आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅलेस्टिनीयन गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुबारक अवाद पाच वर्षांचे असताना १९४८च्या इस्रायलच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यू सैनिकांकडून त्यांच्या वडलांची हत्या करण्यात आली. परंतु अवाद यांच्या आईने त्यांना अहिंसेची शिकवण दिली. ती अवादला सांगायची, ‘तुझ्या वडलांना मारणार्‍या व्यक्तीला हे माहीत नव्हते, की त्याने मला विधवा केले आहे व माझ्या मुलांना अनाथ. मला आता माझ्या सात मुलांना वाढवायचे आहे. पण तू कधीही तुझ्या वडलांच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न करू नकोस. कोणालाही मारू नकोस वा कोणाचेही जीवन उद्ध्वस्त करू नकोस.’ अवाद सांगतात, ‘आईची ही शिकवण आम्ही सर्व भावंडांनी कसोशीने आत्मसात केली. पुढे आईने मला व माझ्या भावांना अनाथालयात दाखल केले. अनाथालयातले दिवस माझ्यासाठी खूप भयानक होते. पाच-सहा वर्षे वयाच्या त्या अल्लड वयात मला अर्धपोटी राहावे लागत होते. पण तरीही माझ्या आईच्या सांगण्यानुसार मी अहिंसेच्या मार्गाचाच अवलंब करत राहिलो. केवळ मीच नव्हे तर माझ्या इतर भावांनीही कायम अहिंसेचाच पुरस्कार केला.’

ग्रीक कॅथॉलिक पंथीय अवाद यांच्यावर क्वाकर आणि मेनोनाइट मिशनरींचा प्रभाव पडला. वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजे १९६०मध्ये जेरुसलेम सोडून ते ओहियोमधील बफेलो युनिव्हर्सिटीमध्ये दाखल झाले. तेथे त्यांनी समाजकार्य आिण समाजशास्त्र या विषयांमध्ये बीए केले. त्यानंतर लोरेट्टो, पेन्सिल्व्हेनिया येथील सेंट फ्रान्सिस युनिव्हर्सिटीमधून त्यांनी मास्टर केले. सेंट लुईस युनिव्हर्सिटीमधून त्यांनी सायकॉलॉजी या विषयात पीएच. डी. केले. ओहियोमध्ये वास्तव्यास असताना अवाद यांनी चिथावणीमुळे गुन्हेगारीकडे वळलेल्या भरकटलेल्या तरुणांसाठी देशव्यापी कार्यक्रम आखला.
हमास आणि इस्रायलमधील बॉम्ब आणि रॉकेट्सच्या धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर आज वयाच्या ७१व्या वर्षी काहीसे स्थूल आणि पूर्णपणे पांढरे केस असलेले अवाद जेव्हा टीव्हीवर झळकतात, तेव्हा ते अहिंसा चळवळ आपल्या मातृभूमीत यशस्वी करण्याबाबत विश्वास व्यक्त करतात. ‘मी खूप आशावादी आहे. आपण अतिशय आशावादी व्यक्तीशी बोलत आहात! जवळजवळ १०० वर्षे जर्मनी आणि फ्रान्स एकमेकांवर हिंसक हल्ले करत होते, पण आता ते एकमेकांचे मित्र आहेत.’

मुबारक अवाद हे अहिंसेचा पुरस्कार करणारे पॅलेस्टिनीयन आहेत. त्यांना ‘पॅलेस्टिनीयन गांधी’ किंवा ‘पॅलेस्टिनीयन मार्टिन ल्युथर किंग ज्युनि.’ म्हणून ओळखले जाते. अवाद सध्या वॉशिंग्टन-डीसीमधील अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये ‘अहिंसे’चे तत्त्वज्ञान आणि प्रात्यक्षिकाचे धडे देतात; जे त्यांच्या जेरुसलेम येथील घरापासून फार दूर आहे. १९८८मध्ये त्यांना इस्रायलबाहेर हाकलण्यात आले. तरीही ‘टुरिस्ट व्हिसा’ घेऊन शक्य होईल तेव्हा त्यांनी इस्रायलला भेट दिली. पॅलेस्टिनीयन सेंटरमध्ये अहिंसा चळवळीचे धडे दिले. कर भरू नका, असे ते आपल्या व्याख्यानांमध्ये सांगत. ते म्हणतात की, भारतीयांनी ज्याप्रमाणे गांधीजींच्या ब्रिटिशांविरुद्धच्या स्वदेशी चळवळीला पाठिंबा दिला, त्याप्रमाणे स्वदेशी वस्तूच वापरा. शांततेच्या मार्गाने निदर्शने करा. ज्यू लोकांनी कब्जा केलेल्या भूमीवर शांततेचे प्रतीक असलेली ऑलिव्हची झाडे लावा. १९६०मध्ये अमेरिकेमध्ये नागरी हक्कांसाठी निदर्शकांनी ज्याप्रमाणे बैठक मारून शांतपणे निदर्शने केली, त्याप्रमाणे तुम्हीदेखील शांतपणे मोर्चा काढा, निषेध करा. पण काहीही झाले तरी शस्त्र हाती घेऊ नका. मारहाण सहन करा. इस्रायलमधील तुरुंग भरून जाऊ दे. अशाप्रकारे त्यांनी अहिंसक मार्गाने आपले कार्य सुरू ठेवले.

इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये शांतता प्रस्थापित होणे, हा खूप लांबचा पल्ला आहे. सध्याच्या गाझामधील धुमश्चक्रीच्या पार्श्वभूमीवर अवाद यांचा आशावाद काहीसा डळमळीत होऊ लागला आहे. ‘इस्रायल गाझा सोडून जाईल. तरीही आपल्याकडे जास्त पॅलेस्टिनीयन गट असतील; शिवाय हमासपेक्षा जास्त सैनिकही! त्यानंतर ते सैनिक रासायनिक वा किरणोत्सारी शस्त्रांकडे वा कदाचित त्यापेक्षाही भयानक मार्गाकडे वळतील. ही जीवघेणी शस्त्रे सहज उपलब्ध होऊ शकतात आणि प्रयोगशाळेत बनविणे सहज शक्य आहे. त्यामुळे माणसे एकमेकांना संपवण्याच्या कामात गढून जातील.’ ही वाक्ये त्यांच्या डळमळलेल्या आशावादाची निदर्शक आहेत. अवाद सांगतात, मरणाची भीती नसलेल्या हजारो पॅलेस्टिनीयन तरुणांना ‘हमास’कडून फूस लावून हिंसेच्या मार्गाला लावले जात आहे. जेव्हा ते माणसांना मरताना बघतात, तेव्हा ते म्हणतात की ते हुतात्मे होत आहेत. ते स्वर्गात देवाच्या हवाली आहेत. ते आमच्यापेक्षा नशीबवान आहेत, कारण ते अगोदरच मेले आहेत. मृत्यूला सामोरे जाण्याचा हा वेडा धार्मिक आणि पवित्र मार्ग आहे. या तरुणांपैकी बहुसंख्य बेकार आहेत, शाळा सोडलेले आहेत वा व्यसनी आहेत. त्यांना असे सांगण्यात आले आहे की, अशा गटांमध्ये सामील झाल्यास त्यांना काही पैसे मिळू शकतात. त्यामुळे शेकडो तरुण इस्लामिक राष्ट्रांच्या दबावाला बळी पडून कोणालाही मारायला तयार आहेत. ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू... जो कोणी त्यांच्या मार्गात येईल त्याला. हे खूप दु:खद आहे.

एवढे बोलून अवाद उसासा टाकतात, तेव्हा टेलिव्हीजनवर गाझामधील कत्तल आणि रॉकेट्सचा वर्षाव सुरूच असतो...
(संदर्भ : दी न्यूजविक, २२ ऑगस्ट २०१४)
mayekarpr@gmail.com