आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

के दिल अभी भरा नहीं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षातून एकदा तरी आमचा शाळेचा ग्रुप भेटतोच. काही जण परदेशी असतात. ते आले की गप्पांचा फड जमवतो. एखाद्या शनिवारी मैफल रंगते. संध्याकाळी सात वाजता गप्पांचा फड बसतो.खरे तर नंतरचे तीन तास नुसता हशा आणि टाळ्यांचा धुडगूस. विषय कुठलाही किंवा कुठलाच नाही. पंधरा वर्षांचे शाळेतले आयुष्य जगतो आम्ही त्या तीन तासांत आणि एवढे बोलूनही जेव्हा उठतो तेव्हा, “दिल अभी भरा नहीं” अवस्था झालेली असते.
 
इथे तर आमचे स्वत:चे एक वेगळे जगही असते, स्वतःचे घर, कुटुंब, मुलेबाळे. पण जेव्हा जगच दोन जणांचे असेल तेव्हा मनाची काय अवस्था होत असेल?अल्बर्ट आइन्स्टाइनला जेव्हा त्याचा सापेक्षता सामान्य सिद्धांत सोप्या शब्दांत समजवायला सांगितला, तेव्हा त्यांनी एक मजेशीर उदाहरण दिले.
 
 ते म्हणाले, “एका गरम शेगडीवर फक्त एका मिनिटासाठी तुमचा हात ठेवा. ते एक मिनिट तुम्हाला एका तासाएवढे वाटेल. पण एका सुंदर मुलीच्या शेजारी बसून घालवलेला एक तास, एका मिनिटासारखाच उडून जाईल. पहिल्या उदाहरणात घड्याळाचे काटे अज्जिबात सरकत नाहीत आणि इथे थांबतच नाहीत, हाच तो सापेक्षता सिद्धांत.”संध्याकाळची वेळ. भेटण्याचे संकेतस्थळ ठरलेले. 
 
घरात तर या भेटीबद्दल माहीत नाही, म्हणून तिच्या हालचालीत असलेला चोरटेपणा. नवीन काही नाही या परिस्थितीत. युगानुयुगे प्रेमिकांच्या भेटी अशाच तर होतात. समाजाच्या नजरेआड राहून. बराच वेळ झालेला आहे, पण त्या दोघांना मात्र त्याचे भान नाही. जेव्हा संध्यारंग उतरायला लागतो तेव्हा मात्र नाइलाज होऊन तिचे पाय घराकडे वळायला लागतात. मग सुरू होते ती विनवणी.
 
अभी न जाओ छोडकर, 
के दिल अभी भरा नहीं.
 
एक मधुर, खेळकर, मिश्कील, रोमँटिक गीत. नुसतीच विनवणी पुरी पडणार नाही, हे ठाऊक आहे त्याला, म्हणून थोडेसे भावनिक ब्लॅकमेलिंगसुद्धा.
 
अभी-अभी तो आई हो, 
बहार बन के छाई हो
हवा ज़रा महक तो ले, 
नज़र ज़रा बहक तो ले
ये शाम ढल तो ले ज़रा, 
ये दिल सम्भल तो ले ज़रा
मैं थोड़ी देर जी तो लूँ, 
नशे के घूँट पी तो लूँ
 
वसंत ऋतूसारखीच तू माझ्या आयुष्यात आली आहेस. तुझ्या येण्याने ही हवा तरी गंधित होऊदे. बघ, अजूनही क्षितिजावर मावळतीचा प्रकाश रेंगाळला आहे. तो तरी मंद होऊ देत. मग कुठे माझे हृदय जरा स्थिरावेल. अजून तर मी काही बोललोच नाही, न ऐकता तू कशी जाऊ शकतेस?
 
सायंकाळच्या सावल्या उतरू लागल्या आहेत, पण मनाची उभारी आहे आणि असोशीसुद्धा. 
कितीही वेळ मिळू दे, पण प्रेमात डुबलेल्या त्या दोन जिवांना तो अपुराच पडतो. त्यात ती प्रेमिका आहे साधना. कोणत्याही पुरुषाला देव आनंदची जागा घ्यावीशी वाटली तर नवल नाही, एवढी सुंदर दिसते ती इथे. पण आता क्षितिजावर तारे लुकलुकायला लागले आहेत.
 
 तिला जायचे आहे तिच्या घरी. उशीर का झाला, याची उत्तरे तयार करायची आहेत ना? पाय घसरण्याचा हा क्षण आहे, जाणून आहे ती. संयम काय फक्त पुरुषांचा सुटतो? पण कोणीतरी एकाने भानावर असले पाहिजे. आपल्या मर्यादांची जाणीव होऊन ती विनविते,
 
बस अब न मुझको टोकना, न बढके राह रोकना,
अगर मैं रुक गई अभी, तो जा न पाऊँगी कभी….
यही काहोगे तुम सदा, के दिल अभी नहीं भरा
जो खत्म हो किसी जगह, ये ऐसा सिलसिला नहीं

कदाचित कधीच नाही, म्हणून मनावर दगड ठेवून तिने पदर सोडवून घेणे. तू जाऊ नकोस. आता मात्र तो निकरीला आलेला आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बरेच अंतर आहे. त्याच्या जाणिवेनेच अस्वस्थ होऊन तो सांगतो, आपली स्वप्ने, आपल्या इच्छा यांना आत्ताच जर सोडून चाललीस तर आयुष्याचा मार्ग कसा काय चालणार तू माझ्या बरोबर?

के ज़िन्दगी की राह में, जवाँ दिलों की चाह में
कई मकाम आयेंगे, जो हम को आजमाएंगे

प्रेमाचा मार्ग हा खडतर असतो. परीक्षा पाहणारा असतो. आताच जर माघार घेतली तर ते खाचखळगे कसे ओलांडणार? भविष्याच्या कल्पनेने तो चिंतित आहे. जेव्हा हवेहवे वाटणारे सुख हाताच्या अंतरावर राहून वाकुल्या दाखवते, तेव्हा मनाची अवस्था काय होते, ते दोन प्रेमीच जाणे. 
 
१९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दोनों’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते ते एस डी बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांनी. “जोरू का भाई” हा त्यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट, पण संगीतकार म्हणून या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीला आले. या चित्रपटातील या गीताला आज ५५ वर्षे झाली. पण अजूनही या गीताची मोहिनी काही उतरली नाही. या गीताचाच आधार घेऊन सांगायचे तर, “ दिल अभी भरा नहीं...”
 
(nanimau91@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...