आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Dahale About Historical Story, Rasik Divya Marathi

भडक वास्तवास अस्तर कल्पनेचे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सातत्याने दहशतीच्या छायेखाली राहणार्‍या देशातली नवी पिढी कायम भयग्रस्त वातावरणात वाढत असते. दहशतीचे राजकारण करणारे या पिढीला त्यांच्या स्वार्थानुसार घडवू पाहत असतात. त्यामुळे वर्तमान स्थितीतील अराजक त्या पिढीवर अप्रत्यक्षपणे अंकुश ठेवत असते. याचा वेध घेण्याचा प्रयत्न चिल्ड्रेन ऑफ वॉर・या मृत्युंजय देवव्रत यांच्या चित्रपटाने केला आहे...'

इतिहासाच्या खुणा वर्तमानातही शिल्लक असतात, याची प्रचिती जगाने वेळोवेळी घेतली आहे. या खुणा जखमा म्हणून शिल्लक राहिल्यास, त्या वारंवार ठसठसत राहतात व त्याची वेदना पिढ्यान् पिढ्या भळभळत राहते, याचे प्रत्यंतर काही देशांमध्ये आज सातत्याने येत आहे.
बांगलादेश 1971मध्ये पाकिस्तानपासून वेगळा झाला, त्याचा संघर्षमय इतिहास आपल्याला सर्वपरिचित आहेच. परंतु अजूनही सीमांवर बांगलादेशच्या स्वतंत्र होण्यामुळे दहशतवाद धुमसतो आहे. याच दहशतीचे रूप ‘चिल्ड्रेन ऑफ वॉर’ या चित्रपटात मृत्युंजय देवव्रत यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रियांवरील अत्याचाराचा त्यास गडद संदर्भ आहे. मात्र भडक रेखाटन केल्याने, चित्रपट वास्तव अधोरेखित करण्यापेक्षा भावनांचे उदात्तीकरण करतो.
या चित्रपटाच्या निमित्ताने इराणी चित्रपटांची आठवण आल्यावाचून राहत नाही. बहुसंख्य इराणी चित्रपट तर अराजकाच्याच सावलीत आतापर्यंत बनत आले आहेत. देवव्रत यांच्या चित्रपटात राजकीय भाष्य ठोसपणे केले गेले असले, तरी इराणी चित्रपटांमध्ये मात्र ते राजकीय दडपणामुळे ठोसपणे आढळत नाही, इतकी भीषण दहशत इराणमध्ये चित्रपटांभोवती आहे. त्यामुळे माजिद मजिदीसारख्या दिग्दर्शकांनी इराणमधील परिस्थिती अप्रत्यक्षपणे दाखवण्याचे कसब आपल्या चित्रपटांमधून वापरले होते. मारिझिए वफामेहर या मूळच्या इराणी पण ऑस्ट्रेलियास्थित तरुण अभिनेत्रीने माय तेहरान फॉर सेल・या चित्रपटात काम केल्याबद्दल 90 फटक्यांची शिक्षा भोगली होती, हे प्रकरण अजूनही इराणच्या चित्रपट क्षेत्रातील लोकांच्या मनातून पुसले गेलेले नाही. अर्थात, अशी अनेक उदाहरणे इराणी चित्रपटांच्या बाबतीत दाखले म्हणून आज उपलब्ध आहेत. याहीपेक्षा या चित्रपटांतील काही प्रसंगांचा भडकपणा बघता स्पीलबर्गच्या सेव्हिंग द प्रायव्हेट रायन・या चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. व्हिएतनाम युद्धावरून परत आलेल्या सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना या चित्रपटातील अत्यंत भडक दृश्ये पाहून नैराश्य आले होते. अमेरिकन सरकारला त्यामुळे या लोकांसाठी समुपदेशन करणार्‍या हेल्पलाइन्स सुरू कराव्या लागल्या होत्या. युद्धातले अत्यंत जळजळीत वास्तव जसेच्या तसे दाखवल्याचा तो परिणाम होता, आणि त्यातूनच स्पीलबर्गने अशा विषयांवरील चित्रपटांची ताकदच एक प्रकारे दाखवून दिली होती. अर्थात, बर्‍याच वादविवादानंतर अमेरिकन सेन्सॉरने या चित्रपटास मान्यता दिली होती; पण असे स्वातंत्र्य लाभलेले फार थोडे चित्रपट इराणसारख्या देशांमधून पुढे आलेले बघायला मिळतात.
देवव्रत यांच्या चित्रपटात राजकीय स्वातंत्र्य घेतले गेले आहे, मात्र या स्वातंत्र्याचा खुबीने वापर त्यांना जमलेला नाही. बांगलादेश स्वतंत्र होण्यामागील भारताची भूमिका, त्या वेळी इंदिरा गांधी यांनी आखलेली धोरणे, याह्या खान आणि भुत्तो यांचे राजकारण हा सगळा पसारा दाखवताना, देवव्रत चित्रपटाचा मूळ उद्देश बराच काळ विसरतात. हे भरकटणे वेगळ्या अर्थाने लॉर्ड ऑफ द वॉर・या चित्रपटाची आठवण करून देते. सोमालियात गनिमी युद्ध खेळणार्‍यांना शस्त्रास्त्रे विकणार्‍याच्या तोंडून हा सिनेमा उलगडत जातो. अत्यंत संयतपणे या चित्रपटात युद्धाच्या परिणामांच्या विषयाला मुद्देसूदपणे हाताळले गेले होते. ही सुसूत्रता देवव्रत यांच्या चित्रपटात आढळत नाही.
बांगलादेशी पत्रकाराच्या पत्नीवर व इतर स्त्रियांवर पाकिस्तानी लष्कराधिकार्‍यांकडून सततचे होणारे बलात्कार, फारुख शेख यांनी रंगवलेला बंडखोर, स्वातंत्र्याचा आग्रह धरणारा नेता असे अनेक प्रसंग आणि पात्रे बांगलादेशचे अराजक प्रतीकात्मकरीत्या उभे करण्याचा प्रयत्न करीत असताना वारंवार रक्ताने वाहणार्‍या गटारी, प्रेतांवर दीर्घकाळ स्थिरावणारा कॅमेरा याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. काही अंतराने दर वेळी येणारी ही दृश्ये चित्रपटाच्या कथानकाला सूचक दृश्ये म्हणून आधार देत असली, तरी ही भीषणता नंतर किळसवाणी वाटायला लागते.
अर्थात, युद्धे, राजकीय अस्थिरता या सगळ्याचा मानवी अंगाने वेध घेताना जगभरातील चित्रपटांनी नेहमीच त्यातील भीषण बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुर्दिश चित्रपट टरटल्स कॅन फ्लाय・या चित्रपटातील हिंसाचारात होरपळलेल्या लहान मुलांची स्वप्न पाहण्याची केविलवाणी धडपड असो, वा हिटलरने निर्माण केलेल्या हिंसाचाराचे पडसाद उमटवणारे येऊन गेलेले अनेक चित्रपट असोत, या पठडीतल्या प्रत्येक चित्रपटाला मनोरंजनापेक्षा त्या त्या हिंसाचाराची मानवी बाजू अधिकाधिक डोळसपणे दाखवण्याची काळजी घ्यावी लागली आहे. 挿पॅटन・या चित्रपटामध्ये दुसर्‍या महायुद्धानंतरची उत्तर आफ्रिका आणि जर्मनीचे केलेले चित्रण, वा सोमालियामधील दोन हेलिकॉप्टर्स अतिरेक्यांनी उडवल्यानंतरची लष्करी कारवाई, जपान व अमेरिका यांच्यात पर्ल हार्बर, हिरोशिमा व नागासाकी येथे घडत आलेला हिंसाचार टोरा टोरा टोरा・या जपानी चित्रपटातून दाखवला गेला आहे.
या धर्तीवर देवव्रत यांचा चित्रपट बांगलादेशच्या 1971च्या इतिहासाला निव्वळ उजाळा देणारा ठरतो. त्यात देवव्रत अंगावर आणणारी भीषणता आणि भविष्याचे सूतोवाच यापलीकडे हा चित्रपट नेण्यात फारसे यशस्वी ठरले नसले, तरी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना समाजाची एक अस्थिर बाजू पाहावयास मिळते. पांढरपेशा आणि सुरक्षित आयुष्य जगू पाहणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाला अवतीभवतीचं राजकारण इतकं भीषण रूप धारण करू शकतं, याची हा चित्रपट प्रचिती देतो. याचमुळे आज भारतात बांगलादेशी नागरिकांची निर्वासित म्हणून ठिकठिकाणी स्थलांतरे झाली आहेत, हेदेखील आपल्याला सतत जाणवत राहते.

अशा चित्रपटांना खरे तर वास्तवाची सोबत सोडून चालत नाही. पण अशा प्रकारच्या विषयांमध्ये वास्तवाइतकेच काल्पनिक नाट्यही भरलेले असते. अशा वेळी चित्रपटाची कसोटी लागते ती विषयांची संवेदनशीलता जपण्यामध्ये. हे खरे की, देवव्रत यांचा चित्रपट क्लासपुरत्या अडकलेल्या चित्रपटांमध्ये मोडत असला, तरी काही बाबतीत मात्र तो मुख्य प्रवाहाचा अनाठायी मेलोड्रामा पकडून आहे. अशा चित्रपटांनी दाहक वास्तव दाखवताना वास्तवाचा भावनिक अंगाने अतिरेक केल्यास तो चित्रपट निव्वळ अतिशयोक्तिपूर्ण ठरू शकतो, याचे भान राखणे गरजेचे आहे. देवव्रत यांच्या चित्रपटात हे भान काही अंशी बर्‍याच ठिकाणी सुटले आहे. तरीही कलात्मक चौकटीतून सामाजिक वास्तव दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न पुढे येऊ घातलेल्या अशा आशयाच्या चित्रपटांसाठी नक्कीच आश्वासक आहे.
(priyanka.dahale@dainikbhaskargroup.com)