आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लता एक ध्‍यासपर्व!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायनकलेविषयी अढळ श्रद्धा आणि निष्ठा ही लता मंगेशकरांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेतच. पण सतत शिकण्याची ऊर्मी, नवतेबद्दलचं कुतूहल आणि खोलवर जिज्ञासा या गुणांमुळे त्यांनी संस्कृत-उर्दूसारख्या परस्परभिन्न भाषांतील सौंदर्यस्थळंही आत्मसात करून गायकीला पूर्णत्व दिले आहे... 

 

भारतीय चार गोष्टींवर जगतात, असे म्हटले जाते. यातील तीन म्हणजे अन्न, पाणी, हवा आणि चौथी म्हणजे, लता मंगेशकरांचे सूर! आनंद, दुःख, विरह, भक्तिभाव, प्रार्थना अशा कोणत्याही मूडमध्ये आपण असलो, तरी त्या-त्या मूडमध्ये लतादीदींचे स्वर आपल्या मनातील भावनांना आधार देत राहतात. सारे आसमंत व्यापून टाकणारा हा स्वर्गीय आवाज, म्हणजे दैवी चमत्कारच मानावा लागतो. 


अर्थात दीदींचा आवाज केवळ दैवी देणगी आहे, असे मानणे योग्य होणार नाही. कारण, त्यांचे वडील संगीतरत्न मा. दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा आणि शिकवण, गुरूकडून मिळवलेले ज्ञान, प्रचंड वाचन, सतत शिकण्याची वृत्ती आणि सर्वोत्कृष्ट जे आहे, ते सादर करण्याची जिद्द या गुणांमुळेच त्या खऱ्या अर्थाने स्वरसम्राज्ञी बनल्या, असे म्हणावे लागेल. २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर येथे जन्मलेली ही मराठमोळी मुलगी खान्देशातील थाळनेर या छोट्या गावात, सांगलीत, पुण्यात आणि मुंबईत वाढली, स्थिरावली. संगीत क्षेत्रात सम्राज्ञीपदी पोहोचली. मराठी तर तिची मातृभाषा, पण हिंदी-संस्कृत-उर्दू या भाषांवरची तिची पकड भल्याभल्यांना थक्क करून गेली. 


लतादीदींचे वडील मा. दीनानाथ यांचा रियाज पहाटेच सुरू व्हायचा. त्याआधी ‘हरिविजय’ अथवा तत्सम धार्मिक ग्रंथांचे पठण, ते मोठ्या सुरात करायचे. लतादीदी व त्यांच्या चारही भावंडांची पहाट हे सुस्पष्ट स्वर, मंत्रांचा स्पष्ट उच्चार ऐकतच व्हायची. पुण्यात राजीवडेकरांच्या चाळीत मंगेशकर कुटुंबीयांचा मुक्काम असताना शेजारीच राहणाऱ्या आर्यसमाजी पं. शर्मा यांच्याकडे ती पाचही भावंडं भल्या सकाळी जाऊन संस्कृत शिकायची. संस्कृत अध्ययनाने वाणी शुद्ध होते, हा मा. दीनानाथांचा दृढ विश्वास होता. त्यामुळेच त्या पाचही भावंडांना पं. शर्मा यांनी शिकलेले संस्कृत, मंत्र, गायत्री मंत्र अशा साऱ्यांचा पुढे आयुष्यभर उपयोग होत राहिला. पुण्यात मा. दीनानाथांनी घर घेतल्यानंतर वास्तुशांतीवेळी त्या सर्व लहानग्या भावंडांना मंत्रपठण करण्यास बसवले. त्यांचे अस्खलित मंत्रोच्चार ऐकून दीनानाथ व माई मंगेशकर धन्य झाल्या. 

 
सन १९४२ मध्ये मा. दीनानाथांचे पुण्यात अकाली निधन झाले, तेव्हा लताचे वय अवघ्या १३ वर्षांचे होते. मा. दीनानाथांच्या सावलीतून सारे घर जणू उन्हात आले, मात्र श्रीमती माईंनी या भावंडांवर मायेचे छत्र धरले, तर श्रीमती माईंच्या निधनानंतर लतादीदींनी चारही भावंडांवर प्रेमाचे छत्र धरले. ही समज लहान वयातच त्यांना आली हे विलक्षण आहे. परिस्थितीची जाणीव ठेवून बालवयातच त्या काम करू लागल्या. त्यांची पहिली पसंती अर्थातच चित्रपटाची होती. नवयुग पिक्चर्सच्या ‘पहिली मंगळागौर’ हा चित्रपट पुण्यात मिनर्व्हा थिएटरमध्ये ६ मार्च १९४३ रोजी प्रदर्शित झाला. त्यामध्ये १४ वर्षांच्या लताची भूमिका होती. मात्र, मा. विनायकांच्या अकाली निधनानंतर चित्रपटाऐवजी गायन हेच क्षेत्र करिअर म्हणून त्यांनी स्वीकारले. 


त्या काळात शमशाद बेगम, नूरजहाँ, सुरय्या अशा गायिकांचे वर्चस्व होते. दीदींच्या गळ्यात जणू गंधार होता. वडिलांची शिकवणही होती. पण अधिक गरज होती, उत्तम हिंदी व उर्दूवर प्रभुत्व मिळवण्याची. वास्तविक वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून वडिलांकडून ऐकलेल्या, अनेक अवघड रागांतील चिजाही लहानगी लता लीलया म्हणायची, पण आता चित्रपट संगीत स्पर्धेत टिकण्यासाठी हिंदी व उर्दूची चांगली जोड देणे, गरजेचे होते. तेव्हा मुंबईत त्यांनी अमान अली खाँ भेंडीबाजारवाले यांचा गंडा बांधून शिष्यत्व पत्करले. पुढे ते फाळणीनंतर पाकिस्तानात गेल्यावर अमानत अली खाँ यांच्याकडे शिक्षण घेण्यास त्यांनी सुरुवात केली. मात्र, त्यांचे १९५१ मध्ये निधन झाले. या काळात दीदींनी अगदी तरुण वयातच हिंदी आणि उर्दू शब्दांची फेक जिद्दीने अभ्यासली आणि उर्दू शब्दातील व उच्चारातील खाचाखोचा पूर्णतः जाणून घेतल्या. या जोडीलाच मजरुह सुलतान पुरी, साहीर लुधियानवी, पं.नरेंद्र शर्मा अशा असंख्य गीतकारांशी संवाद साधत अगदी गप्पांच्या ओघातही त्यांनी हिंदी व उर्दूचे बारकावे टिपले. सतत त्यांची ही जिज्ञासू वृत्ती त्यांना परिपूर्ण बनवत गेली. कालौघात यशाच्या शिखरावर असतानाही त्यांनी सारे यश संयमाने स्वीकारले. अविचल राहण्याचे सामर्थ्यच त्यांनी कमावले. गातांना हातवारे अथवा चेहऱ्यावरील भाव यावर कसोशीने नियंत्रण ठेवण्याचा निर्धार त्यांनी वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीला १९४३ मध्ये कोल्हापूर येथील पॅलेस थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी केला. त्यामध्ये आजपावेतो, तसूभर ही फरक पडलेला नाही. 


लतादीदींच्या गगनाला गवसणी घालणाऱ्या यशाचे रहस्य काय? असा प्रश्न मनात येतो तेव्हा ध्यानात येते की, त्यांच्या आवाजासारखा दर्जा व आवाका अन्य कोणत्याही गायिकेपाशी नाही. त्यांचे पाठांतर वाखाणण्यासारखे आहे. कोणत्याही भाषेत गाणं गाताना त्यातील भावना अचूकपणे व्यक्त होईल आणि शब्दफेक बिनचूक होईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यासाठी त्या त्या भाषेतील तज्ञ मंडळींकडून ते शब्द अचूक जाणून घेण्यास त्या प्रयत्न करतात. ही सारी वैशिष्ट्ये त्यांच्या कनिष्ठ भगिनी व ज्येष्ठ पार्श्वगायिका श्रीमती उषा मंगेशकर यांनी ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंकात लिहिलेल्या लेखातही नमूद केली आहेत. 


उषाताईंनी पुढे म्हटले आहे की, लतादीदीच्या आवाजाची रेंज श्रेष्ठ दर्जाची आहे. त्याचप्रमाणे त्यांचे श्वासावर प्रचंड नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही गाण्यात त्यांचा श्वास तुम्हाला ऐकू येत नाही. ही देणगी त्यांना मा. दीनानाथांकडून मिळालेली आहे. कंटाळा शब्द त्यांच्या शब्द कोशातच नाही. 


सुमारे साडेसहा हजारहून अधिक गाण्यांमधून संगीतप्रेमींच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या लतादीदींच्या दृष्टीने मराठी, हिंदीच काय, पण संस्कृत, उर्दू, बंगाली, पंजाबी अशा कोणत्याही भाषांतील गाणी लीलया सादर करणे त्यांना सहज शक्य झाले आहे. 


अत्तराच्या सुगंधाप्रमाणेच लतादीदींचा स्वरसुगंध जगभर दरवळत राहिला आहे. हा सुगंध असाच दरवळत राहो, आणि आपण दीर्घायुषी होवो, हीच कोट्यवधी रसिकांच्या वतीने प्रार्थना! 


- प्रवीण प्र. वाळिंबे 
(लेखक ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंकाचे संपादक आहेत. संपर्क : ९८२२४५४२३४ ) 

बातम्या आणखी आहेत...