आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाह नवाज !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘उलझन’ हे नाटक बघून मी ठरवलं की जर मला माझ्या भावना व्यक्त करायच्या असतील तर अभिनय हेच माझं जगणं आहे’, असं प्रांजळपणे सांगणा-या नवाजुद्दीन सिद्दिकीला 17 वर्षांच्या खडतर प्रवासानंतर यशाची गुरुकिल्ली सापडली. राष्‍ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या या सच्च्या कलाकाराला ‘मिसेस लव्हली’ चित्रपटाच्या बहाण्याने भेटण्याची संधी मिळाली आणि त्याच्या आम आदमी ते कलाकार या प्रवासाची कहाणी त्याच्याच तोंडून ऐकण्यास मिळाली.
० 1996मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पासआऊट झाल्यानंतर 17 वर्षांनी तुम्हाला ख्याती आणि यश मिळाले. मागे वळून पाहताना तुम्हाला कसं वाटतं?
‘अच्छा लगता है...’ बस या तीन शब्दांशिवाय माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. कधी कधी वाटायचं, ‘क्या पनौती लगी है।’ आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला खूप संघर्ष करावे लागतात. मग मीच माझ्या मनाला समजावतो, ‘वक्त तो लगता है।’ मी स्वत:च्या मनाशी ठरवलंय, वेळ लागला तरी चालेल, आपण परत परत प्रयत्न करत राहायचे.
० तुम्हाला बालपणापासून चित्रपटाचे वेड होते का? तुम्हाला कलाकार बनायचं होतं की अजून काही? मुजफ्फरनगरमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा परिणाम तुमच्यावर कसा झाला?
मी लहानपणी चित्रपट खूप बघितले; पण तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की मी चित्रपटात काम करावं. मुजफ्फरनगरमधील माझ्या गावाची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती तसेच तेथील सतत होणा-या दंग्यांमुळे मला आणि माझ्या भावांना गाव सोडावे लागले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी जेव्हा नोकरी करत होतो, तेव्हा माझ्यापुढे काहीच ध्येय नव्हते. मी भरकटल्यासारखा काहीतरी शोधत होतो आणि तेव्हा मी दिल्लीला ‘उलझन’ नावाचं नाटक पाहिलं. तेव्हा मला जाणीव झाली, जर मला माझ्या भावना व्यक्त करायच्या असतील तर अभिनय हेच माझं क्षेत्र आहे. काही दिवसांनी मी थिएटरमध्ये काम करायला लागलो. वर्षभरानंतर मला ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश मिळाला.
० आम आदमी ते कलाकार अशी मजल तुम्ही कशी काय मारली? तुमच्यात काही न्यूनगंड आहेत का? की तुमचा आत्मविश्वास पहिल्यापासूनच तगडा आहे?
माझ्या ‘रिअल लाइफ’मध्ये मला खूप न्यूनगंड आहेत, पण माझ्या ‘रील लाइफ’मध्ये कलाकार म्हणून माझा आत्मविश्वास तगडा आहे. मला माझ्या कामाबद्दल बोलता येत नाही. माझं कॅमे-यापुढचं कामच बोलत असतं.
० नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधल्या तुमच्या मित्रांनी तुमच्या करिअरमध्ये मदत केली का? जेव्हा तुम्ही निराश व्हायचात, तेव्हा काय करायचात? तुमचे ज्युनियर राजपाल यादव यशस्वी झाले; पण तुमच्या कामात यश येत नव्हते, तेव्हा तुम्हाला काय वाटायचे?
मला इतर कुणाहीपेक्षा तिथल्या प्रशिक्षणाचा खूप उपयोग झाला. हे खरं, की माझ्या मागून आलेले माझे साथीदार यशस्वी होत होते आणि माझा संघर्ष संपतच नव्हता. दहा सेकंदांचा छोटासा रोल मिळावा, यासाठी मी धडपड करत होतो. या इंडस्ट्रीत ओळख नसल्यामुळे मी खूप संघर्ष करत होतो. मी नेहमी म्हणायचो, ‘एक बार रोल मिल जाये, फिर सब को बता दूँगा।’ मुंबईत राहायला जागा नाही, खाण्यासाठी पैसे नाहीत, अशाही परिस्थितीत मी खचलो नाही. रडण्यासारखे अनेक प्रसंग आले, पण कधी डोळ्यातून पाणी आलेच नाही. माझ्याजवळ माझा असा कोणीच जिगरी यार नव्हता, की ज्याकडे मी माझं मन मोकळं करीन. पण अनुराग कश्यप मात्र सतत धीर द्यायचा, की वेळ जाऊ दे; सर्व ठीक होईल. यात मला सर्वात मोठी साथ ही माझ्या आईने दिली. ती माझ्यापासून दूर होती, पण सतत फोन करून धीर देत होती. प्रयत्न करत राहा, असं सांगत होती.
० तुमच्या संघर्षाच्या काळातील जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग कोणता होता?
खूप प्रयत्नानंतर ‘सरफरोश’मधील एक छोटासा रोल मिळाला, त्यात मी जीव तोडून काम केलं. हे मनात ठेवून, की ‘अगर एक भी आम आदमी को मैं रोक सका, तो मैं जीत गया।’ त्यानंतर लहानमोठे रोल मिळत गेले. मी माझ्या जीवनात तडजोड केली, पण अभिनयात कधीच केली नाही.
० ‘पिपली लाइव्ह’, ‘कहानी’, ‘तलाश’मधील पात्र पडद्यावर उतरवताना तुम्ही कशी पूर्वतयारी केली?
मला दिग्दर्शकाकडून संदर्भ मिळतात, त्यांचा मी अभ्यास करतो, आजूबाजूच्या व्यक्तींच्या स्वभावाची नोंद करतो. आता ‘लंच बॉक्स’मधील रोलमध्ये मी माझ्या शेख नावाच्या मित्राच्या वागण्या-बोलण्याची कॉपी केलीय. एरवी, वैयक्तिक जीवनातील माझ्या भावना मी माझ्या अभिनयातून व्यक्त करतो. कारण मला स्वत:बद्दल जास्त बोलता येत नाही.
० मराठी चित्रपट बघता का? कोणते चित्रपट बघितलेत? मराठी चित्रपटात काम कारायची इच्छा आहे का?
‘देऊळ’ हा माझा आवडता चित्रपट आहे. ‘विहीर’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हे चित्रपट बघितले आहेत. नंदू माधव माझा मित्र आहे. मला ‘बालक-पालक’ आणि ‘टाइमपास’ चित्रपट बघायचे आहेत. ‘देऊळ’च्या दिग्दर्शकाबरोबर मला काम करायचे आहे.
०तुम्हाला तुमच्या गावासाठी बुधा, मुजफ्फरनगरसाठी काही करण्याची इच्छा आहे का? राजकारणात सक्रिय होणार का?
मी आणि माझ्या भावांनी दंग्यांना कंटाळून गाव सोडला. माझ्यासारखे बरेच लोक आहेत, की जे दंगे आणि राजकारणामुळे विस्थापित झालेत. तिथे युवाशक्ती खूप आहे, पण सांस्कृतिक वारसा नाही. नाटक, थिएटर, अभिनय याची ओळख नाही. मला तिथे या सर्व गोष्टी सुरू करायच्या आहेत, जेणेकरून तेथील युवक यात स्वत:ला गुंतवतील. त्यांच्यातल्या ऊर्जेला दिशा देण्याची गरज आहे, जे फक्त थिएटरच करू शकते.
pritizafar@gmail.com