ताशी १८० किमी वेगाने ती जणू हवेवर स्वार व्हायची. ‘हार्ले डेविडसन ४८’ चालवणारी, राजस्थान चॅप्टर म्हणजे ड्यून्स हार्ले डेविडसनची पहिली महिला बाइकर वीनू पालीवाल. त्यांच्या १२०० सीसी व २६५ किलो वजनाच्या बाइकचं नाव त्यांनी ठेवलं होतं हाॅग रानी. नाेव्हेंबर २०१५पर्यंत तब्बल १७ हजार किमीचा प्रवास त्यांनी पूर्ण केला होता, एका वर्षात ५० हजार किमी प्रवास करण्याचा त्यांचा मानस होता.
लहानपणापासून बाइकचं वेड असलेल्या वीनू यांनी चाळिशी पार केल्यानंतर हार्ले चालवण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं. त्यांना २०१६ची लेडी आॅफ दि हार्ले निवडण्यात आलं होतं. वीनू एक यशस्वी उद्योजिकाही होत्या. जयपूरमध्ये त्यांचा ‘चाह बार’ नावाचा व्हिक्टोरियन टी लाउंज आहे. त्याचं नावही खूप विचारांती ठेवलं होतं. चाह म्हणजे इच्छा आणि चाह म्हणजे चहा. अशी इच्छा, जी एक स्वप्न बनू शकते, जे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मोकळं अाकाश हवं, ज्या आकाशात वीनू स्वत: मुक्त फिरत होत्या. बिनधास्त वीनूचं व्हाॅट्सअॅपचं अखेरचं स्टेटस होतं - मुझे खुद पर गर्व है, ईश्वर की तहेदिल से शुक्रगुजर हूँ.
एकदा आमच्याशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, ‘बाइक चालवायचं वेड अजमेर सोफिया स्कूलमध्ये असतानाच पार टोकाला गेलेलं होतं. त्या वेळी आमच्या ग्रूपमधली मी एकटीच बाइक चालवणारी मुलगी होते. पण मग लग्नानंतर बाइक चालवणं थांबून गेलं. काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आणि त्यानंतर मी जयपूरला स्थायिक झाले. मला माझ्या जिवावर स्वत:चं अवकाश निर्माण करायचं होतं. त्यात माझ्या आवडीचे रंग भरायचे होते. हार्ले चालवायची इच्छा होती. पतीसोबत बाहेर गेले की, शोरूमवरनं जाताना त्यांना माझी इच्छा बोलून दाखवायचे. पण त्यांना समाज काय म्हणेल याची इतकी चिंता होती की त्यांनी मला माझं स्वप्न जगायची परवानगी दिलीच नाही. जयपूरला आल्यावर एका मित्राबरोबर हार्लेच्या शोरूममध्ये गेले होते, तेव्हा माझ्या या वेडाने पुन्हा उचल खाल्ली. शेवटी मी माॅडेल ४८ विकत घेतलं आणि या हाॅग रानीने माझं स्वप्न पूर्ण केलं. सुरुवातीला दर वीकेंडला तिच्यावरून मी जयपूरच्या आसपास वा दिल्लीपर्यंत जायचे.’ हार्ले ओनर्स ग्रूप म्हणजे हाॅग (Harley Owners’ Group - HOG) सोबतच्या पहिल्या अनुभवाबद्दल त्या म्हणाल्या होत्या, ‘पहिल्यांदा मी जेव्हा हाॅगबरोबर रायडिंगला गेले तेव्हा ग्रूपचे इतर सदस्य खूपच सांभाळून बाइक चालवत होते. त्यांचा १००चा वेग पाहून मी आखडले, अस्वस्थ झाले. शेवटी हिंमत करून त्यांना विचारलंच, तुम्ही नेहमी एवढ्या हळुहळू बाइक चालवता का? उत्तर आलं, माझ्यामुळे घाबरून ते अशी बाइक चालवतायत. मी म्हटलं, पण मी तर १८०च्या वेगात बाइक चालवते. तेव्हा कुठे सगळ्यांनी गाड्या भरधाव सोडल्या. बाइक चालवणं हेही एक माध्यम आहे लोकांना सांगण्याचं की, महिला पुरुषांपेक्षा कोणत्याच बाबतीत मागे नाहीत.’ वीनू यांना बाइक्सचं आणि वेगाचं वेड लहानपणापासूनच होतं, त्यांच्या वडिलांकडूनच ते त्यांच्यात उतरलेलं होतं. वीनू ही के.सी. पालीवाल यांची मोठी मुलगी, तिला ते लाडाने पुत्रिका म्हणत. पुत्रिका, अशी व्यक्ती जिच्यात मुलगा आणि मुलगी दोघांचेही गुण आहेत. ‘मी बँकर होतो, वेगवेगळ्या शहरात बदली व्हायची. वीनूचा जन्म नैनिताल, पंतनगरमध्ये झाला. सगळ्यात मोठी म्हणून लाडाकोडात वाढवली तिला. तिने नेहमीच कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मुलाप्रमाणे सांभाळल्या. धाकटी बहीण आणि आम्हा दोघांची ती खूप काळजी घ्यायची. माझ्या तीन बाइक्स होत्या, राजदूत, जावा आणि बुलेट. त्या तिन्ही चालवायची संधी ती नेहमी शोधायची, अनेकदा मी नसतानाही. बाराव्या वर्षीच ती बाइक चालवायला शिकली होती. शिक्षणही उत्तमोत्तम संस्थांमधून घेतलं. राजस्थान विद्यापीठातून पदव्युत्तर झाल्यानंतर लंडनच्या मँचेस्टर मॅनेजमेंट स्कूलमधून तिने एमबीए केलं. ती राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन विजेतीही होती.’ वीनू यांची मुलगीही बाइकवेडी आहे, असं तिचे वडील म्हणाले.
तिची आई हेमलता म्हणाल्या, ‘ती खूप संवेदनशील होती. इतरांची इतकी काळजी करायची की, स्वत:विषयी विचारच करू शकायची नाही. ती विकलांग मुलांसाठी एका प्रकल्पावर काम करत होती. फिक्कीच्या महिला विभागाची कार्यकारी सदस्य होती.’
दैनिक भास्करच्या एका कार्यक्रमात त्यांना मुलांकडून अभ्यास कसा करवून घ्यावा, हे सांगण्यासाठी बोलवलं होतं. दिल्लीतल्या एका शाळेचं उदाहरण देऊन वीनू तेव्हा म्हणाल्या होत्या की, जयपूरच्या शाळेत एक तास असा असायला हवा ज्याचं नाव असेल Drop Everything And Read - DROP. म्हणजे सगळं टाकून वाचा. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात मुलांना आवडतील अशी पुस्तकं, मासिकं, वृत्तपत्रं असायला हवीत. त्यातूनच त्यांना रोज नवीन काही कळेल आणि नवीन काही करण्याची बैठक पक्की होईल.
prerna@dbcorp. in