आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा-सा घर होंगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हक्काची जागा आणि विश्रांतीचा कोपरा असणारं ठिकाण म्हणजे आपलं घर. महत्वाच्या पण दुर्लक्षित अशा घर या विषयावर हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक गाणी तयार झाली. त्यातल्याच काही गाण्याची ही उजळणी...

‘छोटा सा घर होगा बादलों की छाँव में, आशा दीवानी मन में बाँसुरी बजाए’
मुंबईसारख्या शहरात सारे आयुष्य गेले त्यामुळे जेमतेम ५०० स्क्वेअर फूट फ्लॅटलाच घर समजण्याची माझी मानसिकता होती. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे घर म्हणजे एकमेकांना जोडलेल्या तीन किंवा चार खोल्या. व्हरंडा तेव्हा सामायिक असायचा. आपल्या दारासमोरची जागा आपली समजून, कुंड्यांत दोनचार झाडे लावून स्वतःच्या बागेचे स्वप्न माणसे पूर्ण करीत.

आठदहा वर्षांची असताना, मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्या एका नातेवाईकांकडे जाण्याचा योग आला आणि तीनचार मजली इमारतीत, एखाद्या मजल्यावर असणाऱ्या राहण्याच्या जागेला घर नाही तर फ्लॅट म्हणतात हे पहिल्यांदा समजले.

छोट्याशाच जागेवर बांधलेले ते बंगलीवजा घर होते. बाहेरच्या मोकळ्या जागेत घरापेक्षाही उंच झाडे होती, मागच्या भागात एक छोटीशी बाग होती. जी फुले फूलवाल्याच्या पुडीतून घरात यायची ती सर्व तिथे मोकळ्या वातावरणात बहरलेली पाहूनच मी हरखून गेले. या घरातील प्रत्येक माणसाची स्वतंत्र खोली होती. तीन खोल्यांत आठ जणांबरोबर राहणाऱ्या मला त्या घराचे विलक्षण अप्रूप वाटले.

“राहतेस का इथे?” असे त्या मावशीने विचारल्याबरोबर मी कोणाकडेही न बघता मोठ्ठा होकार दिला.
पहिले दोनतीन दिवस तर नवलाईचे होते. पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या छोट्याशा जिन्यावरून वरखाली करणे, देवाच्या छोट्याशा स्वतंत्र खोलीत माझ्या एवढ्या उंचीच्या समईत वात घालून त्याच्या मंद प्रकाशात प्रार्थना म्हणणे. बाहेरील प्राजक्ताच्या झाडाचा जमिनीवर पडलेला सडा स्वतःच्या हाताने ओच्यात भरणे, झोपाळ्यावर बसून झोके घेणे, फुलपाखराच्या मागे धावणे यात पटकन निघून गेले. नंतर मात्र घरातील माणसांची आठवण येऊ लागली. खरे तर इथे झोपायला स्वतंत्र खोली होती, त्याच्या खिडकीतून येणारे चंद्राचे चांदणे थेट माझ्या कुशीत येत होते. 
पण ते दाखवायला जवळ अम्मा नव्हती.
अम्माचे वाट पाहणारे डोळे साद घालू लागले. आईची अंगाई, बाबांच्या गोष्टी, भावाच्या खोड्या, बहिणीची मस्ती या सर्वांची आठवण येऊ लागली.
पंधरा दिवस तरी इथे राहायचंच हा सुरुवातीचा निश्चय पुढच्या दोन दिवसांतच कोलमडला आणि मी “माझ्या घरी” परतले.
घर म्हणजे निव्वळ भिंती, खोल्या नाहीत तर घर म्हणजे घरातील, माझी हसतीखेळती माणसे याची जाणीव त्या लहान वयात अगदी प्रकर्षाने झाली. चार दिवस त्या मायेच्या सावलीपासून लांब राहिल्याने असेल, माझ्या छोट्याशा तीन खोल्यांबद्दल माया, जिव्हाळा वाटू लागला. जी वास्तू ओढ लावते, जिथे जिवाला जीव देणारी माणसे असतात, जी प्रेमाची ऊब देते, संकटात सावरते, उपेक्षांच्या हुंदक्यांचे अश्रू पुसते, कधी सावरते तर कधी दरडावते ती वास्तूच माझं घर ही व्याख्या मनात घर करून बसली.
कामानिमित्त जगभर फिरणारी माणसे, त्या निमित्ताने उत्तमोत्तम हॉटेल्समध्ये राहणारी माणसेसुद्धा स्वतःच्या घराचे स्वप्न पाहतात.
तुमचे घर हे बंगला असू दे किंवा फ्लॅट, झोपडे असू दे किंवा तंबू, अगदी गुहेत राहणाऱ्या आदिमानवाचीसुद्धा आपल्या हक्काच्या भिंतीशी बांधिलकी असते. “चल, आपण घरी जाऊ,” असे जेव्हा मनात येते तेव्हा आपण फक्त चार भिंतींचा विचार करत नसतो, ही अशी जागा असते जी तुम्हाला विश्वास, आराम, सुरक्षा आणि माया देते, जिथे आपण आपला मुखवटा बाहेर पार्क करून येऊ शकतो.
जगभरातील सर्वच माणसांचे स्वप्न असते की, आपले एक घर असावे. घराचे स्वप्न जेव्हा माणूस बघतो, तेव्हा तो केवळ चार भिंतींचे स्वप्न पाहत नाही. निवाऱ्याची गरज मूलभूत आहे. त्या बरोबरच समाजात वावरूनसुद्धा आपला हक्काचा असा एकांताचा कोपरा असावा असेही प्रत्येकाला वाटते.
छोटा-सा घर होगा बादलों की छाँव में 
आशा दीवानी मन में बाँसुरी बजाए
हम ही हम चमकेंगे तारों के उस गाँव में 
आँखों की रौशनी हरदम ये समझाए.
१९५४मध्ये प्रदर्शित झालेल्या “नौकरी” या सिनेमातील हे गीत म्हणजे प्रत्येक तरुणाचे स्वप्न. यातील नायक गरीब आहे. घरात आहे ती विधवा आई आणि आजारी बहीण. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला तो शिकत आहे. आपण पदवी मिळवणार आणि मग नोकरी मिळणार इतके साधे स्वप्न आहे त्याचे. नोकरीनंतर आपल्या आईला आणि बहिणीला त्याला हक्काची जागा, त्यांचे स्वतःचे घर
द्यायचे आहे. बहिणीला हसवण्यासाठी, तिच्या थकलेल्या शरीराला आणि निराशेने ग्रासलेल्या मनाला रिझवण्यासाठी तो हे गीत गातो.
चाँदी की कुर्सी पे बैठे मेरी छोटी बहना
सोने के सिंहासन पे बैठे मेरी प्यारी माँ
मेरा क्या मैं पड़ा रहूँगा अम्मीजी के पाँव में
त्याच्या खिशाला कितीही मर्यादा असू दे, त्याच्या स्वप्नांना त्या मर्यादा संकुचित करत नाहीत. घर बांधण्यापेक्षासुद्धा, स्वप्नात
रंगवलेले घर त्याच्या आशा जिवंत ठेवते.
सामान्य माणसाचे सामान्य स्वप्न म्हणजे सरळ, सोपे आणि शांत जीवन घालवण्यासाठी लागणारे एक लहानसे टुमदार घर. निवाऱ्याची इच्छा तर प्रत्येक प्राणिमात्राला असते. पण घर म्हणजे फक्त आसरा नसतो. चार भिंतींना घरपण येते ते माणसांमुळे. ही माणसे तुमची असतात, तुमच्या सुखदुःखाची भागीदार असतात. बाहेरच्या जगात अनुभवाला आलेली उदासीनता घरातील माणसांच्या उबेमुळे, प्रेमामुळे नाहीशी होते. व्यवहारी जीवनाचे खाचखळगे आपोआप समजतात म्हणून तर कितीही थकलेला माणूस उंबरठा ओलांडून घरात येतो तेव्हा लक्षात येते की, मनाला एक सुकून मिळाला आहे.
शैलेंद्र यांचे मनाच्या तळातून आलेले शब्द आणि सलील चौधरी यांचे या मातीतील सूर त्यामुळे आज सहा दशकानंतरसुद्धा हे गीत ताजे वाटते, नाही का!
 
प्रिया प्रभुदेसाई, मुंबई nanimau91@gmail.com
बातम्या आणखी आहेत...