आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोवेव्‍ह घेता का मायक्रोवेव्‍ह?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरीत बदली झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या गावी राहायला जात होतो, त्याचीच तयारी चालू होती. कसं करायचं, काय न्यायचं, काय सोडायचं, इत्यादी.
‘प्रत्येक चर्चेत भाग घेऊन आपलं अमूल्य मत मांडणे आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे’, हे आपले परमकर्तव्य महामहीम अन्वीमॅडम पार पाडायचे चुकत नाहीत.
‘नवीन ठिकाणी त्यांचा मायक्रोवेव्ह आहे त्यामुळे इथला मायक्रोवेव्ह विकून टाकू यात, पंचवीस डॉलरला तरी जाईल,’ हे सिंधूला बोललेले एकच वाक्य संपते न संपते तोच...
‘बाबा, I have an idea.’
न ऐकून फक्त आपला वेळ वाया जाणार हे माहीत असल्याने ‘बोला!’
‘मी एक sign तयार करते आणि आपण माइक्रोवेव्ह घेऊन बसू विकायला.’
‘अरे, असं नाही करता येत आणि आम्हाला अजून खूप कामं आहेत.’
‘बाबा, पण माझी आयडिया नक्की काम करेल.’
जास्त वाद घालायला मला वेळ नव्हता. वेळ मारून न्यायला ‘तुला वाटतंय तर कर’ बोललो आणि बाकीची कामे आवरायला घेतली.
मोजून २० सेकंदांत परत आली. ‘बाबा, मला उचलता येत नाहीये तो, तो खूप जड आहे.’
माझेही डोके चालते कधी कधी.
‘मग त्याचं चित्र काढ.’
चला, दहा तरी मिनिटांची शांती झाली. मायक्रोव्हेव काढणं काही सोप्पं नाही. 
‘कशाला तिला असलं काही सांगतोस,’ या सिंधूच्या माझ्यावरील अविश्वासधारक प्रश्नाला ‘अरे, ती त्यात बिझी राहील, आपण बाकी कामे आवरू या,’ उत्तर दिले.
दहा मिनिटे झाली. वीस झाली. अर्धा तास संपत आला तरी अन्वीची चाहूल नाही तशी सिंधूला शंका आली. घरात अन्वीला शोधले पण सापडली नाही.
दरवाजा उघडून बाहेर कॉरिडॉरमध्ये पाहायला गेली तर मजल्यावरच्या तिसऱ्या घराच्या दारात उभी राहून त्यांच्याशी काही बोलत होती आणि त्यासुद्धा हसत अन्वीला काहीतरी सांगत होत्या. तर दुसऱ्या बाजूच्या एक शेजारीण हातात काही घेऊन अन्वीला ते देण्यासाठी हाक मारत होत्या.
जवळ जाऊन पाहिले तर...
पिगी बँकला मायक्रोवेव्हचं चित्र चिकटवलेलं आणि ते दाखवून घराघरात जाऊन सेल्सगर्ल अन्वीमॅडम मायक्रोव्हेव विकत होत्या, २५ सेंट्सला (१०० सेंटचा एक डॉलर असतो.) 
सगळे शेजारी हसून खुश होऊन तिच्या पिगीबँकेत पैसे टाकत होते. 
(त्याआधी आमचं शिलाई मशीन विकायचं का यावर पण बोलणे झाले होते.)
एका घरात ‘मायक्रोवेव्ह नक्को आम्हाला, आमच्याकडे आहे,’ हे उत्तर आल्यावर 
‘Then do you want sewing machine?’
‘But I don’t know how to use it.’ 
‘कोई गल नहीं’च्या अविर्भावात, ‘Don’t worry, I have all the instructions,’ असाही पटवायचा प्रयत्न झाला होता!
सिंधूला एकंदर तो नाट्यप्रयोग पाहून लाजल्यासारखं झालं. मला जाम हसू येत होतं. घरात आल्यावर मी मस्त पाठ थोपटली तिची.
 
- प्रवीण क्षीरसागर, न्यूयाॅर्क
postboxpravin@gmail.com
बातम्या आणखी आहेत...