आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्म-ए-उल्फत को निभाये कैसे?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मन आणि हृदय यांच्यात फरक आहे. हृदय भावनेशी बांधलेले असते. त्याला विचारांची जोड नसते. हृदयातून आलेली प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते. मन, भावना आणि विचारांना स्मरून निर्णय घेते. बंध तोडणे हृदयाला कठीण आहे खरे पण मन मात्र हा निर्णय हृदयावर दगड ठेवून घेऊ शकते.

गेल्या वर्षी घडले हे. माझ्या काका आणि मामांकडे दीड दिवसांचा गणपती असतो. खरे तर दोन्ही घरे वेगवेगळ्या टोकाला असूनही कितीतरी वर्षे मी दोन्ही गणपतींना जायचे. गेल्या वर्षी मात्र देवाच्याच मनात नव्हते. त्या दिवशी अंधारून आले होते आणि पाऊस तुफान पडत होता. मुंबईत ट्रॅफिक जॅम असतोच पण त्या दिवशी अगदीच हलत नव्हती वाहनं. ठिकठिकाणी रस्त्याचे बांधकाम चालू असल्याने अनेक मार्ग बंद होते.
एका चुकीच्या गल्लीत घुसलो. पुढे रस्ता बंद होता. गल्ली चिंचोळी, त्यात ही गर्दी. ठिकठिकाणी सार्वजनिक गणपतींचे मंडप, लाऊडस्पीकरचा ठणठणाट. आणि गाडी एका खड्यात रुतली. नवऱ्याचा संयम सुटला.

“या वर्षी गणपती नकोच. आता घरी जाऊया.”
मी इतक्या वर्षांत दर्शन कधीच चुकवले नव्हते. मनात चर्रर्र झाले. एक क्षण वाटले खरे, उतरू का इथेच? पण त्या गर्दीत ते शक्य नव्हते. नवऱ्याचीही चूक नव्हती. एक निर्णय घेतला खरा पण न घेऊ शकलेला निर्णय मात्र मनाला लागून राहिला.
असे कितीतरी क्षण येतात आयुष्यात. इकडे आड आणि तिकडे विहीर. अनेक वेळा मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागतो. कधी हृदयाला स्मरून तर कधी आत्म्याला. कधी स्वतःच्या सुखासाठी पाऊल उचलले जाते तर कधी दुसऱ्यासाठी स्वतःला थांबवावे लागते.

रस्म-ए-उल्फ़त को निभाये तो निभाये कैसे, हर तरफ आग है, दामन को बचाये कैसे

रीतिरिवाज आणि प्रेमात असताना दिलेली वचने दोन्ही एकाच वेळी निभावणे कठीण. दोन्हीकडे होरपळणेच आहे हे जेव्हा निश्चित होते तेव्हा निर्णय कोणता आणि कसा घेणार!

दर्द में डूबे हुए नग्मे हजारों है मगर
साज ऐ दिल टूट गया हो तो सुनाये कैसे

दुःखात भिजलेल्या अनेक विराण्या मनात गुंजत असतात पण जर हृदयाच्या ताराच जर झंकारत नसतील तर त्या गाणं खरंच अशक्य आहे! या गीताचे संगीतकार मदनमोहन यांना हा प्रश्न सतावत असेल. कलेशी कसलीही तडजोड न करता त्यांनी उत्तमोत्तम गीते दिली जी रसिकांनी डोक्यावर घेतली, पण व्यावसायिक यशाने मात्र त्यांना हुलकावणी दिली. दर्जा की लोकप्रियता हा प्रश्न एका कलाकारासाठी जीवनमरणाचाच असतो.
दुविधा नैतिक मुद्द्यावर असली तर कोणत्याही निर्णयाला येणे खरंच अवघड होऊन जाते. रझिया सुल्तान या सिनेमातील “ऐ दिल-ए-नादान, ऐ दिल-ए-नादान, आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है” हे अशा दुविधेत पडलेल्या स्त्रीचे गीत आहे.

रझिया सुलतान ही प्रेमकहाणी आहे. एक राणी आणि तिचा गुलाम यांची प्रेमकहाणी. शाही सल्तनतीचे सारे नियम धुडकावून रझिया राज्ञीपद पटकावते. तिच्या मंत्रिमंडळाला, रयतेला हा निर्णय सुरुवातीला आवडलेला नसतोच. पण आपल्या बुद्धी आणि शक्तीच्या जोरावर रझिया त्यांच्या हृदयात स्वतःची जागा निर्माण करते. शासक हा जरी प्रजेला बांधील असला तरीही त्याचे स्वतःचे मन असतेच. ते कोणावर जडेल हे तो कसे ठरवू शकतो! रझियाचे प्रेम आहे जमात उद दिन याकूतवर. हा एक हबशी गुलाम आहे.

रयतेला हे मान्य असणे असंभव. राज्य किंवा प्रेम यातील एकच पर्याय निवडणे रझियाच्या हातात आहे. रझियातील स्त्री याकूतच्या प्रेमात आहे आणि तिच्यातील राणी कर्तव्याने बांधली गेली आहे.

ऐ दिल -ऐ - नादान,
आरज़ू क्या है, जुस्तजू क्या है?

माझ्या अजाण हृदया, माझ्या मनातली इच्छा निदान तुला तरी समजतेय का?
या गीतात शब्द आणि सूर तर आहेतच पण एक शांतता आहे. पाच ते सात सेकंदाचे मोठे विराम. ही शांतता तिच्या मनातील वादळ दर्शविते. राज्य करण्याची तिची मनीषा आहेच. ते केवळ कर्तव्य नाही. ती महत्त्वाकांक्षा आहे. ती एक स्त्रीसुद्धा आहे. प्रेमात असलेली स्त्री. राणी का प्रेयसी ह्यातील पर्याय निवडणे दुःखदायक आहे.

क्या क़यामत है, क्या मुसीबत है,
कह नहीं सकते, किसका अरमाँ है
ज़िंदगी जैसे, खोयी-खोयी है, हैरां हैरां है
ये ज़मीं चुप है, आसमां चुप है

हरवलेली ती जमिनीकडून, आकाशाकडून प्रश्नाची उत्तरे मागते. पण तेही तिच्या मनातील स्पंदने जाणून गप्प आहेत. एवढी नीरव शांतता आहे की, फक्त तिच्या दिलाची धडकन त्या शांततेची साक्षीदार आहे. 

मन आणि हृदय यांच्यात फरक आहे. हृदय भावनेशी बांधलेले असते. त्याला विचारांची जोड नसते. हृदयातून आलेली प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते. मन, भावना आणि विचारांना स्मरून निर्णय घेते. बंध तोडणे हृदयाला कठीण आहे खरे पण मन मात्र हा निर्णय हृदयावर दगड ठेवून घेऊ शकते. महत्त्वाचे असते ते एका क्षणात निर्णय घेणे. जेवढा जास्त विचार तेवढी मनाची दुविधा. हो की नाहीच्या उंबरठ्यावर रेंगाळणे अस्वस्थ करते. गोंधळात पाडते. ठरवलेला रस्ता अचानक वेगळेच वळण घेतो किंवा रस्त्याच्या फुटणाऱ्या फाट्यावर मन घट्ट करून दुर्लक्ष करावे लागते. भले तो रस्ता कितीही हवाहवासा वाटू दे!

- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...