आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priya Aringale Article About Marriage Counseling In Rural Areas

लग्न म्हणजे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणांवर प्रसिद्धिमाध्यमं अतिशय प्रभावी परिणाम करीत असतात. तो परिणाम चांगल्या की वाईट अर्थाने होऊ द्यायचा, हे प्रत्येकाचे संस्कार आणि व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतं. गावातील पालकांमध्ये आणि तरुणामध्ये जीवनमूल्यांसंदर्भात जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे.

गावाकडे कुठल्या कारणांवरून भांडण झाली तर थेट पोलिस स्टेशनला जाण्याआधी गावच्या पोलिस पाटलांकडे जातात. दोन्ही पक्षांच्या बाजू समजून घेऊन भांडणातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो, भांडण गावपातळीवर मिटले नाही तरच पोलिसांत जातात किंवा कायद्याचा आधार घेतला जातो. मध्यंतरी निफाड जिह्यातील काही पोलीस पाटलांना भेटण्याचा योग आला आणि त्यांच्याद्वारे गावातील सहजीवनातील वास्तव जाणून घेता आले.

सविता आठवी शिकलेली पण शहरात वाढलेली. नवरा दीपक, सासू-सासरे आणि दोन मुली असा परिवार, शेतमजुरी करून घर चालवतात. अर्थातच सविताकडूनही तीच अपेक्षा केली गेली. परंतु तिला शेतमजुरीची सवय नाही, तिला जमणार नाही, असं तिच्या आईच म्हणणं. त्यामुळे ती घरीच असते. मध्यंतरी दीपकच्या पायाला बऱ्यापैकी दुखापत झाली. अशा परिस्थितीत त्याला आधार देऊन कामात हातभार लावणं गरजेचं होतं. पण सविता मात्र तीन महिने आईकडे जाऊन राहिली. लग्न झाल्यापासून तिची आई सतत तिच्याकडे येऊन राहते. बरंचसं सामान तिला पुरवते, कारण तिला शेतात जावं लागू नये. दीपकचा आपल्या मुलींवर जीव आहे. पण सविताला घरकामातही रस वाटत नाही, सतत माहेरी जाणं कारणांवरून नवऱ्याशी, सासूशी भांडत राहते. तिला दीपकबरोबर शहरात जाऊन राहायचे आहे. पण तो आईवडिलांना सोडून राहू शकत नाही. अशा परिस्थितीत तिला दीपकपासून काडीमोड हवा आहे. सुरेश आणि अनिता दोघांच्याही वयात फारसं अंतर नाही. वयाच्या अठराव्या वर्षी दोघांचं लग्न झालं. चार वर्षांत दोन मुलं झाली. अनिता सातवी शिकलेली, अत्यंत कष्टाळू. सुरेश सतत दारू पितो. अगदी कमी वयात दोन मुलांची जबाबदारी दोघांवरही आली. दोघेही एकाच वयाचे आहेत. भांडणं तर होतातच पण त्यांच्यात हातापायीदेखील होते. तिला सासरे नाहीत. सासूचं दोघंही ऐकत नाहीत. म्हटलं तर चूक दोघांचीही, म्हटलं तर दोघांचीही नाही. अशा वेळी एकमेकांशी समजूतदारपणे बोलण्याऐवजी दोघंही इतरांसमोर एकमेकांच्या चुका दाखवतात आणि आता दोघंही काडीमोड घेण्याच्या विचारापर्यंत पोचलीत.

नागेश, पत्नी राधा, आईवडील, भाऊ, दोन मुलं असा परिवार. नागेशला कामानिमित्ताने कधी तरी गावाबाहेर जावं लागतं. राधा सातवी शिकलेली. अत्यंत सालस. काही दिवसांपूर्वी राधा आणि तिच्या घरच्यांच्या कानावर आलं, की नागेशचे दुसऱ्या एका बाईबरोबर संबंध आहेत. राधाने या गोष्टीचा छडा लावला आणि दोघांनाही सोबत असताना पकडलं. तेव्हा नागेशने कावेरीशी लग्न केल्याचं सांगितलं. राधाने आणि सासूसासऱ्यांनी कावेरीला घरात घेतलं. काही दिवसांत पुन्हा तशीच घटना कानावर आली. तेव्हा राधा आणि कावेरीने त्या गोष्टीचा शोध लावला तर नागेशचे तिसऱ्याच एका बाईबरोबर संबंध असल्याचं समोर आलं. दोघींनीही एक दिवस त्या दोघांना एकत्र गाठलं. आता मात्र राधा आणि कावेरी दोघीही फसवल्या गेल्या होत्या. कावेरी दहावी शिकलेली, समजदार. तिला एक मूल आहे. तिने नागेशशी लग्न केलं तेव्हा तो विवाहित असल्याचं तिला ठाऊक नव्हतं. आता समोर आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणंही गरजेचं होतं. राधाला बरोबर घेऊन तिने एक धाडसी निर्णय घेतला. नागेशपासून स्वतंत्र होऊन दोघीही एकत्र मुलांचा सांभाळ करीत आहेत.

पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात एखाद्या विवाहितेने नवऱ्याच्या विरोधात बोलणे किंवा नवऱ्याकडून होणाऱ्या जाचाबद्दल आवाज उठवणे, हा प्रकार ऐकू येत नसे. आता मात्र परिस्थिती बदलताना दिसतेय. याला कारणेही बरीच आहेत. महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रियांच्या बाजूने कायदा, जनजागृती, स्त्री-हक्कासाठी लढणाऱ्या संस्था. आणि अर्थातच शिक्षण. प्रत्येक मुलगी शिकते. स्वाभिमानाची, जाणीव तिच्यात लहानपणापासूनच निर्माण होते. याचे तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात सकारात्मक परिणाम घडतात. परंतु वरील तिन्ही प्रकरणांचा विचार केला तर एकमेकांपासून वेगळे होण्याच्या मानसिकतेपर्यंत पोहोचलेल्या या जोडप्यांनी वरील सर्व चांगल्या मार्गांचा आपापल्या परीने योग्य उपयोग किंवा गैरवापर केल्याचं दिसतं.
सविता तशी कमी शिकलेली पण शहरी वातावरणात वाढलेली. पुरेशी समज नाही. त्यात मुलीच्या संसारात आईची अवास्तव ढवळाढवळ. या गोष्टी तिच्या संसारासाठी मारक ठरल्या. कायद्याचा व स्त्रीहक्कांचा ती गैरवापर करत असल्याचंही जाणवतं. सुरेश आणि अनिता यांचं लग्न अगदीच कमी वयात झालेलं. त्यांच्यात संसार करण्याइतपत समज आलेलीच नसते. त्यात पुन्हा इतक्या कोवळ्या वयात दोन-दोन मुलांची जबाबदारी. यामध्ये दोघांच्याही पालकांची चूक सर्वात जास्त जाणवते. आहे ती बिकट परिस्थिती निमूटपणे सहन करण्याइतके आजचे तरुण अतिसहनशीलही नाहीत. कारण अवतीभवतीचं जग इतक झपाट्याने बदलतं आहे. तरुण, मग ते शहरी असोत वा ग्रामीण, त्यांच्यावर माध्यमं अतिशय प्रभावी परिणाम करीत असतात. तो परिणाम चांगल्या की वाईट अर्थाने होऊ द्यायचा, हे प्रत्येकाचे संस्कार आणि व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतं. गावातील पालकांमध्ये आणि तरुणामध्ये जीवनमूल्यांसंदर्भात जनजागृती होणं अत्यंत गरजेचं आहे.

नागेशच्या प्रकरणात नात्यामधील एकनिष्ठता, एकमेकांतला विश्वास याची उणीव जाणवते. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत कावेरी आणि राधा या दोघींनी आजच्या काळाला शोभेल असा, एकत्र राहण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. स्त्रीशिक्षणाचा सकारात्मक परिणाम येथे जाणवतो. आजची स्त्री स्वत:ची आणि मुलांची जबाबदारी समर्थपणे ती पेलू शकते, हे जाणवतं. आता एवढेच सांगावेसे वाटते की, कुणाही तरुण आणि तरुणीने, शहरातले असू दे किंवा ग्रामीण भागातले, लग्न करण्याआधी नात्यातल्या गोडव्याबरोबरच लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांचा, नात्यातल्या विश्वासाचा आणि जोडीदाराबद्दलच्या एकनिष्ठतेचा सर्वार्थाने नक्की विचार करावा.
(dherangepriya21@gmail.com)