आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकॉलॉजिकल थ्रिलर...एक चकवा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही वर्षांपूर्वी ऊर्मिला मातोंडकर अभिनीत ‘कौन’ (1999) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाने सायकॉलॉजिकल थ्रिलर ही चित्रपटशैली बॉलीवूडमध्ये हिट फॉर्म्युला म्हणून अधोरेखित केली. हॉलीवूडपटांपासून प्रेरित होऊन बनवण्यात आलेल्या ‘कौन’नंतर सायकॉलॉजिकल थ्रिलर्सची लाट येणेही स्वाभाविक होते. प्रत्यक्षात घडलेही तसेच. मात्र बॉलीवूडचा मसाला या शैलीच्या मूळ रचनेमध्ये ओतण्याचा अट्टहास केल्याने असे अनेक हिंदी चित्रपट परिणामकारकता हरवून बसले. अशाच प्रकारे ‘एक व्हिलन’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट परिणामकारकता हरवल्याने केवळ नावालाच सायकॉलॉजिकल थ्रिलर ठरला.

‘एक व्हिलन’ हा मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपट कथेची सुरुवात तशी चांगली करतो. अंगी विक्षिप्तपणा असलेल्या व्यक्तिरेखेच्या वागण्या-बोलण्यातून थरार निर्माण होणार, अशी प्रेक्षकाला हलकीशी आशाही दाखवतो. रितेश देशमुखची ही व्यक्तिरेखा सुरुवातीला या गृहीतकावर शिक्कामोर्तब करायलाही लागते. पण जिचा खून झाला आहे, त्या श्रद्धा कपूरच्या आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या प्रेमकहाणीचे विस्तृत वर्णन तद्दन प्रेमपटांच्या शैलीत आल्याने गोची होत जाते ती अखेरपर्यंत. अर्थात, प्रेमकथेतही मानसशास्त्रीय पैलू शोधता येतात, हे जरी खरे असले तरी या चित्रपटात मनोविश्लेषणात्मक चिकित्सा दृश्यात्मक पातळीवर केलेली दिसत नाही. नपेक्षा रितेशच्या विक्षिप्त वागण्यापासून सुरू झालेला थरार प्रेमकहाणीपर्यंत व तिथून प्रतिशोधापर्यंत पुढे सरकताना व्यक्तिरेखांचे मानसशास्त्रीय पैलू दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने संवादपातळीपर्यंत मर्यादित ठेवला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत प्रेक्षक सायकॉलॉजिकल थ्रिलर या भावनेच्या अमलाखाली राहत नाही. आपण पाहतोय तो सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे, या वास्तवाची काही मोजकीच दृश्ये आठवण करून देत राहतात.

अर्थात, ‘एक व्हिलन’ने अशा प्रकारे शैली हरवून बसणे नवीन नाही. ‘आय सॉ द डेव्हिल’ या 2010मध्ये आलेल्या किम जी वून दिग्दर्शित दक्षिण कोरियन चित्रपटापासून प्रेरित हा चित्रपट आहे, असे दिग्दर्शकाने स्वत:च म्हटले आहे. (‘आय सॉ द डेव्हिल’मध्ये खुनी खून कसा करतो, इथपासून तो का करतो, त्यामागे त्याची काय कथा आहे, इथपर्यंत खुनामागचे कारण प्रेमाशी निगडित दाखवताना निव्वळ एक साखरपुड्याची अंगठी इतकाच संदर्भ शेवटी दिला आहे. ‘एक व्हिलन’मध्ये या मानसिक गुंतागुंतीला अभावानेच स्थान दिले गेले आहे.) अशा ‘प्रेरित’ होऊन केलेल्या या चित्रपटांची आपल्याकडे मोठी संख्या आहे. पण प्रेरित होऊन चित्रपट करताना मूळ चित्रपटाने राखलेले शैलीचे भान मात्र आपल्या हिंदी चित्रपटांनी फारसे राखलेले नाही. यातच मग थोडाफार यशस्वी ठरलेला ऊर्मिलाचा ‘कौन’देखील येतो.

या चित्रपटातील व्यक्तिरेखा अशी का वागते, तिचा भूतकाळ काय आहे, तिला नेमके काय झाले आहे, वा तिच्या वागण्यातील होत गेलेल्या बदलांचे दृश्यपातळीवरचे रेखाटन करण्यात हा चित्रपट कमी पडतो. ‘द मेमेंटो’ या चित्रपटापासून प्रेरित होऊन प्रदर्शित केलेल्या ‘गजनी’ या चित्रपटाचेही असेच. आधी दाक्षिणात्य, नंतर हिंदी पडद्यावर आलेल्या या चित्रपटातून ‘मेमेंटो’मध्ये नायकाच्या केलेल्या निवेदनाची व त्यातून चित्रित केलेल्या घटनांमधून त्याच्या मनोविश्लेषणाची बाजूच काढून घेतली गेली. अ‍ॅक्शन्स व हळव्या प्रेमकहाणीवर भर दिला गेला. आमिर खानच्या अभिनयाने हा चित्रपट गाजला खरा; पण त्यातला मानसशास्त्रीय आशय कुठेतरी दडपला गेला.

‘अपरिचित’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या चित्रपटाचेही असेच. अर्थात, या दोन्ही चित्रपटांना सिडने शेल्डनच्या ‘टेल मी युवर ड्रीम्स’ या कादंबरीची व हॉलीवूड चित्रपट ‘द प्रायमल फिअर’ची प्रेरणा होती. मात्र ‘द प्रायमल फिअर’मध्ये ज्या पद्धतीने नायकाची दुष्ट लोकांचा खून करण्यामागची मानसिकता प्रेमकहाणीपेक्षा विश्लेषक पातळीवर मांडली आहे, तितकी ‘अपरिचित’मध्ये मांडली गेली नाही. त्यामुळे कथेला अधिक धार आणण्याऐवजी सतत नायकाने प्रेयसीत गुंतण्याच्या दृश्यांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. पर्यायाने हादेखील चित्रपट मूळ शैलीपासून दूर जातो. अर्थात, ‘तलाश’सारख्या काही चित्रपटांची उदाहरणे मात्र याउलट आहेत. ज्यात बर्‍यापैकी थरार निर्माण करताना मानसिक गुंतागुंतीत प्रेक्षकाला खिळविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. असेच उदाहरण फरहान अख्तर अभिनीत ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’ या चित्रपटाचेही देता येईल. या चित्रपटात दीपिका पदुकोणबरोबरची फरहानची प्रेमकथा फरहानच्या स्किझोफ्रेनियापेक्षा वरचढ होऊ दिलेली नाही. त्यामुळे शेवटपर्यंत फरहान आपल्या मानसिक द्वंद्वाशी कसा लढतो, त्यातून तो बाहेर येतो की नाही, याच उत्कंठेत प्रेक्षक खिळून राहतो. मात्र, दुर्दैवाने फरहानच्या अभिनयाच्या कौतुकाखेरीज या चित्रपटाला फारसे यश बॉक्स ऑफिसवर मिळाले नाही.

नेमके हेच बॉक्स ऑफिसच्या अनिश्चिततेचे सर्वश्रुत भय बॉलीवूडमधील दिग्दर्शकांना आहे. त्यामुळे मूळ शैलीपासून फारकत घेऊन मेलोड्रामा, रोमान्स हे घासून घासून गुळगुळीत झालेले प्रकार अधिक ठळकपणे सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये दाखवले जातात. प्रेक्षकाला मनाच्या पातळीवरचा थरार पचत नाही, हा भाबडा समज यामागे असल्याचे जाणवते. म्हणूनच, कदाचित ‘एक व्हिलन’मध्ये रितेशने विक्षिप्त व विकृत व्यक्तिरेखा कितीही चांगली साकारली असली, तरी तो केवळ संघर्ष निर्माण करणारे महत्त्वाचे पात्र म्हणून शिल्लक राहतो. त्याच्या नजरेतून सायकॉलॉजिकल थरार निर्माण होणे अपेक्षित असताना, चित्रपट भलत्याच मार्गावर जातो.

थोडक्यात, कथा तीच; फक्त फ्रेम बदलण्याचा आभास हिंदी चित्रपटसृष्टी शैली आणि आकृतिबंधाच्या बाबतीत आजवर करत आली आहे. ‘मर्डर-2’ या भट्ट कॅम्पमधल्या चित्रपटाने तर या शैलीची जवळपास चेष्टाच केली. हा चित्रपट सायकॉलॉजिकल थ्रिलरला अनुरूप असलेल्या शैलीशी केवळ सुरुवातीला व शेवटी चिकटून राहू शकला. सीरियल किलर तेही केवळ स्त्रियांनाच मारणारा, अशी संकल्पना असलेल्या ‘मर्डर-2’च्या निमित्ताने त्यापेक्षा कितीतरी पटींनी सरस ‘व्हेन द स्ट्रेंजर कॉल्स’ हा चित्रपट आठवतो.

या चित्रपटात संपूर्ण वेळ सीरियल किलर आपल्या घरात आहे, तो खुनी आहे, हे माहीत नसण्यापासून ते त्याच्यापासून सुटका करून घेईपर्यंत नायिकेची झालेली मानसिक घुसमट, तिचा स्वत:च्या मनाशी सुरू असलेला संघर्ष व नंतर प्रत्यक्षात खुन्याला चकवा देताना तिचा होणारा संघर्ष परिणामकारकरीत्या मांडण्यात आला आहे. शिवाय किलरला अटक होऊनही सतत तो आपल्याला मारायचा प्रयत्न करतोय, याचा होत असलेला भास दाखवताना चित्रपटाने खुनी माणसाची मनोवृत्ती व त्याच्यापासून सुटका करून घेणार्‍या नायिकेची प्रसंगोपात्त मनोवृत्ती ज्या ताकदीने विस्तारित वर्णनात व दृश्यभाषेतून साकारली आहे, ती ताकद ‘मर्डर-2’सारख्या चित्रपटांमध्ये अभावानेच आढळते. तरीदेखील अभिनय, प्रभावी संवाद आणि रंजक कथा याच्या नादात बहुतांश प्रेक्षक अशा चित्रपटांना माफ करून टाकतात. मात्र याच ‘गिव्ह अँड टेक’मुळे आपल्याकडे हिट फॉर्म्युला वापरण्याच्या नादात सायकॉलॉजिकल थ्रिलरला परिणामकारकता देणारी शैली अद्यापही बाल्यावस्थेत राहिल्याचे वास्तव लपून राहत नाही.