आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर आल्यापासून एक गोष्ट निश्चितच झाली आहे. थोडा वेळसुद्धा तुम्ही एकटे नसता. डोक्यात केलेल्या पोस्टचे विचार, त्यावर केलेल्या, वाचलेल्या कॉमेंट्स पिंगा घालत असतात आणि विचारांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटते नकळत.
 
परवाच बसने प्रवास करत होते. मी आपली माझ्या विचारात दंग. समोर बसलेली एक मुलगी म्हणाली, “आई, ती हसते बघ एकटीच.” मला पटकन हसू आले, वाटले सांगावे तिला, “कुछ दिल ने कहा, कुछ भी नहीं.” घाबरलीच असती बिचारी. माझ्या मनाशी माझा संवाद जुळवून देणारा हा एकांत मला फार आवडतो. बाह्य जगात असंख्य गोष्टी चाललेल्या असतात, पण त्यांचा तसा माझ्याशी संबंध नसतो. त्या त्यांच्या मार्गाने आणि माझे विचार माझ्या मार्गाने चालत असतात. बराच वेळ मी गप्प असेन तर माझा मुलगा हळूच विचारतो, “मा, कोणाशी बोलते आहेस तू?” मला आवडतो स्वतःशीच वाद घालायला. गप्पासुद्धा मारते मी. तसेही स्वतःशी बोलणे वाईट असते का? अनेक गोष्टी असतात ज्या दुसऱ्यांशी नाही बोलत येत. कधीकधी स्वत:ला तरी कुठे उमजतात. पण घोळवायच्या मनात. पटकन कोडे सुटूनही जाते.
 
कोणी नसेलच तर स्वतःशीच बुद्धिबळ खेळतो की आपण. कधी ही बाजू जिंकते तर कधी दुसरी. कोणतीही असू दे, उत्तरे मिळाली तर आपणच फायद्यात राहतो.फेसबुक किंवा व्हॉट‌्सअॅपवरील पोस्ट्स किंवा स्टेटस हे तरी काय असते?
 
मनातले दुःख, आनंद, संताप, भीती, अगदी मत्सरसुद्धा बाहेर टाकण्याचे माध्यम. असह्य झाले की, भिंतीवर टाकून मोकळे व्हायचे. कोणी पाहो न पाहो, मन मोकळे होते. मी तर कबुली देण्याचा बॉक्स समजते त्याला. काल रेडिओवर आवडीची गाणी ऐकत असताना लक्षात आले, बरीचशी गाणी ही स्वतःलाच उद्देशून आहेत. म्हणजे कोणीही नसताना गुणगुणलेली गाणी नाहीत ही. ही आहेत स्वतःलाच प्रफुल्लित करणारी, काही दिलासा देणारी, काही आतड्याला पीळ घालणारी, तर काही प्रेरणादायीसुद्धा. काही स्वतःच्या मनालाच स्वतःची इच्छा विचारणारी, तर काही भरकटलेल्या मनाला चुचकारून थाऱ्यावर आणणारी.

दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है, आख़िर इस दर्द की दवा क्या है?
मिर्झा गालिब यांची ही प्रसिद्ध गझल सुरैया आणि तलतजींनी गायली आहे. प्रेमात असलेल्या पण परिस्थितीने दुरावलेल्या प्रेमिकांच्या मनाची घालमेल यात व्यक्त झाली आहे. एकत्र येणे दोघांच्या हातात नाही. ते फक्त स्वतःची समजूत घालू शकतात. हे नादान हृदया, तुला काय झाले आहे, हा प्रश्न तसा निरर्थक. उत्तर तिला माहीत आहेच.
 
हम है मुश्ताक और वो बेजार, या इलाही! ये माजरा क्या है?
विरहात प्रेमावरचा विश्वास उडतो आणि प्रियेवरीलसुद्धा. मग उद्वेगाने परमेश्वरालाच साकडे घातले जाते, तिच्या प्रेमात मी वेडा झालो आहे आणि तिला तर त्याची जाणीवही नाही, तूच सांग हे नक्की काय घडते आहे? आणि मग वाट पाहून पाहून संयम ढळतो. उद्विग्न मनस्थितीत कवी म्हणतो,
हमको उनसे वफा की है उम्मीद, 
जो जानते नहीं वफा क्या हैं!
या अशा निर्दयी प्रियेकडून प्रेमाची अपेक्षासुद्धा करणे व्यर्थ, जिला स्वतःला निष्ठेचा अर्थही माहीत नाही.
 
मन सावरण्यासाठी, आवरण्यासाठी केलेला हा मनाचा चाळा मला आवडतो. असा संवाद साधला गेला की, मन शांत होते. प्रत्येक वेळी मन काही तत्त्वज्ञान नाही सांगत. कधीतरी एखादी कल्पना सुचते, कधीतरी चक्क फँटसी. फक्त दु:खाच्या संवेदनाच मनाशी जुळतात असे नाही, अत्यंत सुखात असतानाही आपला आनंद वाटता नाही येत. त्या सुखद लहरी स्वतःच्याच भोवती लपेटून ‘भाई भाई’ चित्रपटातील ही नायिका म्हणते,
ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है
वो कौन है जो आकर, ख्वाबों पे छा गया है
प्रेमाच्या राज्यात पहिले पाऊल टाकताना अडखळायला होतेच. ही भावनाच अस्पर्श. मैत्रिणींनाही सांगू शकत नाही. तीसुद्धा तशी संभ्रमात. लज्जेने मनाचा गोंधळ उडाला आहे. या एकविसाव्या शतकात काय करेल ही नायिका?
ती आपल्या हृदयाशी चॅट करेल.
बेताब हो रहा है, ये दिल मचल-मचल के
शायद ये रात बीते, करवट बदल-बदल के
ऐ दिल ज़रा सम्भल जा, शायद वो आ गया है
मन व्यापणारा कोण आहे, ते माहीत आहे तिला. पण आपल्या हृदयालाच विचारून ती आपला खुंटा बळकट करत आहे. खुणा तर सगळ्या ओळखीच्याच आहेत. हृदय धास्तावले आहे, आणि झोपही उडून गेली आहे. धडधड करणाऱ्या आपल्या मनाला ती समजावते, तुझी मन:स्थिती मी जाणून आहे, पण थोडाच वेळ धीर धर. ज्याचा तुला इंतजार आहे त्याची चाहूल लागली आहे. मनाशी संवाद साधणारी ही गाणी, एक प्रकारे स्वतःच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर शोधून देणारी ही गाणी.यात तुमच्या मनाचे गाणे कोणते आहे?
 nanimau91@gmail.com
बातम्या आणखी आहेत...