आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग्य मार्गदर्शन मिळाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबिका टाकळकर यांचा विशेष विश्व या सदरामधील ‘आमच्या नंतर काय?’ हा लेख वाचला आणि नकळत आईकडे नजर जाऊन तिच्या डोळ्यांतील अश्रूच्या प्रश्नांचा अर्थ मला समजला. माझी आई इतरांप्रमाणेच आहे. तिच्याही आपल्या जीवनाकडून सामान्यच अशा अपेक्षा होत्या. प्रेम करणारा नवरा, आणि ‘आई’ करत तिच्याभोवती फिरणारी मुलं, अशा तिच्या माफक इच्छा होत्या. त्याप्रमाणे घडलंसुद्धा. आम्ही दोन मुली आणि एक मुलगा. पण माझा भाऊ सुरजला लहान असताना खूप ताप आला होता. मेंदूमध्ये ताप गेल्याने तो इतर मुलांच्या मानाने मागे पडला. खूप औषधपाणी झालं, पण मोठा होऊनसुद्धा इतर मुलांसारखा शिकू मात्र शकला नाही. तरीही आई जिद्दीने त्याला शिकवतच राहिली आणि प्रबोधिनीमध्ये टाकून त्याच्यात आत्मविश्वास भरत गेली. तोदेखील प्रतिसाद देत गेला. तो एका कंपनीमध्येही जायला लागला. परंतु, एवढं सगळं होऊनही आईच्या मनात आपल्यानंतर याचं काय होईल, हा प्रश्न सारखा सतावत होता. ज्यांना भाऊबहीण असतात, ते आपल्या आयुष्यात बिझी असतात. पण, ज्यांना नसतात त्यांची मात्र खरंच काळजी असते. म्हणजे असले काय नि नसले काय, काळजी ही प्रत्येक दिव्यांगाच्या पालकांना असतेच.

मृत्युपत्र करून ठेवलं तरीसुद्धा त्या मुलांच्या बुद्धीत ती सांभाळण्याची आकलन शक्ती असते का, हा प्रश्न असतो. तसेच टाकळकर यांनी सुचवल्याप्रमाणे हॉस्टेल म्हणा किंवा सोसायटीमधील लोक म्हणा, पण हे सर्व त्यांच्यामागे या मुलांना सांभाळतीलच, असं होणं खूप अशक्य आहे. कारण, समाजातील सगळ्याच व्यक्ती समजूतदार नसतात. म्हणूनच, आज हा लेख वाचल्यानंतर माझ्या आईला नक्की सांगावंसं वाटतं की, मी असेपर्यंत त्याची नक्की काळजी घेईन. लग्न होऊन गेले तरीसुद्धा त्याची साथ मात्र मी कधीही सोडणार नाही. आणि ज्या मुलांना मागे बघणारं कोणी नसतं, त्यांच्या पालकांनी त्याला एका ठरावीक वयानंतर स्वावलंबी तर बनवावंच. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवहारदेखील जरा समजून सांगावे, जेणेकरून त्याची कोणीही फसवणूक करणार नाही. आणि लेखात सांगितल्याप्रमाणे काही संस्थाही अशा असतात ज्या तुमच्यानंतर त्याचं पालकत्व घेऊन त्यांची काळजी घेतात. त्यामुळे अशा पालकांची जबाबदारी आणि काळजी बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. या लेखाच्या निमित्ताने या सगळ्या पालकांच्या मनातलं बोललं गेल्यामुळे एक मोठा प्रश्न सोडवण्यासाठी पालकांना छान मार्गदर्शन मिळाले, त्याबद्दल धन्यवाद.
- प्रिया निकूम, नाशिक
बातम्या आणखी आहेत...