आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज फिर जीने की तमन्ना है

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक वारसा दिन आहे पुढच्या आठवड्यात. त्या निमित्ताने, भारतातल्या अशा वारसा वास्तूंत चित्रित झालेल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांविषयी आजचा लेख.

प्रत्येक देशाला भूगोल आहे तसा इतिहाससुद्धा आहे. स्वतःची संस्कृती आहे. तिची ओळख पटते ती मंदिरे, गुहा, लेणी, किल्ले आणि उभारलेल्या अलौकिक स्मारकांतून. या सर्व वास्तू राष्ट्राची शान आहेत. आपला वारसा आहेत. या वास्तूंसंबंधी आस्था निर्माण व्हावी आणि त्यांचे जतन केले जावे, यासाठी १८ एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा वास्तूंत भारतातील ३५ स्थळांचा समावेश आहे. जगभरातील वैविध्य जपण्याचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. भारत सरकारनेसुद्धा पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. याचा पडसाद हिंदी सिनेमातसुद्धा उमटलेला दिसतो.

पूर्वी सिनेमाचे चित्रण जरी भारतातील स्टुडिओत झाले तरी प्रेक्षकांना आकर्षून घेण्यासाठी एखादे गाणे परदेशात चित्रित केले जायचे. आता मात्र आपल्याच देशातील सौंदर्याचा साक्षात्कार झाल्याने अनेक निर्माते भारतातीलच स्थळांकडे मोर्चा वळवत आहेत. दक्षिणेतील केरळ ते बर्फाच्छादित हिमाचल आणि भारतीयांना तसे अपरिचित असलेले आसाम, दुर्गम लडाख येथेसुद्धा हिंदी सिनेमांचे चित्रण केले जात आहे. सिनेमा आणि गाणी लोकप्रिय झाली की, ही ठिकाणे प्रवाशांच्या नकाशावर येतात. त्या ठिकाणांची लोकप्रियता वाढते.

जेव्हा संगीत आणि संस्मरणीय स्मारके एकत्र येतात तेव्हा सांगीतिक इतिहासाची निर्मिती होते. त्या चिरंतर स्मारकांचा आणि अजरामर मेलडींचा हा छोटासा आढावा.

‘आज फिर जीने के तमन्ना है’ हे गीत म्हणजे ‘गाइड’ सिनेमातील रोझीचा पुनर्जन्म. आपण स्वतंत्र व्हायचे, मनासारखे वागायचे, हे तिने पक्के ठरवले आहे. या गीताचे चित्रण राजस्थानातील चितोडगडावर झाले. राणा प्रताप, राणी पद्मिनी, मीराबाई यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही वास्तू असून किल्ल्याचा तट १५०० वर्षे जुना आहे. विजयस्तंभापासून चित्तोडगडाची सैर सुरू होते आणि दीड मिनिटांच्या या गीतात मीराबाई महल, पन्ना दाईची कोठी, आणि जलमहालाचे दर्शन होते. देवआनंदने आपल्या अनेक चित्रपटांत ऐतिहासिक स्मारकांचा सुंदर वापर केला आहे. बिहार येथील प्राचीन विद्यापीठ नालंदा येथे ‘ओ मेरे राजा, खफा न होना’ या ‘जॉनी मेरा नाम’ चित्रपटातील गीताचे चित्रीकरण केले आहे. पाचव्या आणि सहाव्या शतकाच्या दरम्यान नालंदाची स्थापना झाली. बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र म्हणून हे विद्यापीठ प्रसिद्ध होते. १४ हेक्टर जमिनीवर वसलेल्या या केंद्रात बौद्ध आणि हिंदू धर्माची देवळे, मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी वसतिगृहे, वाचनालय आणि ध्यानासाठी सभागृहाची व्यवस्था होती. एका मिनिटाच्या या गीतात नालंदाचे अवशेष दिसतात. एकमेकांना चुकवण्यासाठी हेमामालिनी आणि देवसाबने खेळलेला लपंडावसुद्धा.

‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ हे ‘आराधना’तील गीत म्हणजे प्रत्येक तरुणाने आपल्या स्वप्नातील तरुणीला घातलेली साद. दार्जिलिंग हिमालयन रेल्वेमध्ये या गीताचे चित्रीकरण झाले. चहाच्या बागेतून आणि घनदाट वनराईतून संथ गतीने जाणारी ही झुकझुक गाडी दार्जिलिंगच्या प्रसिद्ध चहासारखीच ताजगी देऊन जाते. डोंगरात कार्यरत असलेली, स्टीम इंजिनवर चालणारी ही गाडी सर्वात जुनी. १८८१ पासून भारतीय रेल्वेला आपली सेवा देत आहे. शाहरुख आणि मलायका अरोरा यांच्या नृत्याने गाजलेले ‘छय्या छय्या’ हे गीत निलगिरी माऊंटन रेल्वेवर चित्रित आहे. आग्य्राचा ताजमहाल तर भारताची शान. ‘लीडर’ सिनेमातील ‘इक शहेनशाह ने बनवा के हसीं ताजमहल’ हे निनांतसुंदर गीत येथे चित्रित झाले आहे. 

केवळ गीत देखणे करण्यासाठी अशा स्थळांचा वापर केला जात नाही, तर हुशार दिग्दर्शक कथेचा गाभा समजवायला कल्पकतेने याचा वापर करतात. गुलझार यांच्या ‘आँधी’ या सिनेमातील ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं’ हे गीत याचे उदाहरण आहे. कथेची नायिका आणि नायक यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. बारा वर्षांनी त्यांची अचानक भेट होते. आयुष्य अशा वळणावर आले आहे की, त्याबद्दल तक्रार नाही. पण ज्याचा अट्टाहास केला ते मिळूनही गमावलेले प्रेम विसरतासुद्धा येत नाही. मनासारखे जगूनही एकमेकांशिवाय जगलेले जीवन खऱ्या अर्थाने जगणे नाहीच.

जी में आता है, तेरे दामन में सर छुपा के हम, 
रोते रहे, रोते रहे
तेरी भी आँखो में आसूओं की नमीं तो नहीं

एकदा तुझ्या कुशीत रडून मन हलके करायचे आहे. त्याचे प्रतिबिंब तुझ्याही नजरेत असेल, हे माहीत आहे मला.

मार्तंडसूर्य मंदिराचे अवशेष असलेला हा परिसर. अनंतनाग, काश्मीर येथे हे मंदिर आहे. गेलेला काळ परत येत नाही, पण त्या प्रेमाच्या वैभवाच्या खुणासुद्धा जपून ठेवण्यासारख्या. संपन्न भूतकाळ केवळ नायक-नायिकेचा नाही तर त्या प्रदेशाचासुद्धा. जरी आता केवळ अवशेषांच्या स्वरूपात असला तरी त्यातूनच गतकाळाच्या संस्कृतीचा, भव्यतेचा, शिल्पकलेचा परिचय होतो. त्यातील फेरफटकासुद्धा गतकाळाची तुटलेली नाळ जोडून देणारा नाही का?

फारच थोड्या गीतांचा उल्लेख आला आहे इथे, पण अशी अनेक गीते या स्मारकांच्या पार्श्वभूमीवर ऐकू येतात. एक प्रकारे ही गीते सांगीतिक गाइडची भूमिका करतात. एप्रिल महिना म्हणजे सुट्टीचा महिना. विचार कसला करत आहात! आपल्या देशाच्या या सांस्कृतिक वारशाचा आस्वाद घेण्यासाठी आपली बॅग भरायला सुरुवात करा.
 
- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gmail.com
बातम्या आणखी आहेत...