आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अच्‍छा जी मैं हारी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राग तर आपल्या माणसावरच निघतो नं? छोटेसे भांडण प्रेमाची गोडी अजून वाढवते. योग्य त्या वेळात निचरा मात्र व्हायला हवा. शांतपणे बोलून चुकीची जाणीव झाली तर प्रसंगी क्षमा मागून पडलेले अंतर बुजवता येते.

 

माहीमचा समुद्र भलताच खवळला होता. सोसाट्याचा वारासुद्धा त्याला साथ देत होता. निसर्गाच्या रुद्रावताराला शोभेसेच त्या दोघांचे भांडण चालू होते. “नच सुंदरी करू कोपा”चे प्रात्यक्षिक बघत होते मी. 


फक्त मीच नाही तर अनेक साक्षीदार होते, पण त्या लटक्या रागाला आणि त्याच्या मिनतवारीला कोणतेही औषध लागू पडत नव्हते. “कशी तुज समजावू सांग?” अशी त्यालाही न जमणारी मनधरणी तो करत होता. 


प्रेमात असतातच रुसवे-फुगवे; त्याने तर प्रेमाची गोडी वाढते आणि ते टाळण्याचा प्रयत्न केला तरी कधी तरी कुठे तरी बिनसतेच.  भांडण सोडवायचा उपाय ज्याचा त्यानेच शोधायचा असतो. बाकीचे नुसतेच बघे असतात आणि तेव्हाच तर खरी मजा असते. पूर्वीच्या राजेमहाराजांच्या घरात कोपगृहे असत. “डोके शांत होईपर्यंत बस बाई.” तिथे असे काही तरी गणित असावे. कैकयीने इथेच तर बसून दशरथाकडून आपले वर प्राप्त केले होते. ताणायचे किती हे ज्याला कळते तो डाव जिंकतो. 


कोणतेच नाते परिपूर्ण नसते. त्यात समस्या असतातच. जेवढे नाते घट्ट होत जाते, व्यक्तिगत होत जाते तेव्हाच आपली मते आपण ठाम मांडू शकतो. दुसरा ते समजून घेईल हा विश्वास असतो त्यात. विश्वास जेव्हा डळमळीत होतो तेव्हा वादविवाद होतात आणि हाताबाहेर गेले की “राजकुमार” सिनेमात शम्मी गातो, 


तुम ने किसी की जान को , जाते हुए देखा है, 
वो देखो मुझसे रूठकर , मेरी जान जा रही है।। 


त्याच्यासाठी तिने पाठ फिरवली नाही आहे, त्याच्या जीवनानेच पाठ फिरवली आहे. 


वो देखो मुझसे रूठकर, मेरी जान जा रही है 


तो नक्की कोण आहे हे माहीत नाही तिला. त्याच्यावर तिच्या वडिलांच्या खुनाचा आरोप आहे. स्वतःचे निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी तो वेषांतर करून तिच्याच राज्यात खऱ्या खुन्याचा शोध घेत आहे. त्याच्या निळ्या डोळ्यात हरवणे सोपे. ते मान्य करायची तिची तयारी अजून नाही. हे आहे राग आल्याचे नाटक. शम्मी कपूरच्या प्रियाराधनेला साधनाने वितळणे क्रमप्राप्त आहे. तिचा, आपल्या ओठावरील स्मित दडवण्याचा अयशस्वी प्रयत्न त्याला माहीत आहे, म्हणून तो म्हणतो, 


घबरा रही है खुद भी बेचैन हो रही है 
अपने ही खून-ए-दिल में दामन डुबो रही है 


तिच्या जाण्याने तोच मृतवत होणार आहे पण तिला त्याचे काय! ती तर हसून त्याच्या जखमेवर मीठ चोळत आहे. 


बेजान रह गये हम, वो मुस्कुरा रही है. 
तिला मनवण्याचा हा निकराचा प्रयत्न आहे. 


प्रत्यक्ष आयुष्यात पुरुषाने माफी मागायचे प्रसंग खूप कमी येतात. त्याचा अहंकार प्रेमापेक्षाही सशक्त असतो पण सिनेमात अनेक गाणी आहेत, जिथे पुरुषांनी बिनशर्त माफी मागितली आहे. कालापानी या सिनेमात मात्र उलट परिस्थिती आहे. 


अच्छा जी मैं हारी,  चलो मान जाओ ना 
हे गीत एका स्त्रीचे आहे.  


प्रेमात महत्त्वाचा असतो विश्वास, त्यालाच ठेच लागली तर! संतापाचा उद्रेक होणारच. आपला प्रियकर प्रतारणा करत आहे हा संशय येऊन ती आरोप करते त्याच्यावर. नंतर तिच्या लक्षात येतेच की, संशय चुकीचा आहे. तो मात्र दुखावला गेला आहे. तिच्या विनवणीला तो आता जुमानत नाही.  खरंच चूक झाली आहे तर ठीक आहे रागावणे, पण गैरसमज झालाच असेल आणि तो मान्य केला तरीही राग?… 


छोटे से कुसूर पे, ऐसे हो खफ़ा 

 

एवढीशी तर चूक, त्याला एवढी मोठी शिक्षा देणार का तू? तिचा निरागस प्रश्न. पण त्याला तिची सर्व आयुधे माहीत झालीयत. तो अजिबात विरघळत नाही. उलट तिला खडसावून विचारतो, 


रूठे तो हुज़ूर थे, मेरी क्या खता 
प्रश्नाचा आता रोख बदलवते ती. 
जीवन के ये रास्ते, लंबे हैं सनम 


काळजाला हात कसा घालायचा हे बायकांना उपजत ठाऊक असते. 
पण जखम खोल असावी अजून, फटकन जबाब येतो 


काटेंगे ये ज़िंदगी, ठोकर खा के हम 


जिव्हारी लागेल असे बोलण्यात पुरुष काही कमी नसतात. 
मग मात्र तिचा संयम जातो. चूक कशी काय मान्य करायची? 
निर्वाणीचा इशारा देऊन ती धमकीवजा विनविते, 


चार कदम भी चल न सकोगे, समझे? 
हे मात्र माहीत आहे त्याला. 


राग तर आपल्या माणसावरच निघतो नं? छोटेसे भांडण प्रेमाची गोडी अजून वाढवते. योग्य त्या वेळात निचरा मात्र व्हायला हवा. शांतपणे बोलून, चुकीची जाणीव झाली तर प्रसंगी क्षमा मानून, पडलेले अंतर बुजवता येते. राग अनावर होतो अशा वेळी स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवणे महत्त्वाचे. शब्दांच्या जखमा भरून येत नाहीत. मोकळ्या हवेत एकट्याने फिरायला जावे. चहाच्या कपाबरोबर शांत विचार करून, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा आणि चुकले असेल तर चक्क सॉरी म्हणून मोकळे व्हावे. आणि त्यानेही वादळ शमले नाही तर चक्क लताबाई, आशाबाई किंवा रफीच्या आवाजाची मदत घ्यावी.  

 

-प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
 nanimau91@gmail.com

बातम्या आणखी आहेत...