाही, नोरा… नोरा…’
‘अरे मला खरंच कळत नाही. सोड, जाऊ दे. घेऊ सापडलं की,’ आणि मी पुढे निघालो. अन्वी तिथेच ढिम्म उभी. (अन्वीला अजून राग व्यक्त करता येत नाही. चिडली की डोळ्यातून घळाघळा गंगा-जमुना सुरू होतात.) मी थोडे पुढे जाऊन मागे पाहतो तर अन्वी फतकल घालून तिथेच बसली होती आणि डोळ्यातून धारा लागल्या होत्या. पटकन फोन बंद केला, तिच्या जवळ गेलो.
‘Sorry यार, काय झालं. तू का रडते आहेस? मला खरंच नाही कळत रे ते नोरा.’
‘मी रडत नाही, पाणी आपोआप येतंय. तुला कळत कसं नाही बाबा. नोरा, जो आईकडे आहे तसा नोरा.’
‘आईकडे आहे? अशी कोणती मुलग्यांची गोष्ट जी अन्वीकडे नाही,’ विचार करतच होतो. आणि माझी ट्यूब पेटली. अन्वी रडत होती, पण मला मोठमोठ्याने हसू आलं. अगदी पोट धरून हसायला लागलो.
‘तुला नवरा म्हणायचं आहे का?’
रडणं आवरताना जितकं शक्य होईल तितकं लाजत, ‘हो तेच. नौरा.’
 
postboxpravin@gmail.com