आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोली के पीछे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सगळ्या मैत्रिणी साड्या नेसणार आहेत. मलासुद्धा हवी साडी.’ ‘तू? माझी नाही देणार हं. फाडशील. तुला सवय नाही अज्जिबात.’
‘मी नेसणारच. सिल्क नको. तुझी जॉर्जेट दे.’
‘अगं, आता कोण ब्लाउज शिवणार तुझा?’
‘बघूया तरी. ‘न’ची नड कशाला लावतेस?’
शेवटी एकदाचा मिळाला शिवून. आईच्या शिंप्याने नाहीच, पण चक्क बाबांच्या शिंप्याने शिवून दिला. २ दिवसांत.
काळा रंग सगळ्या साड्यांवर जातो म्हणून काळाच. बाही नसलेला. माझ्यासाठी ती मोठी फॅशन. तो छान दिसला म्हणून एक पांढरा शिवून घेतला. अगदी कॉलेजमध्ये जाईपर्यंत, खरे तर पास होईपर्यंत, माझ्याकडे याच दोन रंगांचे ब्लाउज होते.
साड्या फक्त कार्यक्रमाला. त्यासुद्धा क्वचित. माप लग्नापर्यंत फारसे बदलले नाहीच. स्टाइलसुद्धा नाही. लांब बाह्यांचा ब्लाउज फक्त लग्नाच्या साड्यांना शिवले. खरे तर दाखवायच्या वेळी एक घातला होता. नंतर बिनबाह्यांचा; पण लग्नानंतर आई म्हणाल्या, ‘तुझे खूपच मॉड असतात. अगदी हात नसलेले नको, मेगास्लीव्ज घाल.’
छे, आपले म्हणजे कसे, आर या पार. मधले नाहीच. त्यामुळे मग बाह्या जोडल्या त्या आतापर्यंत. अर्थात तेव्हा हातसुद्धा गोजिरवाणे होते. आता गुटगुटीत.
रेखाने हाय नेकची फॅशन आणली. (आठवा ‘इजाजत’मधली रेखा) पाठ पूर्ण बंद. गळा व्ही शेप. पण अगदी सोज्वळ अवतार.
माझे काही वर्षं तसेच. नंतर जेव्हा पहिल्यांदा उघड्या पाठीचा शिवला (अर्थात आताच्या काळात त्याला बंदच म्हणते मी) तेव्हा नवरा हळूच म्हणाला होता, ‘कापड फारच महाग झाले का?’ नवरा तरी सोडाच, जेव्हा पहिल्यांदा मी असा ब्लाउज शिवला तेव्हा शिंपी म्हणाला, ‘आता कशाला? बंदच बरे, कोणाला दाखवायचे आहे?’
‘नव-याला. नाही तर बघत नाही तो. जुनी झाले आता मी.’
चेहरा कोरा ठेवून माझे उत्तर.
त्याचा चेहरा बघण्यासारखा.
अर्थात हेही उत्तर देऊन आता दीड दशक ओलांडले. एक पिढी जुनी झाली आणि स्टाइल तर ५ पिढ्या पुढे गेली.
साधा एकरंगी मॅचिंग ब्लाउज आता काँट्रास्टमध्ये घालतात. त्याच्यावर भरतकाम करतात. साडीच्या किमतीच्या पुढे त्याची किंमत असते. आता हात असतात किंवा असूनही नसल्यासारखे असतात. पाठीचा पत्ताच नसतो.
‘चोली के पीछे क्या है’ या प्रश्नाचे उत्तर आता काहीच नाही, असे द्यावे लागेल बहुतेक.
पण खरंच चोली के पीछे जे काही आहे ते फक्त रंजनासाठीच असते? सजवण्यासाठीच असते, आकर्षित करण्यासाठीच असते?
त्यावर तर या जगाचे पोषण होत आहे.
ऑक्टोबर हा स्तनाचा कर्करोग जागृती महिना म्हणून ओळखला जातो.
भारतात दर वर्षी एक लाख बायका याला बळी पडतात. स्वत:च्या हाताने केलेली तपासणी, मॅमोग्राफी, अल्ट्रासाउंड टेस्टिंग यांनी याचे निदान लवकर होऊ शकते.
३६५ दिवस बायका कुटुंबाला जपतात, नोकरी करतात, नव-याची, मुलांची काळजी घेतात त्यात स्वत:ची काळजी घेणे विसरतात. आणि मग खूप उशीर होऊ शकतो.
मला जेव्हा पहिल्यांदा ही तपासणी करायला माझ्या डॉक्टरने सांगितले तेव्हा पहिली प्रतिक्रिया ‘घाबरणे.’ काही आले तर!
‘उपाय आहेत.’
‘हो, पण अमरजितची बारावी आहे, बाबांचे ऑपरेशन आहे...’
‘तुझ्याशिवाय जग थांबणार नाही. तू अशी थांबलीस तर त्यांनाही काही फायदा होणार नाही. उलट त्रासच होईल. तू बरी तर जग बरे. तपासणी केलीच पाहिजे. बाकी सगळे नंतर.’
माझ्या मैत्रिणीच्या आईने अशीच निमित्तं देऊन येणारे मरण पुढे ढकलायचा निष्फळ प्रयत्न केला होता. वेळीच इलाज झाला असता तर अकाली मृत्यू टळू शकला असता.
ज्यांनी हे केले नाही त्यांच्यासाठी ही एक नवीन सुरुवात आहे. नवीन वर्षाचा चांगला पायंडा.
अशी घ्या काळजी
* मूल होऊ देणं, नवजात बाळाला स्तनपान करणं हा ब्रेस्ट कॅन्सर रोखण्याचा सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे.
* खर्च नको म्हणून महिला डॉक्टरकडे जाणे टाळतात. मात्र, असे न करता वयाच्या साधारण पंचविशी-तिशीपासूनच सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन शिकून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
* तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मॅमोग्राफी करू नये. निदानासाठी ब्रेस्ट सोनोग्राफीही करता येऊ शकते.
* फॅशन म्हणून आजकाल रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली जाते. या थेरपीच्या साइड इफेक्टमुळेही ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता वाढते.
* पुरुषांमध्येही ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता असते. असा ब्रेस्ट कॅन्सर अधिक धोकादायक
ठरू शकतो.
- डॉ. स्वाती शिरडकर|
स्त्रीरोगतज्ज्ञ, औरंगाबाद