आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपाचा किस्सा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुण वयातील शारीरिक संबंधांच्या आकर्षणातून काय परिस्थिती ओढवू शकते, याची जाणीव मुलांना करून द्यायलाच हवी आहे, प्रेम म्हणजे काय हे समजावून सांगायलाच हवंय, असं सांगणारा एका संवेदनशील सामाजिक कार्यकर्तीचा हा लेख.

एक दिवस रूपा माझ्या समोर आली. अशक्त, नाकावर चष्मा, उदास, नैराश्याने ग्रासलेली, चिंतेने व्याकूळ. तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ती धडपडत होती, आणि माझे नाव तिला कळले. मी ऑफिसमध्ये असताना ती मला शोधत आली. एक महिला कॉन्स्टेबल म्हणाली की, ‘मॅडम तिला (रूपाला) तुमच्याशी बोलायचेय. फक्त तुमच्याशीच.’ मी म्हटले, ‘बोलव तिला.’ तिच्याशी बोलायला सुरुवात केली तशी ती रडू लागली. आणि लाल होऊन ती संतापाने मला म्हणू लागली, ‘मॅडम, माझा वापर झालाय. त्या मुलाने मला बाद केलंय आणि आता तो माझ्याशी लग्न करत नाही म्हणतोय. त्याच्या जातीच्या मुलीशी त्याच्या घरच्यांनी आताच साखरपुडा केलाय. माझ्याशी त्याने गेल्या दोन-अडीच वर्षांपासून संबंध ठेवले होते. आता त्याने माझ्याशी लग्न केलंच पाहिजे. नाही केल्यास मी आत्महत्या करीन. मला न्याय पाहिजे. तुम्ही माझ्या बाजूने उभे राहा.’ मला न्याय पाहिजे, एवढीच तिची घाई होती.

मी तिला शांत केले. तिच्याशी गप्पा मारल्या, तेव्हा तिने मला जे काही सांगितले ते असे की, रूपाचे वडील बऱ्याच दिवसांपासून घर सोडून निघून गेलेले आहेत. घरात आई, एक लहान भाऊ, जे परगावी असतात. घरकाम करून आई घरातल्या गरजा भागवते. रूपाला चार आत्या. चांगल्या घरी राहतात. रूपा शहरात काही वर्षं आत्या व आजीसोबत राहत होती; पण आईविना पोर, घरच्यांनी तिला घरकामातच जुंपली. तिचं शिक्षण नीट झालंच नाही. कशीबशी बारावी परीक्षा दिली. दोन विषयांत नापास झाली. आईपासून रूपा दूर राहायची, आईचं प्रेम माहितीच नाही.

आत्या, आजी तिच्याकडून घरातील कामे करून घेत. या काळात तिच्यात वयाच्या, परजातीच्या मुलाशी तिची ओळख झाली. त्यातून प्रेम जमले. भेट होऊ लागली, एकांतात रमू लागले. मुलगासुद्धा न शिकलेला, कसेबसे पैसा जमा करे. त्यातून तो तिला शरीरसंबंधाची मागणी करू लागला. मग चोरून ती त्याच्यासोबत जवळच्या गावातील लॉजमध्ये जाऊ लागली आणि त्यांना त्या संबंधांची मजा वाटू लागली. त्यातच ते रमत होते. गेली अडीच वर्षे हा उद्योग चालला होता.

मी रूपाला म्हटले, ‘अगं, त्यातून तू गरोदर राहिली असतीस म्हणजे?’ ती म्हणाली, ‘एकदा राहिले ना. मग गर्भपात केला.’ ‘खर्च पैसा कुणी दिला?’ ‘त्यानेच. त्याचा मित्र होता माझ्यासोबत दवाखान्यात.’ मला ऐकून वाईट वाटले. मन सुन्न होत होतं. घरची गरिबी, आर्थिक बाजू दुबळी. आईवडिलांना काही माहिती नाही. ही मात्र त्याच्या प्रेमात, तो लग्न करतो म्हणून दिलेल्या वचनात अडकून भावनिक होऊन रमत होती.

तिचे प्रकरण आत्यांना कळले. आजी व आत्याने घराबाहेर हाकलून दिले. मग काय ती राजरोसपणे त्याच्यासोबत वाट्टेल तेथे जाऊन राहू लागली आणि गुरफटत गेली. आणि आता अचानक त्याच्या घरच्यांनी त्याचा साखरपुडा जातीतल्याच मुलीशी करून दिला. तो तिच्याकडे आला, तिला शिव्या दिल्या, ‘तुझी लायकी काय ते मी पाहिले. तू माझ्या लायकीची नाहीस, तुझ्यावर थुंकतो मी. जा मर काळं कर तोंड. पुन्हा माझ्याकडे येशील तर नरडं दाबीन, कुठे फेकून देईन सांगता येणार नाही.’ आता तर तो ती एकटी आहे हे पाहून तिच्यामागे गुंड मुलं पाठवत होता.

‘मॅडम, पोलिस लोक मला मदत करत नाहीत. मला त्याच्याशीच लग्न करायचेय, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. माझं सर्वस्व त्याला दिलंय. आता तो पळून जाऊ पाहतोय. माझा तिरस्कार करतोय. आई मला घरात घेत नाहीये. माझे कोणीच नाही. मी जगू कशी, त्याला सोडून शक्य नाही जगण. पोलिस चौकीत त्या मुलाला बोलवायला धजावत नाहीत. तो गुंड नगरसेवक घेऊन फिरतोय. पोलिस चौकीत गुन्हा दाखलच करून घेत नाहीत. मला न्याय पाहिजे मॅडम, मी नाही तर मरणार आहे बघा.’

मरणार म्हटल्यावर मी चिडले. रागावले. तिला गप्प केले. मरण्याचे विचारच मनात आणायचे नाहीत. ‘मला शक्य होईल तेवढी मी तुला मदत करीन,’ असे आश्वासन दिले आणि तिला उद्या यायला सांगितले. पण ती गेल्यापासून माझ मन सुन्न झाले होते. सतत रूपाच नजरेसमोर येत होती. काय हे? मी विचार केला की, मुलांना संस्काराचा भाग, नैतिकता काही नाहीच का? शील जपणे म्हणजे काय? आज मी पाहते की, वयात आल्याआल्या मुलाला मुलीचे शरीर पाहिजे आणि मुलींनाही पुरुषदेहाचे आकर्षण आहे. त्यासाठी वाट्टेल ते करताहेत. आजकाल मुलेमुली घरच्यांना फसवणे, पैसा उपटणे, खोटे बोलणे, एकांतात भेटणे, नुसतेच प्रेम नाही, थेट शरीरसंबंधापर्यंत पोहोचत आहेत.

कायद्याने लग्नाअगोदर मैत्रीत एकत्र राहण्याची परवानगी दिलेलीच आहे. म्हणजे एकीकडे श्रीमंत, दुसरीकडे गरीब अशा परिस्थितीतील घरातील दुर्लक्षित मुलेमुली नेमके हेच पाऊल उचलतात. नशेचे पदार्थ घेणे, रेव्ह पार्ट्या, एकांतात रमणे, ट्रिपला जाणे या सगळ्यांतून शरीरसंबंध आम झालेले आहेत. कुणालाही घाबरत नाहीत आणि मग घरी कळले तर. एकमेकांना धोका देणे, विष पिणे, नैराश्य, आत्महत्या करणारी माता, गर्भपाताचे प्रमाण समाजात वाढताना दिसून येत आहे. या सगळ्यांचा शेवट काय? याचा विचार करता डोके दुखू लागतेय. पण रूपाच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचेय. ते कसे या विचारात मी आहे. रूपासारख्या अनेक मुली आहेत, मुलंही आहेत. ते का एकांत शोधतात, वाट का चुकतात, प्रेमाचा चुकीचा अर्थ का घेतात, त्याग, बलिदान, आस्था सगळं काही मुलांपासून दूर जाऊ लागलेय. हेच का बदलते जग? अशीच पुढची पिढी असणार आहे का? याची विचार करतेय.
(shrirampreeti27@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...