आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलते है जिस के लिए

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेलीफोन. संवादाचं महत्त्वाचं माध्यम. पण तेही हिंदी चित्रपटांमधल्या अनेक गाण्यांमध्ये जणू एक पात्र असावं, असं वापरलं गेलंय. नुकत्याच  झालेल्या १७ मे या जागतिक दळणवळण दिनानिमित्त अशा काही गोड गाण्यांबद्दल.
 
अंतरीची खूण अंतरीला पटते असे म्हणतात पण त्यासाठी शार्प असावे लागते. नाहीतर “सांग कधी कळणार तुला..” असे म्हणत आयुष्य सरून जाते. प्रेम व्यक्त करणे सर्वांनाच जमत नाही. अचानक स्वप्नातली राजकुमारी प्रत्यक्षात अवतरते. तिचे अस्तित्वच तुमच्या आयुष्याला एक अर्थ देते. हीच ती व्यक्ती, असा मनाचा घोष जरी सुरू झाला तरीही “माझे प्रेम आहे” हे तीन शब्द बोलणे ही फार कठीण गोष्ट असते. समाजाची भीती, नकाराची भीती, प्रेमभंगाच्या नुसत्या कल्पनेने झालेल्या वेदनांची भीती अशा कारणांनी खूपजण आपल्या ओठाची मिठी घट्ट आवळतात.

“ये बता दे के तुझे प्यार करू या न करू?” असा हळुवार प्रश्न एखादा मजनू टाकत असेलही, पण तेसुद्धा नकाराचे भय बाळगून. या भीतीवर बरेच जण समजूतदारपणाचे आवरण घालतात आणि त्या उमलणाऱ्या भावनेला फुलून न देताच खुडून टाकतात. कदाचित अशा न फुलणाऱ्या कळ्यांना फुलवण्यासाठी फोनचा शोध लागला असेल का? विज्ञानाने प्रेम करणाऱ्यांसाठी जे काही चांगले शोध लावले त्यात टेलीफोनचा नंबर बराच वरचा लागेल.
आठवतंय का “जलते है जिस के लिये”? सुनील दत्तने आपले प्रेम व्यक्त करायला टेलीफोनचा आधार घेऊन केवळ नूतनलाच नाही तर जगातील तमाम प्रेमवीरांना दिलासा दिला.
 
१९५९मध्ये प्रदर्शित झालेला “सुजाता” सिनेमा. या सिनेमातील “जलते है जिस के लिये” हे टेलीफोन गीत खूप गाजले. या काळात प्रियाराधनेसाठी मोबाइल नव्हते, कॉर्डलेस फोनसुद्धा नव्हता. फोन ठेवायला छानशी बैठक असायची. त्यावर एक छान रेशमी विणलेला रुमाल असे. फोन एका जागी स्थानापन्न असायचा. तो असणे म्हणजे ती व्यक्ती सुखवस्तू मानली जायची. त्याचे कनेक्शनसुद्धा सहजासहजी मिळत नव्हते. एकदोन वर्षे थांबले की वर्णी लागायची. फोनला डायल होती. त्यावर नंबर असायचे. ती डायल जसा नंबर असेल तशी फिरवावी लागे. मग पुश-बटन्सचे फोन आले. घरी फोन जरी असला तरी कामानिमित्त त्याचा वापर होई, गप्पा मारण्यासाठी नाही. गाणे म्हणून दाखवण्यासाठी तर नाहीच. कॉलसुद्धा खूप महाग असायचा. केवळ नूतन समोर असल्याने सुनील दत्तने अपवाद केला असावा. एस.डी. बर्मन साहेबांचे हे गाणे अफाट गाजले. तलत महमूदच्या सर्वोत्तम पाच गाण्यांत त्याचा समावेश होतो. अतिशय हळुवार गाणे आहे हे, प्रेमाचा इजहार करणारे. अशा मुलीवर या तरुणाचे प्रेम आहे जी त्याच्या जातीची नाही. त्याच्या वर्गात मोडणारी नाही. तरीही त्याच्या भावना तो अडवू शकत नाही.
जलते है जिस के लिये, तेरी आंखों के दिये
ढूंढ लाया हँू वोही गीत मैं तेरे लिये
पलीकडे त्याची प्रेयसी आहे. तिचे डोळे बोलके असतील पण ओठ मात्र शिवलेले आहेत. तिच्या बाजूनेसुद्धा खूप काही सांगण्यासारखे आहे पण ही शांतता तिने स्वतःवर लादून घेतलेली आहे. ज्या परिस्थितीत ती वाढलेली आहे त्याचासुद्धा हा परिणाम आहे. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे स्वतःच्या जातीची जाणीव. केलेल्या उपकारांचीसुद्धा. तिच्या मुग्धतेला लज्जेतून आलेला होकार समजून अधीर नायक गातो,
जब तलक ना ये तेरे रस के भरे होठों से मिलें,
यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी ज़ुल्फ़ों के तले,
गाए जाऊँगा वही गीत मैं तेरे लिए
तुझ्या ओठांना जोपर्यंत या गीताचा स्पर्श होत नाही, जोपर्यंत तुला त्यातील माधुर्याची ओळख होत नाही, तोपर्यंत हे गीत तुझ्याभोवती भिरभिरत राहील. तू होकार देईपर्यंत मी माझे गीत, माझे मनोगत तुझ्यासाठी गाईन. असेच आणखी एक गाजलेले टेलीफोन गीत आहे पतंगा या सिनेमात. हेसुद्धा विरहगीत, पण बाज खट्याळ. सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत त्यांनीच शमशाद बेगम यांच्याबरोबर पडद्यावर गायले आहे.
मेरे पिया गए रंगून, किया है वहाँ से टेलीफून
तुम्हारी याद सताती है
टेलीफोन या शब्दाशी साधर्म्य असणारी दोन शहरे गीतकाराने निवडली. रंगून आणि डेहराडून. मग या नावाशी यमक जुळवण्याकरता टेलीफोन झाला टेलीफून.
अजी तुमसे बिछड़ के हो गए हम सन्यासी
खा लेते हैं जो मिल जाए, रूखी सूखी बासी
अजी लुंगी बाँध के करें गुज़ारा भूल गए पतलून
तुम्हारी याद सताती है...
विरहात भूक तहान विसरली जाते, माणूस संन्यासी होतो, शिळेपाके खातो, हे ठीक आहे पण चक्क पाटलोण घालायला विसरतो? ही विरहाची कमाल पातळी आहे. ही व्याकुळता फोन नसता तर कशी पोचली असती इतक्या अंतरावरून! आता मोबाइलचा जमाना आहे. व्हाॅट्सअॅप, स्काइप यामुळे परदेशीसुद्धा फोन लावणे स्वस्त आणि सोपे झाले आहे. तेव्हाचे प्रेम हळवे, साशंक होते. आता धीट झालेले प्रेम “करनी है प्रायव्हेट बाते, व्हॉट इज युअर प्रायव्हेट नंबर” अशी सरळ आणि सहज विचारणा करत आहे. एकूणच दूरसंचार क्षेत्रात जो कमालीचा बदल घडून आलेला आहे त्याचे परिणाम जनमानसात उमटत आहेतच. तरीही प्रेम चिरंतर आहे. प्रेमात असह्य होणारा विरह आहे. प्रियकराची तगमग आहे आणि ती त्याच्या प्रेयसीकडे पोचवणारा हा लाडका निरोप्या सुद्धा नवीन रूपात का होईना आपल्या सोबत आहे. खरे ना?
 
 nanimau91@gmail.com
बातम्या आणखी आहेत...