आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए आई मला पावसात जाऊ दे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढग आणि वाऱ्याचे झालेले भांडण, म्हातारीने पिंजून काढलेला चक्क काळाकुट्ट कापूस, तळ्यात भिजायला येणारे सवंगडी आणि पाऊस पडल्यानंतर आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य... बालपणी अनुभवलेल्या पावसाच्या या कितीतरी आठवणी 

येरे येरे पावसा तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा।

आमच्या लहानपणी जून लागायच्या आधीच वळवाचा पाऊस पडून जायचा. चढलेला पारा पटकन खाली यायचा. दहा जूनपर्यंत शाळा सुरू व्हायची आणि ढगांच्या गडगडाटाबरोबर पावसाचे जोशात आगमन व्हायचे. मुलं ‘येरे येरे पावसा’ गाऊ लागली की, त्या तालावर पावसाच्या टपोऱ्या थेंबांचे नर्तन सुरू व्हायचे. तेव्हा पाऊससुद्धा प्रामाणिक होता. पैसा नाही दिला तरी वेळेवर यायचा.

ये गं ये गं सरी, माझे मडके भरी, 
सर आली धावून, मडके गेले वाहून
 
निदान सत्तर एक वर्षं तरी हे गीत घराघरात लहान मुलांना शिकवले जात असेल. या पूर्ण गाण्यात एकही जोडाक्षर नाही. कदाचित म्हणूनच सर्वच मुलांचे हे पहिले आवडते पाऊसगाणे आहे.

लहानपणीचे दुसरे आवडीचे गीत होते,
नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच

शहरात राहात असल्याने मोर पक्षी आणि आमराई या दोहोंचे अप्रूप होते. या गोष्टी मुंबईत नव्हत्या. यातील सुरुवातीच्या मुखड्यात जरी पाऊस दिसत नसेल तरी पूर्ण गाण्यात पावसाची अनेक रूपे आहेत. ढग आणि वाऱ्याचे झालेले भांडण, म्हातारीने पिंजून काढलेला कापूस, तोसुद्धा पांढरा नाही तर चक्क काळा, तळ्यात भिजायला येणारे सवंगडी आणि पाऊस पडल्यानंतर आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य या साऱ्यांचे संदर्भ या गीतात आल्याने हे गीत तसे चालतेबोलते चित्रगीतच! माझी शाळा ज्या भागात होती तिथे काही पाणी साचायचं नाही. पण ढगांचा रंग काळाकुट्ट झाला की, शाळा लवकर सोडली जायची.

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून, सुट्टी मिळेल काय?

असा प्रश्न विचारायची कधी संधी मिळाली नाही. जरा कुठे पाणी साचण्याची सुरुवात झाली की, सुट्टी जाहीर केली जायची. हुल्लडबाजी करत आणि नवीन कोऱ्या वह्यापुस्तकांना छत्रीत लपवून आम्ही घरी परत यायचो. त्याच भागातील इतर शाळेतील मुलांना मात्र ही सवलत नव्हती. भर पावसात, चिखल तुडवत त्यांना जावेच लागे. “कसली तुमची शाळा! जरा कुठे पावसाने शिंक दिली की, तापाने फणफणते”, असे बोलून आपला राग ती व्यक्त करायची. पहिला पाऊस आल्यावर गच्चीवर जाऊन, चिंब भिजून म्हणायचे अजून एक गीत होते.

गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड।
अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू।
पाऊस आला वारा आला, पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे, भरभर गारा वेचू।

गडगडणारे ढग, कडकडणाऱ्या विजा, सोसाट्याचा वारा, मुळापासून हलणारी झाडे या शब्दांचा खरा अर्थ समजायला आम्ही समुद्रावर जायचो. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पाय आपटून एकमेकांच्या अंगावर पाऊसनक्षी उमटवायचो. भर धुंवाधार पावसात चिंब भिजून दमलो की, टपरीच्या शेडमध्ये घुसून गरमगरम रगडा खायचो. गार हवेत जिभेला बसणारा चटका अजूनही जाणवतोय.

पावसाच्या गारा मात्र पाहायला मिळाल्या त्या खंडाळा घाटात. आधीच मुसळधार पावसाने घाटातली रहदारी मुंगीच्या पावलांनी सरकत होती आणि अचानक वरून छोट्याशा दगडाएवढ्या गारांचा वर्षाव झाला. बसमधून उतरून फ्रॉकच्या ओच्यात भरून घेतल्या खऱ्या, पण मुक्कामाला पोचण्याआधीच त्या विरघळून गेल्या.

लहानपणी सकाळचा क्लास असायचा. भिजायला जरी आवडायचे तरी सकाळी उठायलासुद्धा जिवावर यायचे. कधीतरी बरसून थकलेल्या पावसाची तालात संततधार चालूच असायची. मग खिडक्यांच्या वळचणीला कबुतरं, चिमण्या, कधीतरी पोपटसुद्धा येऊन बसायचे. आम्ही तासन‌्तास त्यांच्याकडे बघत असायचो. रात्रीचा पाऊस आणि त्या गडगडाटात मध्येच चमकून जाणारी विजेची पांढरीशुभ्र रेघ पाहून मात्र मनात धडकी भरायची. घरातील लोक बाहेर असतील तर आजी निरांजन लावायची. मनातली भीती गाळण्यासाठी मग आम्ही काहीबाही प्रश्न विचारत असू.

आकाशी गडगडते म्हातारी का दळते?
गडड्गुडुम गडड्गुडुम, ऐकत ते राहू।
टप टप टप काय, बाहेर वाजतंय् ते पाहू।
चल् ग आई, चल् ग आई, पावसात जाऊ।

जीवन देणारा पाऊस कधीतरी विध्वंस घडवून आणतो. जिथे गावेच्या गावे नष्ट होतात तिथे एका चंद्रमौळी झोपडीचे अस्तित्व ते काय! अशा धिंगाणा घालू पाहणाऱ्या पावसाला उद्देशून सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेली कविता आम्हाला शाळेत अभ्यासाला होती.

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली
नको नाचू तडा तडा असा कौलारावरून
तांबे सतेली पातेली, भांडी आणू मी कोठून ?
बालपणीचा पाऊस अशा पाऊसगाण्यातून मनात बरसला.
ए आई, मला पावसात जाऊ दे...

आजच्या काळात हे बालगीत लहान मुलांच्या तोंडावर आहे. जून महिना लागला की, पावसाची ही गाणी घराघरात वाजवली जातात. नेमेचि येणारा पावसाळा हल्ली काही नेमाने वेळेवर येत नाही. तो येईपर्यंत त्याची वाट बघताना लहानांच्याच काय मोठ्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी जमा व्हायला सुरुवात होते. आल्यावर मात्र सर्दी, खोकला, ताप या कशाचीही पर्वा न करता आजही मुलांचा कल्ला सुरू होतो.

धारेखाली उभा राहुनी, पायाने मी उडवीन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी वाट्टेल ते होऊ दे
ए आई, मला पावसात जाऊ दे...

- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई 
nanimau91@gmail.com
बातम्या आणखी आहेत...