आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकांक्षापुढती जिथे गगन ठेंगणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्यासारखी संपर्काची आधुनिक साधने नव्हती, साहसांसाठी वापरण्यात येणारी साधनेही अत्याधुनिक नव्हती, अशा काळात महिलांनी केलेल्या साहसी प्रवासांच्या या कथा. विशिष्ट ध्यासाने पछाडलेल्या या महिलांना डोंगरदऱ्या, नद्या, आकाश, महासागर, बर्फाळ ध्रुवप्रदेश, रखरखीत वाळवंट काहीच वर्ज्य नाही.
 
ज्या काळात आजच्यासारखी संपर्काची आधुनिक साधने नव्हती, साहसांसाठी वापरण्यात येणारी साधनेही अत्याधुनिक नव्हती, अशा काळात म्हणजे शंभर-दीडशे वर्षांपूर्वीही महिला साऱ्या आव्हानांना तोंड देत साहसी प्रवास करत होत्या. प्रवासातले बरेवाईट अनुभव लिहूनही ठेवत होत्या. अशाच काही धाडसी महिलांच्या साहसांचा परिचय सदर पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाने करून दिला आहे. साहसांचा ध्यास घेतलेल्या या महिलांना डोंगरदऱ्या, नद्या, आकाश, महासागर, बर्फाळ ध्रुवप्रदेश, रखरखीत वाळवंट काहीच वर्ज्य नाही.
 
रॉबिन डेव्हिडसनने आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून ब्रिस्बेन विद्यापीठात जीवशास्त्र व संगीत शिकण्यास सुरुवात केली. ते अर्धवट टाकून ती जपानी भाषेच्या व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासास लागली, पण त्यातही तिचं मन रमेना. अशातच पश्चिम ऑस्ट्रेलियाचं वाळवंट ‘अॅलिस स्प्रिंग ते हिंदी महासागराच्या किनाऱ्यापर्यंत’ ओलांडावं, असं तिच्या मनात आलं. अर्धवेळ नोकरी करून, काही कर्ज काढून, मित्रांच्या व नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीच्या मदतीने रॉबिनने मोहिमेसाठी आवश्यक असलेले सामान व चार उंट खरेदी केले. हे १७०० मैलांचं वाळवंट पार करण्याची मोहीम ८ एप्रिल १९७७ रोजी चार उंट व एक कुत्री यांच्या साहाय्याने तिने सुरू केली. नजर फिरेल तिकडे वाळूचं साम्राज्य, पाण्याचं दुर्भिक्ष्य, अनेक संकटांना तोंड देत, अनेक अडथळे पार करत अतिशय खडतर असा हा प्रवास पूर्ण करून १९५ दिवसांनी रॉबिनने आपले लक्ष्य गाठले. तिचा हा साहसी प्रवास खूप रंजक आहे.
 
मुलाबाळांचे संसार मार्गी लावण्याच्या, नातवंडांमध्ये रमण्याच्या वयात ५१ वर्षीय हेलन थायर एकटीच चुंबकीय उत्तर ध्रुवाच्या मोहिमेवर निघते. ध्रुवीय प्रदेशातील शून्याखाली ४० ते ५० अंश सेल्सियसपर्यंत जाणारे तापमान, गोठवणारी थंडी, पांढऱ्या प्रचंड हिमअस्वलांचा धोका, वेगवान वारे, केवळ बर्फाचं सान्निध्य या सगळ्यात एखाद्या तरुणीच्या उत्साहाने स्वत:ला झोकून देणाऱ्या हेलनचे साहस आपल्याला थक्क करते. हेलनने २७ दिवसांनंतर ३४५ मैलांचा पल्ला पार करून उत्तर ध्रुव गाठला.
 
तिबेट हा बराचसा अपरिचित आणि गूढ प्रदेश. ल्हासा ही त्याची राजधानी. परकियांना येथे प्रवेश नाही. १९५०मध्ये चीनने हा प्रदेश बळकावला असला तरी त्यापूर्वी या गूढ प्रदेशाचं आकर्षण आणि उत्सुकता पाश्चात्त्य साहसवीरांमध्ये प्रचंड होती. ल्हासाबद्दल जाणून घेण्यासाठी, तेथे प्रथम पोहोचण्याची जणू अघोषित स्पर्धाच त्या काळी लागलेली. ल्हासाला पोहोचणारी पहिली युरोपीय फ्रेंच महिला ठरली अलेक्झांड्रा डेव्हिड नील. १९२३मध्ये ती वयाच्या ५५व्या वर्षी ल्हासाला पोहोचली. ल्हासापर्यंतचा तिचा प्रवास, तेथील अनुभव आणि एकूणच तिचं जीवन साहसांनी भारलेलं आहे. या तिच्या मोहिमेबद्दल ‘जिओग्राफिकल सोसायटी ऑफ फ्रान्स’ने सुवर्णपदक देऊन तिचा गौरव केला.
 
१९४९मध्ये अॅन डेव्हीसन आणि तिचा नवरा फ्रँक आपल्या ७० फूट लांबीच्या बोटीतून अटलांटिक महासागर पार करण्याच्या मोहिमेवर निघाले होते. एखाद्या जोडप्याने शीडहोडीने अटलांटिक पार करण्याचा विक्रम त्यांना प्रस्थापित करायचा होता. पण दुर्दैवाने निसर्गाच्या रौद्रभीषण अवताराने फ्रँकचा बळी घेतला. अॅन कशीबशी वाचली. या जबर धक्क्यातून सावरत अॅनने पतीचे स्वप्न पूर्ण करण्याचा चंगच बांधला. १८ मे १९५२ रोजी ती पुन्हा एकटी शीडहोडीने अटलांटिक मोहिमेवर निघाली. बोटीच्या स्वयंचलित सुकाणूमधील बिघाड, वादळाचे तडाखे, धुक्यात सापडून होडी भरकटणे अशा अनेक अडचणींवर मात करत ४५४ दिवसांत अॅनने ही मोहीम फत्ते केली व आपल्या पतीचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले. अटलांटिक महासागर शीडहोडीने पूर्ण करणारी ती पहिली महिला ठरली.
 
प्राणवायूच्या नळकांड्याशिवाय एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातली पहिली महिला ठरलेली अॅलिसन हारग्रेव्हज. काराकोरम पर्वतरांगेतले ‘के-२’ हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर सर करण्याच्या मोहिमेत दोन मुलांची आई असलेल्या ३३ वर्षीय अॅलिसनचा झालेला मृत्यू चटका लावून जातो.

अशा अनेक महिलांच्या साहसकथा या पुस्तकात वाचायला मिळतात. पुस्तकाची भाषाही अतिशय सोपी आणि प्रभावी आहे. एखाद्या विशिष्ट मोहिमेविषयीची मांडणी असली तरी प्रत्येक प्रकरणात स्वतंत्रपणे या साहसी महिलांच्या कार्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आवाका आपल्या ध्यानात येतो. विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन जिवावर उदार होऊन साहसी मोहिमांवर निघालेल्या या महिला नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठराव्या.  
 
साहस हाच ध्यास
लेखक : मिलिंद अामडेकर
प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन्स
मूल्य : रुपये १२५/-
 
 
mayekarpr@gmail.com
बातम्या आणखी आहेत...