Home »Magazine »Madhurima» Preeti O Writes About Conflict Between Superwoman And Supermom

सुपरवुमन की सुपरआई?

बालकांच्या पहिल्या एक ते सव्वा वर्षे वयाच्या वाढीच्या काळात शक्य असेल तर स्त्रियांनी पूर्णपणे आई व्हावे.

प्रीती ओ. पुणे | Sep 26, 2017, 03:00 AM IST

  • सुपरवुमन की सुपरआई?
बालकांच्या पहिल्या एक ते सव्वा वर्षे वयाच्या वाढीच्या काळात शक्य असेल तर स्त्रियांनी पूर्णपणे आई व्हावे. मुलांच्या दोन-अडीच वर्षांनंतर त्यालाही बाहेरचं जग खुणावू लागतं त्यामळे आईनंही सुपरमॉमच्या भमिकेतून हळूहळू बाहेर पडावं. इथून पुढे अर्थातच बाबानंही सुपरबाबा व्हायलाच हवं...
‘सुपरवुमन की सुपरआई’? या प्रश्नाला सुरुवात होऊन खूप काळ लोटला नाहीये. हा प्रश्न अगदी अलीकडचा आहे. कारण औद्योगिक क्रांतीपूर्वी आई ही फक्त सुपरआईच होती. तिला सुपरवुमन म्हणून सिद्ध करायची संधीही नव्हती आणि दबावही नव्हता. कारण तिची पुरुषांशी स्पर्धा नव्हती. खांद्याला खांदा लावून एकाच परिमाणाने सगळ्यांना मोजण्याची सक्ती नव्हती. याचा अर्थ आधी जे काही होतं ते भारी आणि आता आहे ते बिघडलेलं, असं अजिबात नाही. खरं तर, वेगवेगळ्या गोष्टींचा रेटा इतका जबरदस्त असतो की, कुठल्याही एका घडवून आणलेल्या बदलातून इतर किती बदल जन्माला येतील, हे आधी सांगणं भविष्यकारालाही अवघड असेल बहुधा!
स्त्रीशिक्षण, स्त्रीवाद या गोष्टींनी मला घडवलं खरं. पण आई झाल्यावर माझ्यातल्या जैविक आईने मला ‘आई होण्यावर’ भर द्यायला लावला. समोर दिसणारं आपलं गोडगोजिरं बाळ सोडून जाणं मलाच जमणार नाही, हे आई होण्याआधी मला माहीत नव्हतं. त्यामुळे माझ्या बाळासाठी मी माझ्या करिअरचा ‘त्यागबिग’ काही केला नाही. बाळासोबत असणं ही जशी बाळाची गरज होती तशीच ती माझी गरज होती.
अर्थात, प्रत्येक आई वेगळी, तिच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा वेगळ्या, तिला समाधान देणाऱ्या गोष्टी निराळ्या, इतरांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा निराळ्या, आणि या सामाजिक, कौटुंबिक अपेक्षांकडे ही पहिलटकरीण कसं बघते हेही निराळं. ‘नेचर आणि नर्चर’ याचं फलित असलेले आपण प्रत्येकजण एकमेवाद्वितीय असतो. त्यामुळे प्रत्येक आईची गरज निरनिराळी. पण असं असलं तरी सर्वसाधारपणे बाळांची गरज काय असते?
जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान करावे. याचा अर्थ असा आहे की, पाणीसुद्धा बाळाच्या तोंडात घालू नये. फक्त आईचे दूध आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं! हे करायचे असेल तर आई आणि बाळ नेहमीच आजूबाजूला हवेत. आईच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी तिला जो काही मोकळा वेळ हवा आहे तो घरातच, बाळ इतरांकडे सोपवून आजूबाजूलाच हाकेच्या अंतरात राहून मिळायला हवा आहे. आपल्याकडे तर तीन आणि सहा महिन्यांच्या भरपगारी बाळंतपणाच्या रजेची गोष्ट चालू आहे. कित्येकदा प्रसूतीपूर्वी काही कारणाने सुट्टी घ्यावी लागते. तेव्हा प्रसूतीनंतर पूर्ण सहा महिने मिळतातच असे नाही. ज्या स्त्रियांना कामाच्या ओढीने कामासाठी परत जावेसे वाटते ती गोष्ट अलाहिदा. पण अशाही स्त्रिया असतीलच ना ज्यांना हीच सुट्टी अधिक असेल तर नक्की घरी राहायला आवडेल. म्हणजे आर्थिक नुकसान होईल किंवा आर्थिक गरज आहे म्हणून या आयांना कामाला परत जावे लागते. त्यामुळे स्तनपानाचे आणि पर्यायाने आईचे आणि बाळाचे व्हायचे ते हाल होतातच. आणि हे फक्त संघटित क्षेत्रातल्या स्त्रियांचं झालं. असंघटित क्षेत्रातल्या महिला कामगारांचे आणि त्यांच्या बाळांचे हाल तर कुत्रंही खात नाही. पैशाची अखंड चणचण, शिक्षणाचा अभाव, स्थिर कामाचा अभाव, कामातली कुचंबणा, न संपणारी यादी. या सगळ्याचा माझा अनुभवही नाही, पण आजूबाजूला जे दिसतं त्यावरून बोलते आहे.
पुढे जाऊन जागतिक आरोग्य संघटना म्हणते की, कमीत कमी दोन वर्षांपर्यंत स्तनपान करत राहायला हवे (अर्थातच इतर अन्नपदार्थांसह), जे आई आणि बाळ दोघांच्याही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगलं ठरतं. त्यापुढेही ‘स्तनपान बंद करणं गरजेचं आहे’ असं कुठेही म्हटलेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे सध्या अगदी स्त्रीरोगतज्ज्ञ, लहान मुलांचे डाॅक्टर, किंवा आपलीच मागची पिढी किंवा समवयस्क सांगतात तसं बळजबरीने ते बंद करणं अजिबातच गरजेचं नसतं. ते हळूहळू कमी होत जाणारच असतं. शरीराने वाढणाऱ्या बाळाला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खाण्यायोग्य पदार्थांबद्दल एक जैविक ओढ असतेच. अर्थात, यातही प्रत्येक मूल वेगळं हे मान्य करावं लागतंच. जसं स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून स्त्रीने किती काळ स्तनपान करत राहावं हा स्त्रीचा निर्णय असावा, असं म्हणता येईल. तसंच, मोठ्यांवर पूर्णपणे अवलंबून असणाऱ्या बाळांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून बाळाने किती काळ स्तनपान करावे हे बाळाने ठरवावे, असं म्हणता येईल का? की “बाळाला काय कळतंय” असं म्हणून बाळाचे सगळेच निर्णय आपणच घेऊन टाकणार?
सुपरवुमन की सुपरआई, यामध्ये तर माझा काटा सरळसोटपणे सुपरआईकडे झुकलेला आहे. आई म्हणून घरात असल्यामुळे घर सांभाळण्याची जबाबदारी आपोआपच आयांवर येऊन पडते. कारण पूर्वी शिकारीला बाहेर पडणारा बाबा आता कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी निभावत असतो. मूल आणि घर सांभाळणं आणि घराबाहेर पडून कुटुंबासाठी काहीतरी मिळवणं, या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे मात्र अगदी सहजपणे विसरलं जातं. पैसे मिळवणाऱ्याला सर्व काही अधिक मिळतं, आणि वेळ आणि श्रम देणाऱ्या स्त्रीला मात्र काहीच मिळत नाही अशी परिस्थिती अनेक घरांमध्ये असते. अशा वेळी आपणही बाहेर पडावं, पुरुषाप्रमाणे काम करून पैसे मिळवावे, आणि त्याच्याप्रमाणेच मानमरातब, निर्णय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य मिळवावं असं जर कुणाच्या मनात आलं तर त्यात चूक नाही.
एकदा एका संवादामध्ये एक बाई माझा स्वतंत्र बाणा पाहून म्हणाल्या, “काहीच करत नाहीस तर एवढं, ऑफिसर असतीस तर काय केलं असतंस बाई!” मला हसावं का रडावं कळेना! ‘काहीच करत नाही?’ खरंच? घरी राहून बाळाला सांभाळणारी स्त्री काहीच करत नसते? ती जे करत असते ते पैशात मोजता येत नाही म्हणून त्याला काहीच किंमत द्यायची नाही हा कुठला न्याय! हे लिहिता लिहिताच मनात पाळणाघरे उमटली आणि पाळणाघर आणि आई यांची तुलना होऊ शकेल का? समाजाने करावी का? असे पुढचे प्रश्नही लगोलग आले.
‘एक मूल वाढवायला अख्खं गाव लागतं’, अशी एक आफ्रिकन म्हण आहे. पण पोरक्या पोराला आणि आई असलेल्या पोराला गावही वेगवेगळी वागणूक देतं हे विसरून चालणार नाही.
स्त्री होणं आपल्या हातात नव्हतं, आई होणं काही प्रमाणात तरी होतं. बाळाच्या आईकडूनच्या असलेल्या गरजा पूर्ण करता येणं अवघड वाटत असेल, कुठल्याही कारणास्तव, तरी आई होण्याबद्दल नीट विचारपूर्वकच निर्णय घ्यायला हवा. आईपण हे नोकरी धंद्यांसारखं पार्टटाइम वगैरे करता येत नाही. तिथे तीनही शिफ्ट लागलेल्या असतात, त्यात कधीच सुट्टी घेता येत नाही आणि वर पगार नाही तो नाहीच!
याचा अर्थ हे पर्याय हा किंवा तो असा आहे का? तर नाही. अडीच-तीन वर्षांच्या मुलाला बाहेरचं जग खुणावत असतं. त्याला आई हवी असते पण त्याला आईपासून दूर जाऊन नवीन गोष्टी करून परत आईकडे यायचं असतं. ह्या वयाला, हळूहळू का होईना, आई नक्कीच बाहेर पडू शकते आणि स्वतःच्या आनंदासाठी, समाजाला उन्नत करण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी सुपरवुमनच्या वाटेने जायला लागू शकते. फक्त या वाटेवर चालणाऱ्या स्त्रियांसोबत असलेल्या पुरुषांनीही मग ‘सुपरमॅन’ व्हायची गरज असते हे विसरून चालणार नाही.
jonathan.preet@gmail.com

Next Article

Recommended