आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेघा रे बोले घनन पवन चले सनन-सनन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढग दाटून आले की, मन भरून येणाऱ्या आणि आठवणी जाग्या करून जाणाऱ्या काही खास ठेवणीतल्या पावसाळी गाण्यांचा आस्वाद आजच्या डाउन मेलडी लेनमध्ये...
 
आषाढ महिन्यातील पहिला दिवस अजरामर केला तो कालिदासाच्या मेघदूताने. अलका नगरीत वास्तव्य असणाऱ्या एका यक्षाच्या हातून चूक झाली आणि कुबेराने त्याला या चुकीसाठी एक वर्ष एकांतवासाची शिक्षा दिली. आठ महिन्यांचा प्रदीर्घ काळ संपला खरा; पण जेव्हा यक्षाला एक कृष्णवर्णीय ढग पृथ्वीकडे झेपावताना दिसला, तेव्हा त्याला आपल्या पत्नीची तीव्रतेने आठवण आली. या मेघालाच दूत म्हणून पाठवायचे त्याने ठरविले... आणि मेघदूताचा जन्म झाला.
 
या प्रवासात अडचणी असणार, हे जाणून होता तो. मेघाला सूचना देताना त्याने सांगितले, ‘बाबा रे, रात्रीच्या घनदाट काळोखातच अभिसारिका आपल्या प्रियकराला भेटायला जातात. विजेच्या प्रकाशात त्यांना रस्ता दिसेल, अशी व्यवस्था कर; पण गडगडाट करून घाबरवू मात्र नकोस.’ मेघदूतातील मेघाने ही सूचना ऐकली असावी. सिनेमातील ढग मात्र ती चक्क कानावेगळी करतात. त्यांच्या गडगडाटाने आक्रित घडल्याचेच प्रसंग जास्त. कदाचित त्यामुळे, निदान पूर्वीच्या सिनेमातील नायिका, बरसणाऱ्या मेघापासून चार हात लांब राहणेच पसंत करत असाव्यात.
 
घर आजा घिर आये, बदरा साँवरीया
मोरा जिया धक धक रे, चमके बिजुरिया
‘छोटे नबाब’ या सिनेमातील हे गीत. राहुल देव बर्मन यांनी या गीताबरोबर चित्रपटक्षेत्रात संगीत-दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. वेस्टर्न धूनचा बादशहा ही त्यांची ओळख होण्यापूर्वीची ही धून. बागेश्री आणि रागेश्री यांचे मिश्रण असलेल्या राग मालगुंजीवर आधारित हे गीत आहे.
 
हे गीत मुजऱ्यासाठी जरी वापरले गेले, तरीसुद्धा मुजऱ्याचा बाजारूपणा या गीतात नाही. हे गीत कोठ्यावर गाणारी स्त्री गात असली तरीही त्यात पत्नीची मन:स्थिती वर्णिलेली आहे. ओठ आहेत कलावंतिणीचे, तर कैफियत मात्र नायकाच्या पत्नीची.
सूना सूना घर मोहें डसने को आये रे
खिडकी पे बैठी बैठी सारी रैन जाये रे
परदेशी असलेल्या नायकाच्या भेटीकडे डोळे लावून बसलेली त्याची पत्नी त्याच्या काळजीने व्याकूळ झाली आहे. तो कुठे गेला आहे, याची खबर तिला नाही. रात्र तर त्याची वाट पाहण्यातच संपून गेली आहे. त्यात हा धुंवाधार पाऊस, विजेचा कल्लोळ, गरजणारे ढग तिच्या मनाचा थरकाप उडवून देत आहेत. आर. डी. बर्मन यांचे हे पहिले गीत, पण अत्यंत ताकदीचे सूर त्यांनी लताजींच्या आवाजातून आपल्यापर्यंत पोहोचवले.
 
वरील नायिकेसाठी गडगडणारे ढग तिच्या सख्यासाठी संकट ठरत असतीलही; पण पावसाच्या आगमनाची सूचना देणारे हे निरोपे अनेक जणांसाठी आनंददायीच. आकाश आणि धरती यांचे मिलन घडवून आणणारा असतो तो वर्षाऋतू. त्यांच्या मिलनात मदत करणाऱ्या या जलदांना प्रेमदूतच म्हणायला हवे.
‘सुजाता’ सिनेमात अवचित काजळणारे हे ढग पावसाबरोबरच प्रेमाचीसुद्धा चाहूल देतात.
असं म्हणतात, पावसाचा अंदाज माणसांपेक्षा प्राण्यांना आणि पक्ष्यांना आधी येतो. अगदी मुंग्यांनासुद्धा त्याची चाहूल प्रथम लागते. त्या भिंतीतून बाहेर पडतात. पक्षी घरटे बांधायला घेतात. चिमण्या घराच्या वळचणीला जागा शोधतात. गाई, वासरे हंबरू लागतात. पण सर्वांचा अंदाज चुकवत हा खट्याळ पाऊस अचानक कोसळतो. पहिल्या प्रेमाचेसुद्धा तसेच असते.
मनाची तयारी नसताना, अगदी कल्पनासुद्धा नसताना, प्रेम उभे ठाकते. या गीताचे चित्रीकरण अतिशय देखणे आहे. एक आळसावलेली दुपार. घरात दुसरे कोणीही नाही. दाटून आलेले आभाळ आणि तिचे मनसुद्धा. पावसाला आसुसलेल्या धरतीसारखीच तिच्या मनाची अवस्था झाली आहे.
काली घटा छाए, मोरा जिया तरसाए
ऐसे में कही कोई मिल जाए
बोलो किसी का क्या जाये रे...
हूँ मैं कितनी अकेले वो ये जानके, 
मेरे बेरंग जीवन को पहचान के
मेरे हाथों को थामे, 
हँसे और हँसाए मेरा दुःख भूलाए, 
किसी का क्या जाए
प्रेमाचा पहिला स्पर्श अजून झालेला नाही तिच्या मनाला. मनाला फक्त जाणीव झाली आहे. स्वप्ने पाहण्याचीही अजून तयारी नाही तिची. एवढी अबोध आहे ती. त्यामुळे त्या प्रेमाची अभिव्यक्तीसुद्धा तितकीच शालीन, मुग्ध.
ज्येष्ठ महिन्यात पावसाळा सुरू होत असेल तरी पर्जन्यराजाची कृपा होते ती आषाढ महिन्यात. सावळ्या विठ्ठलाचा रंग ल्यालेले ढग धरतीला जलदान करतात. बीजाची पेरणी करतात. काळ्या मातीतून हिरवे अंकुर वर येऊन धरा हिरव्या रंगात न्हाते. रसरसलेला निसर्ग अनुभवता येतो तो याच महिन्यात. असेच रसरसलेले गीत आहे,
मेघा रे बोले घनन पवन चले सनन-सनन
पायल बाजे झनन-झनन जियरा मोरा डोले आजा पिया मोरे
बरीचशी मेघगीते स्त्रियांवर चित्रित केलेली आहेत. पण हे गीत आगळे. ‘दिल दे के देखो’ या सिनेमातील हे गीत शम्मी कपूरवर चित्रित झाले आहे. हा बाज आहे लोकसंगीताचा. पावसाळी ऋतूच सृजनाचा. कोसळणारा पाऊस धरित्रीला कवेत घेतो अन् सुरू होते सृजननाट्य! हे गीतसुद्धा मिलनाची सादच. पण शम्मी जेव्हा साद घालतो तेव्हा ती विनंतीसुद्धा आज्ञावजा विनंती होते. आषाढातील मातीची आणि प्रीतीची ओढ या गीतात दिसते. झिम्माड बेहोशी आणणारे हे गीत उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केले आहे.
 
nanimau91@gmail.com
बातम्या आणखी आहेत...