आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडी माझी लाडाची लाडाची गं !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉर्डरोबमधील प्रत्येक साडी ही महिलांसाठी केवळ वस्त्र नसून त्या प्रत्येक साडीमागे
आठवणींची कुपी असते.
वॉर्डरोब आवरायला घेतल्यावर
प्रत्येक साडीची घडी उकलते, तशा त्या साडीच्या आठवणी मनाच्या
कप्प्यांतून बाहेर पडू लागतात. या मैत्रिणीचाच अनुभव पाहा...


उद्या रविवार. ऑफिसला सुटी. घरात ती न् तिचे अहो. मुलं बाहेरगावी शिकायला. तिनं अहोंना सांगून टाकलं, उद्या मी साड्यांचं वाॅर्डरोब नीटनेटकं करणार. खूपच अस्ताव्यस्त झालंय. त्यानं पण सांगितलं, मित्रासोबत पक्षी-निरीक्षण अन् निसर्गभ्रमण ठरलंय, संध्याकाळ होईल परतायला. तुला भरपूर वेळ आहे, आवर आवर. नाही तरी रोज ऑफिसला जाताना इतक्या ढिगानं, क्विंटलनं साड्या आहेत तरी, शी बाई! कुठली नेसावी? मग मॅचिंगच काही सापडत नाही. मध्येच, अहो! ती माझी साडी, मजिंडा कलरची, आईनं दिलेली हो... कुठं पाहिलीत? वगैरे वगैरे पुटपुटणं सुरू होतं. द्रौपदीला श्रीकृष्णानं जेवढ्या साड्या पुरवल्या असतील, त्यापेक्षा जास्त साड्या असतील तरी पण... तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. कारण वादम् वादे नको. या हृदयस्पर्शी विषयावरून झालेल्या तू-तू मैं-मैं मध्ये आणखी एका तू-तू मैं-मैंची संख्या तिला वाढवायची नव्हती...
सकाळी ती उठली. तो मित्रांसोबत पहाटेच निघून गेला होता. तिनं मस्त चहा घेतला. आज फक्त वॉर्डरोब-स्वच्छता मोहीम अन् साड्या रचणे अभियान तिला राबवायचे होते. तिनं मोठ्या उत्साहाने वॉर्डरोब उघडला. तत्क्षणी काही साड्यांनी दणादण उड्या मारल्या. शी बाई! कशा कोंबल्यात साड्या! हं! घड्या घातल्या होत्या पण कोंबल्यागतच अन् किती साड्या! बापरे! छे छे! कित्ती-बित्ती नाही, त्या नीट घड्या न घातल्याने वाटताहेत, अशी मनाची समजूत काढून एकेक कप्प्यातील साड्या ओढल्या. त्यांचा मोठा ढीग तयार झाला. जणू रंगीबेरंगी, झगमगती, लखलखती छोटीशी टेकडीच. तिनं ठरवलं, आता सॉर्टिंग करूया. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सणवार, लग्न-रिसेप्शन, राष्ट्रीय सण, छोटे-मोठे कार्यक्रम वगैरे वगैरे. आणि ज्या आता कंटाळवाण्या झाल्यात त्या बाजूला काढून ठेवायच्या, बोहारणीला न् थोड्या आपल्या कामवाल्या बाईला. कुठल्याच साडीत, आठवणीत मन गुंतवायचं नाही.

वॉर्डरोब रिकामा झाला. तिनं कपड्यानं स्वच्छ पुसला, डांबरगोळ्या प्रत्येक कप्प्यात ठेवल्या. रद्दी वृत्तपत्रांच्या व्यवस्थित, मापात घड्या घालून पेपर नीट ठेवले. ठेवता ठेवता जुन्या बातम्यांवरून नजर फिरवली. एका पुरवणीच्या पानावर एक मस्त रेसिपी दिसली. हं लिहून घ्यायला हवी, तिनं साड्यांच्या ढिगाऱ्यावरून उंच उडी व लांब उडी एकाच वेळी मारली. पलीकडच्या टेबलावरून पेन आणि डायरी घेऊन रेसिपी लिहिली. एप्रिल महिना. नऊ वाजताच घामाघूम व्हायला लागलं होतं. एसी आणि एफएम ऑन केला. लता-आशा-किशोर-रफी सुरेल गाण्यांच्या तालात काम यूँ होईल, हा उत्साह होताच.

चला, आता सर्व कॉटन, सुपरनेट, अाॅरगंडी, कलकत्ता वेगळ्या करूया. प्रत्येक साडी हातात घेऊन तिची नीट घडी घातली. मळली असल्यास लाँड्रीत द्यायची म्हणून बाजूला काढून समरकूल साड्यांचा ढीग तयार केला अन‌् एका कप्प्यात स्थानापन्न झाला. वा! किती सुरेख दिसतोय कप्पा. मनाशीच हसून ती उद‌्गारली. चला, आता उन्हाळा संपला की पावसाळा... तसे पावसाळ्यात ऑफिसात पंजाबी ड्रेस घातले तरी चालतात. पण कधी कधी साडी अपरिहार्य असते. मग सिंथेटिक, हलक्याफुलक्या, ओल्या झाल्या तरी चटकन सुकणाऱ्या अशा साड्यांचं कलेक्शन आहेच. त्या हँगरला लावू या. हा एक कप्पा व्यवस्थित दिसेल. हँगरला खाली वर जराही घडी येणार नाही, अशा नीट घड्या घालून, मन लावून हँगरवर विराजमान केल्या. त्या साड्यांवरून मायेचा हात फिरवला तिनं.
हं! आता थोडं आवळ्याचं सरबत घेऊया. हात, खांदे जरा मोकळे होतील. मस्त, थंडगार सरबत घेत राहिलेल्या ढिगाऱ्याकडं ती पाहत बसली. एफएमवर गाणं वाजत होतं, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा... तिनं पटकन सरबताचा ग्लास संपवला, स्टूल घेतलं अन् टुणकन स्टूलवर चढून वॉर्डराेबच्या वरच्या कप्प्यातील मोठी बॅग काढली. तशी ती बऱ्यापैकी जड होती. तिनं ती बॅग उघडली. आतून एक मंद अत्तराचा विशिष्ट दरवळ पसरला. तिनं एकेक साडी हातात घेतली. तिच्या लग्नातल्या, २५ वर्षांपूर्वीच्या साड्या. तिनं हळुवार हात फिरवला. काही साड्या होत्या, बाकीच्या काळाच्या ओघात कुठे तरी गेलेल्या. सर्वात खाली एका कॉटनच्या बॅगेत तिचा सुरेख शालू अंजिरी रंगाचा. तिनं तो हातात घेतला. तिचे डोळे पाणावले. २५ वर्षं कशी भुर्रकन गेली. सासूबाईंनी त्यांची पसंत नव्हती लादली. साऱ्या साड्या तिच्याच आवडीच्या. तिला आठवलं, शोरूममध्ये किती तरी शालू पाहिले अन‌् हा गर्भरेशमी अंजिरी शालू समोर आला. तिची व त्याची नजरानजर झाली. दोघांच्याही ओठातून एकाच क्षणी उद‌्गार निघाला, मस्त... तिला आता हसूच आलं. चला आपल्या आवडी-निवडी जुळतील आयुष्यभरासाठी, असा विश्वास वाटला होता त्या क्षणी आणि तो खरा ठरला.

ती उठली. गाउनवरच शालू नेसून आरशासमोर उभी राहिली. हं! २५ वर्षं कशी सुखात, आनंदात गेली कळलंच नाही. चटकन मोबाइल काढला, सेल्फी क्लिक केला. स्वतःवरच खुश झाली. मुलाच्या, मुलीच्या डोहाळजेवणावेळची, बारशाची साडी हातात आली. मुलगा २३ वर्षांचा, मुलगी १८. बापरे! किती पटकन मोठी झालीत. माझ्यापेक्षा उंच, हुशार करिअरिस्ट. तिनं एका कप्प्यातले अल्बम काढले. त्यांचे बाळलीलांचे फोटो पाहत बसली. इतक्यात एफएमवरून १२ वाजल्याचं कळलं. उफ‌्! बाकीचा ढीग आवरायचाय. फटाफट शालू सोडला अन् नीट घडी घालून हळुवारपणे बॅगेत ठेवला...
चला, आता राहिलेल्या साड्या आवराव्या लागतील. प्युअर सिल्क, नारायण पेठ, कांजिवरम्, जिजामाता, डिझायनर, शिफॉन, पार्टी वेअर. मध्येच एखादी साडी हातात यायची, थोडी जीर्ण झालेली, फॉल निघालेला, रंग उडालेला. सॉर्टिंग सुरूच होतं. कुणी अाहेरात दिलेल्या, न आवडल्यानं तशाच कॅरीबॅगेत बसलेल्या. कुणी गिफ्ट दिलेल्या, पण मनं दुखावल्यानं त्या बाजूला ठेवलेल्या. तिला उदास वाटलं. काय विचित्र मन आहे, प्रत्येक साडी, तिच्यामागच्या आठवणी. असं का होतं? नाती अशी का विस्कटतात? मागचं का नाही विसरत? आयुष्य किती छोटं आहे. विचारचक्रासोबत साड्या आवरणं सुरूच होतं. ढीग आटोक्यात आला होता.

इतक्यात एफएमवर गीत रुणझुणलं. तोहफा तोहफा... लाया लाया... अन् तिची नजर पैठणीवर गेली. खास येवल्याहून आणलेली, तिनं नाही, अहोंनी, तिच्या ऑफिस प्रमोशनचं सेलिब्रेशन म्हणून. सरप्राइज गिफ्ट आणि सोबत नेकलेस सेट. किती कौतुक याला आपल्या यशाचं. त्याचं प्रोत्साहन, शाबासकी, तिच्याबद्दलचा अभिमान... ती त्याच्या आठवणीनं मोहरली.

लगेच मोबाइल घेतला अन् त्याला कॉल केला. ‘कुठं आहेस?’ ‘अगं! मस्त पक्षी निरीक्षण चाललंय. पण तुला मिस करतोय. काय कुठपर्यंत आला तुझा साडी-वॉर्डरोब-प्रोजेक्ट?’ ‘चाललाय. ए! तुझी खूप आठवण येतेय.’ ‘ओए, हे काय वेडाबाई! मी काय वर्षभरासाठी गेलोय परदेशात?’ ‘जाऊ दे! तुला नाही कळणार. मस्त फोटो काढ पक्ष्यांचे. ऊन खूप आहे. टेक केअर. बाय...’
तिनं थोडा वेग वाढवला. पाहता पाहता कपाट सुरेख रचलं गेलं.