आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिची काहीच चूक नाही !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका महिला मेळाव्यास मार्गदर्शनासाठी गेले होते. माझा सत्कार करण्यासाठी आयोजकांनी त्या गावातीलच एका महिलेस बोलावले. साधारण पस्तिशीच्या आतल्या वयाची असावी. ती गावात चांगले काम करते, म्हणून खास तिलाच सांगितले गेले. सत्कार म्हणजे हळद-कुंकू लावून शाल देणे. गळ्यात हार घालून गुच्छ, नारळ हातात देण्यास तिला बोलावले. ती उठली. अबोल, शांत, मान खाली घातलेली ती घाबरून उभी राहिली आणि आयोजक महिलेस मूक इशाऱ्याने म्हणू लागली, मॅडमचा सत्कार करायला मला कसं सांगताय, अहो मी तर विधवा आहे. हे तिचे डोळे खुणवून इशारे होते. दुसरीला सांगा, मी कशी मॅडमना हळद-कुंकू लावू, असेच ती सुचवत होती. तिचा मूक इशारा कळला मला. मी म्हटलं, तुम्हीच या, मी तुमच्याकडूनच कौतुक करून घेणार. ती घाबरतच स्टेजवर आली. मी हळदी-कुंकवाची वाटी तिच्या हातात दिली. नजर रोखून म्हटलं, लावा आता मला. मला चालतं सर्व काही. तुम्ही स्त्री, मी स्त्री. यात कसला आला परकेपणा? तिच्याच घाबऱ्या हाताने मी हळद-कुंकू, हार, गुच्छाचा सत्कार स्वीकारला. मीही तिला हळद-कुंकू लावलं.

विधवा असली तरी तिला अशी वागणूक का? हे असले नियम कुणी बनवले? वनवास का? तिने अवहेलना सहन करतच जगायचं का? कुणी ठरवलं हे? या विचारांचं वादळ माझ्या डोक्यात सुरू झालं होतं. पण मी स्वत:ला सावरलं. मला महिलांशी संवाद साधायचा होता. तिला म्हटलं, नंतर तू मला भेट. बोलूयात आपण. आणि मी माझ्या व्याख्यानास सुरुवात केली. कार्यक्रम झाला. तिच्याशी बोलले. घरी येताना माझ्याच मनाशी माझा संवाद सुरू झाला.

गावातील गुंड-मवाली विधवेला छेडणं, तिला लाज वाटेल अशी कृत्य तिच्यासमोर करणं किंवा विधवा म्हणजे स्वत:चीच मालमत्ता आहे, असे समजून तिला त्रास देतात. पण त्या तरुण विधवा मुलीचा दोष काय असतो? हे समाज, नातेवाईक, आईवडील, सासू-सासरे या मंडळींनी समजून घ्यायला नको का? त्यांना चांगलंच माहीत असतं की, सून/मुलगी तारुण्यात का विधवा झाली ते. मुलाला व्यसन होतं, खूप प्यायचा, वेश्येकडे जाण्याचा नाद होता, सवयी चांगल्या नव्हत्या, एड्सने गेला. पण जी मुलंबाळं आणि संसाराचा गाडा एकट्याने अोढत असते त्या सुनेला दोषी ठरवतात. ते आव्हान ती कशी पेलतेय, याचा विचार ते करत नाहीत, उलट तिलाच दोष देतात.

दिवसेंदिवस हे विधवांच्या बाबतीत वाढताना दिसून येतंय. तरुण विधवा किंवा प्रौढ विधवा दोघींची दु:खं म्हटलं तर सारखीच, म्हटलं तर वेगळीच आहेत. प्रौढ विधवांनी थोडंसं सुख तरी आयुष्यात पाहिलेलं असतं. त्या जगलेल्या असतात. पण तरुण विधवांचं काय? किती चांगले दिवस त्यांनी पाहिलेले असतात? त्यामुळे घरच्यांनी तिला समजून घ्यायला हवं, सांभाळून घ्यायला हवं, तिचा तिरस्कार करू नये, तिला व तिच्या लहान मुलांना आपलंसं करावं, तिला विश्वासात घ्यावं, तिच्या नवऱ्याचा हक्क, पैसा, संपत्ती तिला द्यावी, तिला आयुष्यात स्थिर करावं. परंतु, असे दु:ख विसरून जगायला बळ देणारे समाजात फारच कमी लोक दिसून येतात.
त्याही पुढे जाऊन स्पष्टपणे सांगावेसे वाटते की, लहान वयात पतीचे निधन झालेल्या तरुणीचा सासरच्यांनी आणि माहेरच्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून पुनर्विवाह करावा. समदु:खी, तिच्या लहान मुलांसह तिला आनंदाने सांभाळणारा व स्वीकारणारा नवरा शोधावा. तिचं पुन्हा लग्न लावून देऊन तिचं जगणं सहज करून द्यावं. अशी विचारांची धारणा वाढणं गरजेचं आहे. तरच विधवांचं जगणं सुकर होईल.

तिला शुभ कार्यातून दूर लोटून तिचं अस्तित्वच नाकारणाऱ्या लोकांना हा प्रश्न विचारायला हवा की, तिचा बळी का देताय? तो अधिकार कुणी दिला तिला नाकारणाऱ्यांना? विधवांनी आता धीट व्हावं. स्वत:ला लांब ठेवून, अलिप्त मानून न घेता स्वत:हून घरातील शुभ कार्यात रमावं. परकं समजून लांब राहू नये. या वेड्या पद्धती बंद होणं गरजेचं आहे.

विधवांचा मान, सन्मान, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, समाजकार्यात, सणवारात पुढाकार घेता यावा यासाठी कायदाच कडक करावा. म्हणजे कुणाची हिंमतच होणार नाही, विधवांचा तिरस्कार करण्याची.

स्त्रीच्या आयुष्यात पती येण्याअगोदर ती कुंकू लावतेच की. दागदागिने घालतेच. मग त्याच्या मृत्यूनंतर ती स्वत:साठी चांगलं राहू का शकत नाही, हा बांध फक्त तिलाच का? तिच्या मृत्यूनंतर तो विधुर म्हणून, सगळी हौसमौज मारून जगतो का? नाही. त्याला बंधन आहेत का? नाही. मग शुभ कार्यातून स्त्रीच का वगळली जाते?
हे बदलायची वेळ आली आहे. पटतंय ना तुम्हाला?
shrirampreeti27@gmail.com