आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप की याद आती रही...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनोळखी रस्ते आणि त्यावर धावणारे अनोळखी चेहरे, त्यांचे गंतव्य आहे ठरलेले आणि आपण शोधतो आहे त्यातच आपला रस्ता, स्वत:चा. स्वत:च्या आयुष्यापेक्षासुद्धा लांब कारण तो मिळेल की नाही याची शाश्वती नाही. ही अनिश्चिततेची जाणीव घाबरवणारी. स्वतःला खूप शुल्लक, लहान, एकटे बनवणारी.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या वेळीही एक महत्त्वाचा प्रश्न होता तो महानगरात दर दिवशी येणाऱ्या लोकांचा लोंढा थांबवण्यासाठी उपाययोजना करणे. आपल्याला हव्या त्या शहरात काम करण्याचा आणि घर घेण्याचा हक्क घटनेने नागरिकांना दिला असल्याने हा लोंढा थांबवणे शक्य होईल का, यावर भाष्य करणे योग्य नाही. त्याचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय होतील, याचीही कल्पना करणे अशक्य आहे. पण असे घडलेच, तर समाजाच्या एका घटकाला मात्र नक्कीच आनंद होईल.
 
शहरात कामाच्या शोधात आलेल्या लोकांचे घरवाले, त्यांची वाट पाहणारे त्यांचे गावाकडील कुटुंबीय. दर दिवशी, कामाच्या शोधात हजारो लोक आपल्या डोळ्यात स्वप्ने घेऊन मुंबई महानगरात येतात. येथील गगनचुंबी इमारती त्यांच्या आशा- आकांक्षा उंचावतात. यातील काहींची स्वप्ने होतातसुद्धा पूर्ण, तर अनेकांची फरफट होते. शहरे तशी कठोर असतात. क्रूरसुद्धा आणि जेवढे मोठे शहर तेवढे निर्दयी.
 
अनोळखी रस्ते आणि त्यावर धावणारे अनोळखी चेहरे, त्यांचे गंतव्य आहे ठरलेले आणि आपण शोधतो आहोत त्यातच आपला रस्ता, स्वत:चा. स्वत:च्या आयुष्यापेक्षासुद्धा लांब. कारण तो मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. ही अनिश्चिततेची जाणीव घाबरवणारी. स्वतःला खूप क्षुल्लक, लहान, एकटे बनवणारी.
एक अकेला इस शहर में, 
रात में और दोपहर में
आबुदाना ढूंढ़ता है, 
आशियाना ढूंढ़ता है
 
‘घरोंदा’ या चित्रपटातले जयदेव यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत. कामाच्या शोधात या शहरात हरवलेल्या सर्वच माणसांची ही व्यथा. अन्न, वस्त्र आणि निवारा मिळवण्याची धडपड. भूपेंद्रच्या आवाजातील खोली आणि खिन्नता या गाण्याला एक वेगळीच उंची देते.
दिन खाली-खाली बर्तन है, 
और रात है जैसे अँधा कुआं
इन सूनी अँधेरी आँखों में, 
आँसू की जगह आता हैं धुंआ
जीने की वजह तो कोई नहीं, 
मरने का बहाना ढूंढ़ता है
 
गावाकडचे आयुष्य वेगळे. घर माणसांनी भरलेले असते. गरम अन्न प्रेमाने वाढणारी आई किंवा पत्नी असते. इथे मात्र जेवण बनवणारे कोणी नसते, प्रेमाने खाऊन घे रे असे बजावणारेसुद्धा. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिसणारी रिकामी भांडी आणि रिकामी खोली माणसाला अजूनच एकटे बनवतात. एकटेपणा आणि जगण्यासाठी करावी लागणारी तडजोड माणसातील कोवळीक मात्र नष्ट करते. हळूहळू जगण्याची उमेदसुद्धा माणूस गमावून बसतो.
इन उम्र से लम्बी सड़कों को, 
मंजिल पे पहुँचते देखा नहीं
बस दौड़ती फिरती रहती हैं, 
हमने तो ठहरते देखा नहीं
इस अजनबी से शहर में, 
जाना पहचाना ढूंढ़ता है
 
जगण्यासाठी धडपड करत असतानाच माणसे स्वप्न पाहात असतात. जिथे पोचायचे आहे त्याचे स्वप्न. पण या कसरतीत तेसुद्धा पूर्ण होईल याची शाश्वती नसते. हळूहळू डोळ्यांच्या फक्त खाचा उरतात. स्वप्ने विरून जातात. या अनोळखी वाटणाऱ्या शहरात एक ओळखीची खूण दिसावी, चेहरा दिसावा, यासाठी प्रत्येक माणूस आसुसलेला असतो. ही फरपट फक्त शहरात काम करणाऱ्या चाकरमान्याचीच नसते; तर त्याच्या आशेकडे डोळे लावून बसणारे त्याचे घरवाले, कुटुंबीय या साऱ्यांचीच असते. “एक अकेला इस शहर में” या गीतातील त्या अकेल्याचा एकटेपणा सहज जाणवतो. पण त्याचबरोबर त्याची गावाकडेच असणारी, मुक्यानेच आपले आयुष्य ढकलणारी तीसुद्धा एकटीच. ज्याच्या साथीवर हा गाडा ओढायचा तोच दूरदेशी आहे. त्याच्या परतीची वाट पाहात पाहात विझलेले तिचे डोळे. जुनाट लाकडी दरवाजा उघडून बाहेरच्या मिट्ट काळोखात त्याची चाहूल घेण्याचा तिचा वेडा प्रयत्न.
आपकी याद, आती रही रात भर...
 
रात्र त्याच्या आठवणीने भारलेली आहे आणि डोळे मात्र पाझरत असतानाही हसताहेत, त्याच्या आठवणीने. ती यंत्रवत वावरते आहे त्या घरात, पण हालचालीतला सुन्नपणा जाणवतो आहे. तिचा तिलाच. चूल थंडावली आहे. हात सवयीने पाय चेपून देत आहेत. घराची कडी लावून दरवाजा जरी बंद केला तरी आठवणी मात्र निसटत आहेत. त्या बंद करून नाही नं ठेवता येत!
रात भर दर्द की शम्मा जलती रही
गम की लौ थरथराने लगी...
न दाखवता येणारे पण बोचणारे जळत्या मेणबत्तीसारखे दुःख जागे ठेवते आहे तिला. पूर्ण रात्रीवरच त्या खिन्नतेचे सावट पडलेले आहे. कामे संपतात पण रात्र नाही. बिछान्यावर पाठ टेकली तरी डोळे मिटत नाहीतच, त्याच्या आठवणीत तेही जागेच आहेत.
 
तो छळवाद नको, म्हणून ती त्याचे पत्र काढते. डोळे वाचत नसतात तर शोधत असतात. अक्षरातून त्याचा मागोवा घेण्याचा खुळा चाळा असतो तो फक्त.
बासुरी की सुरीली सुहानी सदा,
याद बन बन के आती रही रातभर...
 
कृष्णाच्या मुरलीसारख्याच गतकाळाच्या मधुर आठवणींचे गुंजन तिच्या मनात चालू आहे. निदान त्या सुखद क्षणांच्या स्मृतीने रात्र सुसह्य होते आहे. स्वत:ची वेदना बोलायचीही चोरी, कारण त्या परक्या शहरात तोही त्या वेदनेतूनच जात आहे, याची जाणीव तिला आहे.
कोई दिवाना गलीयो में फिरता रहा
कोई आवाज आती रही रातभर...
 
तिच्याच वेदना स्वतःच्या आवाजात कोणीतरी गात आहे. विरहाचे दुःख जे तिच्या डोळ्यात आहे तेच त्याच्या सुरात आहे. त्या आवाजात ओळखीचे सूर शोधते आहे ती. ‘गमन’ या चित्रपटात मकदूम मोहिउद्दीन यांनी लिहिलेली ही गजल छाया गांगुली यांच्या स्वरात स्वरबद्ध केली आहे. संगीत आहे जयदेव यांचे. दोन्ही गाणी वेगवेगळ्या चित्रपटातील. त्यांची कथा वेगळी, स्वप्ने वेगळी, पण दु:खाची जातकुळी मात्र एकच. शहरे स्वप्ने दाखवतात, आशा जागवतात आणि पूर्ण आयुष्य त्या आभासाचा पाठपुरावा करण्यात खर्ची पडते.
 
 nanimau91@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...