आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफबीट गुंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरतरीत नि तीक्ष्ण नाक, डोक्यावर विशिष्ट शैलीत गूढ वाटावी अशी हॅट, ओव्हरकोट, पायातील बुटांचा आवाज न करता मांजराच्या पावलांनी पण दिमाखदार चालण्याची लकब आणि ‘हाउंड ऑफ बास्करव्हिल’सारखी अनेक प्रकरणे भयाकडून भयापासून मुक्तीकडे नेत सोडविण्याची हातोटी... हे सगळे आठवले की हा शेरलॉक होम्स आहे, हे कुणालाच वेगळे सांगावे लागत नाही.
पण शेरलॉकसारखे व्यक्तिमत्त्व शरदिंदू बंडोपाध्याय यांच्या ‘ब्योमकेश बक्षी’ला नाही. ब्योमकेश बक्षी शेरलॉकचा भारतीय अवतार आहे, असेही थेटपणे म्हणता येणार नाही. पण ब्योमकेशला ज्या काळात शरदिंदू यांनी कागदावर उतरवले, त्या काळातील बंगालची पार्श्वभूमी, भारतीय व बंगाली संस्कृती त्याच्याभोवती चोखपणे गुंफली गेली होती. त्याच्या हाती येणार्‍या केसेसही भारतीय मनोवृत्तीचा वेध घेऊनच शरदिंदू यांनी सोडवल्या होत्या.

या साहित्यकृतीवर मालिका आली, त्या वेळचा काळ म्हणजे १९९३चा. १९९७नंतर या मालिकेचे दुसरे पर्वही मालिकेच्या लोकप्रियतेमुळे सुरू करण्यात आले होते. रजत कपूर यांनी ब्योमकेशची मुख्य भूमिका या मालिकेत निभावली होती. तांत्रिकदृष्ट्या फार प्रगत नसलेला तो काळ होता. पोस्टाने येणारी पत्रे, तार याला ब्योमकेशच्या कथांमध्ये विलक्षण महत्त्व होते. कमीत कमी संपर्कसाधनांच्या व तंत्राच्या जोरावर क्लिष्ट केसेस सोडविणे, या ब्योमकेशच्या हातोटीने ब्योमकेशला लार्जर दॅन लाइफ अशा प्रतिमेत अडकवले नाही, त्यामुळे सामान्य प्रेक्षकांना ब्योमकेश चटकन अपील करणारा ठरला
होता. के. के. रैना, प्रतीक्षा लोणकर आदींनी या मालिकेमध्ये भूमिका निभावल्या होत्या. के. के. रैना यांचा ब्योमकेशचा सहकारी अजित बंडोपाध्यायदेखील ब्योमकेशइतकाच लक्षात राहणारा. आजही दूरदर्शनवर या मालिकांचे पुन:प्रसारण केले जाते, हा भाग याहून वेगळा.

वीस वर्षांपासून दिबाकर यांच्या मनात हा ब्योमकेश घर करून होता. आपल्याच भूमीवरील ही साहित्यकृती अशी मनात ठसणे तसे दिबाकर यांच्या बाबतीत अत्यंत स्वाभाविक होते. मात्र, आव्हान होते ते तांत्रिकदृष्ट्या थ्रील निर्माण करता येणार्‍या आजच्या काळात अशी मागल्या काळातील तीही हेरगिरीची कथा दाखविण्याचे. आपल्या पहिल्या चित्रपटानंतर खरे तर दिबाकर यांना ब्योमकेश बक्षीवर चित्रपट काढायचा होता. मात्र, अशा प्रकारच्या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसचे गणित पेलता येईल का, अशी साशंकता वाटण्याची स्थिती त्या वेळी होती. आताही या चित्रपटाच्या बाबतीत फार वेगळे चित्र नाही. पण त्यातल्या त्यात एका समाधानकारक पातळीवर हा चित्रपट यश मिळवतो आहे.

या यशापलीकडे या चित्रपटाकडे बघायचे झाले तर बर्‍याच दिवसांनी शेवट ठाऊक असूनही शेवटाची उकल कशी हाेते, हे बघण्यात उत्सुकता नि रंजकता टिकविणार्‍या शैलीतील हा चित्रपट आहे. चित्रपटाचे संगीत, स्वातंत्र्यपूर्व बंगाल,
कोलकात्यामधील धगधगता काळ, त्या काळातील कोलकातामधील गल्ल्या, लाल बझार हे सगळे उभे करताना
ब्योमकेशबरोबर कोलकाता हे एक स्वतंत्र पात्र म्हणून वावरते. ‘कहानी’ या चित्रपटानंतर इतक्या सशक्तपणे एखाद्या शहराला पात्र वाटण्याइतपत पडद्यावर साकारणारा चित्रपट म्हणून दिबाकर यांच्या ‘ब्योमकेश बक्षी’चे नाव घ्यायला हरकत नाही.

स्नेहा खानवलकरच्या संगीताशी शहर जवळीक साधत असताना ब्योमकेश एका खुनामागची उकल शोधत असतो. मात्र ही उकल शोधत असताना चित्रपट पार्श्वभूमीवर जी प्रतीके वापरतो, त्या काळातील दळणवळणाची जी साधने वापरतो, त्याने ब्योमकेशचा केवळ काळच नाही तर मागल्या पिढीच्या किती तरी स्मृती जिवंत केल्या आहेत. या सगळ्यात विशेष म्हणजे, दिग्दर्शकाने सायरनचा फार मोठा उपयोग सबंध चित्रपटात करून घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात, तेही दुसर्‍या महायुद्धाची पार्श्वभूमी असताना, सायरनला कोलकात्यात विशेष महत्त्व होते. सायरन वाजला की सगळे आपापल्या घरात गुडूप होणार, रस्त्यावरचे दिवे, घरातले दिवे बंद होणार, दुकाने बंद होणार, हा सर्वसाधारणपणे सायरनचा अर्थ. मात्र, चित्रपटात अशा प्रकारे सायरनचा वापर करण्याबरोबरच खलनायकाची दिशाभूल करणे असो वा कोलकाता सुरक्षित असल्याचा इशारा असो, सायरनचा यासाठीही वापर करण्यात आला आहे. केवळ यासाठी म्हणून सायरनचा वापर विशेष ठरत नाही, तर सायरन ब्योमकेशच्या सत्य शोधण्याच्या प्रवासात एक महत्त्वाची भूमिका बजावतो, इतर मनुष्य पात्रांपेक्षाही. यातच दिग्दर्शकाने पर्सोनिफिकेशन उत्तमरीत्या साधण्यात यश मिळवले आहे.

चित्रपटाचा नायक अर्थातच ब्योमकेश बक्षी साकारताना सुशांतने घेतलेली मेहनत चित्रपटाचा हेतू साध्य करते. मात्र, त्याच्याबरोबर अजित बॅनर्जीची भूमिका साकारणारा आनंद तिवारी, अंगुरीची भूमिका साकारणारी स्वस्तिका मुखर्जी,
डॉ. अनुकूल गुहाची भूमिका साकारणारे नीरज कबीदेखील तितकेच लक्षात राहणारे. चित्रपटातील या पात्रांबरोबर बाटाच्या डुप्लिकेट शूजपासून ट्रामपर्यंत प्रत्येक निर्जीव वस्तू सिनेमॅटोग्राफरने जिवंत केली आहे.

या चित्रपटाचा नायक ना कादंबरीत हाणामारी करणारा होता, ना प्रत्यक्ष चित्रपटात. त्याला नायिकेबरोबर डान्स करतानाही दाखवून चालणार नव्हते. ‘सैया रा मैं सैया रा’ म्हणत नायिकेबरोबर पळून जाण्याचा ‘एक था टायगर’मधील सलमान खानचा ग्लॅमरस गुप्तहेरही दाखवून चालणार नव्हता. ब्योमकेश हा बंगाली धोतर नेसून फार फार तर फुटबॉलला किक मारून खेळणार्‍यांकडे भिरकावणारा त्यातल्या त्यात स्टायलिश नि स्टंटसीन देऊ शकत होता. मुळात ब्योमकेश हा भारताचा शेरलॉक असला तरी तो भारताचा आहे नि इथल्या मातीतला आहे, हे लेखकाने केलेले ब्योमकेशचे रेखाटन पडद्यावर साकारताना दिबाकर यांना नक्कीच एक आव्हानच होते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील भारतातील एक तेही स्वातंत्र्य चळवळींच्या बाबतीत आघाडीवर असलेले शहर जसेच्या तसे उभे करणे नि त्याच काळातील एका केसचा उलगडा सत्यान्वेषी ब्योमकेश बक्षीने करणे, हा कमालीचा ऑफबीट गुंता दिबाकर यांनी तांत्रिकदृष्ट्या अचूक साकारला आहे.

जर प्रेक्षक चाणाक्ष असेल तर सुरुवातीच्या, पहिल्या प्रसंगातच शेवटाचा अंदाज येतो, पण तरीही चित्रपटाची गंमत जात नाही. सत्यान्वेषीला प्रसंगी तासन‌्तास एखादे कोडे एका जागी बसून सोडवावे लागते, हेदेखील दिग्दर्शकाने एका प्रसंगातून चोखपणे दाखवले आहे. मध्यंतराआधीचा व मध्यंतरानंतरचा चित्रपट या दोन वेगवेगळ्या कलाकृती ठराव्यात, दोन्हीचे चांगले-वाईट गुण पडताळता यावेत; पण त्याचबरोबर ते एकत्रही वाटावेत, इतका हा चित्रपट प्रत्येक दृश्यानिशी सकस होत गेला आहे. या चित्रपटाला आर्थिक यश किती मिळेल, याबाबत साशंकता असली तरी एक कलाकृती म्हणून सर्व पातळ्यांवर हा चित्रपट एक वेगळीच भेट आपल्या पुढ्यात ठेवतो, हे मात्र नक्की.

dahalepriyanka28@gmail.com