आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल ढूँढता है फिर वही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटलेली हिंदी सिनेमातील ही गाणी म्हणजे टाइम मशीन. ती ऐकताना मन कितीतरी वर्षांचा फेरफटका मारून येते. ही गीते जीवन केवळ सुरेल करत नाहीत तर त्याला अर्थ देतात, आधारसुद्धा देतात. अशा या गाण्यांच्या सुरांवरून केलेल्या सफरीचा हा पहिला टप्पा.

काल माहेरी गेले होते. आई गेल्यापासून तिचे कपाट कोणी आवरलेच नव्हते. “केवढ्या वह्या आणि पुस्तके आहेत ग, बघ कोणती हवी ती, नाहीतर दे कोणाला तरी.” बाबा जरा हळवेच झाले होते. आता इतक्या वर्षांनी काय सापडणार! माझ्याच काही जुन्या वह्या होत्या. त्यांच्या पाठची अर्धी पाने आणि तो विषय याचा काहीही संबध नव्हता. त्यात होते काही गाण्यांचे नोटेशन, सरांची काढलेली कार्टून्स, फुल्लीगोळासुद्धा. काही उतारे होते जे शिक्षा म्हणून लिहिले होते, सरावासाठी लिहिलेल्या उत्तरपत्रिका होत्या. तीन तासांच्या परीक्षेसाठी केलेला सर्व अट्टाहास; जे तीन तास आणि आयुष्याची परीक्षा यात काही ताळमेळ नाही, हे बरेच उशिरा समजले. 

एक डायरी मिळाली. त्यातले काही विचार, काही आठवणी, त्या त्या वेळेला त्याचे महत्त्व; पण आता बरेच अंतर कापले गेले होते, तरीही जीवनाचा एक भाग त्याने घडवला होताच.
 
जुने रुमाल, त्याला येणारा मंद अत्तराचा गंध.
काही पुस्तकेसुद्धा मिळाली. सुहृदांची पत्रे, पिवळे पडलेले, अस्पष्ट झालेले फोटो, जुन्या ओढण्या आणि बरेच काही.
 
भूतकाळाची हरवलेली, विस्कटलेली पाने.
आपली एक मजा असते. पुढे काय होणार, याचा विचार करत आपण इतके चिंतातुर जंतूसारखे जगतो, वर्तमान तर सोडाच, भूतकाळाच्या खूप काही सुंदर क्षणांना आपण कोपऱ्यात ढकलून देतो, खरे तर गाडूनच टाकतो. कपाटातील हा खजिना बघून वाटले, आपण कोणत्या तरी वेगळ्याच जगात आलो आहोत.
दिल ढूँढता है फिर वो ही, फुरसत के रात दिन ….
बैठे रहे तसव्वूर ए जाना किये हुए …
परत एकदा त्या सुखद आठवणी मनात पिंगा घालू लागल्या. मन गढूळलेले नव्हते तेव्हा आणि दिवससुद्धा आमच्या चालीनेच सरकत होता. सावकाश, संथ, रमतगमत. गुलझारजींच्या “मौसम” या सिनेमात हे गीत अगदी सुरुवातीला येते. वळणावळणांचा पहाडी रस्ता आणि डोंगररांगांच्या कडेकडेने मार्ग कापणारी गाडी. बऱ्याच वर्षांनी एक प्रवासी आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून काही काळ विश्रांती घ्यावी म्हणून निवांत क्षणांच्या शोधात येतो आहे. पण इथे आल्यावर मात्र त्याची गाठ पडते त्याच्या भूतकाळाच्या हरवलेल्या क्षणांशी. प्रेमात आकंठ बुडलेले ते क्षण. अमरनाथ आणि त्याच्या प्रेयसीचे.
जाडों की नर्म धूप और, आंगन में लेट कर
आंखो पे खीचकर तेरे आंचल के साये पर …

दार्जिलिंगची ती आळसावलेली दुपार आणि चुकार उन्हाला चुकवण्यासाठी त्याने डोळ्यावर ओढून घेतलेला तिचा पदर (स्कार्फ). सिनेमात हे गाणे संजीव कुमार आणि शर्मिला टागोरवर चित्रित केले आहे. पाहताना मनात आले, माझीही संध्याकाळ अशीच जायची. कोवळे ऊन अंगावर घेऊन, सावकाश एका बाजूला लेटून, आजीच्या पदरात गुरफटवून, रात्रीच्या उदरात गडप होणारी संध्या पाहात. उन्हाळ्याच्या रात्री तर संपता संपायच्या नाहीत. मग गच्चीवर तळ ठोकायचा, भावंडांबरोबर. आकाशातील चांदण्या मोजत हळूच डोळे मिटायचे. कालच घडले होते जणू काही आणि तरीही निसटून गेली होती बरीच वर्षे.
या गर्मीयों की रात जो, पुरवाईया चले
ठंडी सफेद चादरों पर जागे देर तक
तारों को देखते रहे, छत पर पडे हुए

गुलजारजींनी इथे फ्लॅशबॅक तंत्राचा वापर केला आहे. पडद्यावर एकाच वेळी अमरनाथची दोन रूपं दिसतात. एक तरुणपणीचे, आपल्या प्रेयसीबरोबर गाताना आणि वर्तमानातले, प्रौढ वयाचे; झाडाआडून आपला निसटलेला भूतकाळ निरखताना.
बर्फिली सर्दियो में किसी भी पहाडपर
वादी में गँूजती हुई खामोशियाँ सुने
आँखों में भीगे भीगे से, लम्हे लिये हुए

जगण्यासाठी केवढी तडजोड करतो आपण. जीवनाच्या शर्यतीत पुढे जाताना काय हरवले आहे, ते लक्षातसुद्धा येत नाही. नंतर मात्र आयुष्याच्या सायंकाळी आपण नक्की काय गमावले आहे, याची प्रकर्षाने जाणीव होते. त्या क्षणांना काही परत तर आणता येत नाही. राहतात त्या फक्त आठवणी. बर्फाळ, थंड आठवणी. काही सुन्न करतात, काही मनाला टोचणी लावतात. काही आठवणी, तरल भावना, त्या वयातली स्वप्नं पुसट होतात पण मावळत नाहीत. कुठे न कुठे तरी समोर येतातच. काळाची चाके तेव्हा काही उलटी फिरवता येत नाहीत. वरवर शांत दिसले तरी डोळ्याच्या कडा मात्र नकळत ओलावतात.
बातम्या आणखी आहेत...