आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याच्या त्याच्या मनातला पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्यानं धो धो कोसळावं आणि मला चिंब भिजवावं, असं दर पावसाळ्यात वाटत असतं. हल्ली शहरातील इमारती, बंगल्यांच्या आडून कोसळणा-या पावसाची खूप वाट पाहावी लागते. पण तो कोसळायला लागला की मनात कवित्व, भजी, चहा सगळे आकार घ्यायला लागतात. रस्त्याने घाईघाईत चालताना सलवारवर चिखल उडत असतो, त्याचा मनात वैताग येत असतो.
आता सीझनल कुठले ड्रेस घालायचे याचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. पाऊस या सगळ्या विचारांच्या कधी सोबत असतो तर कधी असून नसल्यासारखा. व्यवहार्य जगाचे सगळे संदर्भ पावसाला आपण अनेकदा लावून टाकत असतो. त्यामुळे पाऊस कधी सवंगडी होतो तर कधी बॉयफ्रेंड.
या पावसालासुद्धा कुठे कसं कोसळावं हे चांगलं ठाऊक आहे. ओढणी गच्च ओली करून एखादीला पार ओलाचिंब करणारा पाऊस कधी एखाद्या ठिकाणी कोसळतच नाही. त्या ठिकाणी अगदी कोरडाठाक होऊन जातो एखादा ढग. मग तिथल्या एखादीला पावसात भिजण्यासाठी वाट पाहावी लागते.
मला आठवतं, आमचा ग्रुप पुण्यात असताना जून उलटला तरी पावसाची चिन्हे दिसेनात म्हणून लोणावळ्याला निघाला होता. आमचा ग्रुप म्हणजे आम्ही चौघीजणी. लोणावळ्याला पोहोचलो तर कळलं, पुण्यात पाऊस सुरू झालाय आणि लोणावळ्यात फक्त चार रिमझिम सरी.
पावसाला पण खट्याळपणे हुलकावणी देणं जमतं नाही का? थोडक्यात काय, पाऊस डिप्लोमॅट झालाय. आपल्या रूटीन आयुष्यातील आणखी एक शब्द या पावसाला मी लावून दिला.
या पावसानं कितीतरी प्रेमकविता फुलवल्या असतील आजपर्यंत. कितीतरी प्रेमी जीवांना धीर दिला असेल. पुरामध्ये सगळा संसार वाहून गेला तरी याच पावसानं चार मळेसुद्धा फुलवले असतील. परवाच आमच्या घरातली कामवाली बाई सांंगत होती, गावाकडच्या आमच्या एक गुंठा शेतीत पेरणी केली होती ती फळाला आली बघा. बरं झालं पाऊस पडला एकदाचा. तिच्या या हाश्श हुश्श करण्यानं पाऊससुद्धा केवढा सुखावला असेल.
प्रत्येकासाठी अशा तºहेनं पाऊस वेगवेगळी नावं घेऊन येतो. संततधार कोसळणं फक्त त्याला ठाऊक असतं असं नाही. तोसुद्धा परीक्षा पाहतो. चार महिन्यांपुरतीच हिची माझ्याशी दोस्तीय का हे पडताळून पाहतो. तसं नसलं तर मग हलकेच कोसळतो. मी त्याला मिठी मारते, पण तो तितक्याच निसरडेपणानं निसटून घेतो. उरल्या महिन्यांचा विरह कोण सहन करणार?
माझ्या मनातला हा पुस्तकी पाऊस लोंढ्यांचे धक्के खात खात लोकलने प्रवास करणाºया एखादीच्या मनात कसा असेल? तिला वाटत असेल, घरी जाऊन गरम पाण्यानं मस्त आंघोळ करीन आणि मगच भाजी फोडणीला टाकीन. तिच्या लेखी हा पाऊस नेहमीचाच झालाय, धो धो कोसळणारा, रस्त्यावर चिखल करणारा.
आपल्याला नाही तरी परसॉनिफिकेशन करण्याची फार सवय आहे. पावसाला आपण आपल्याच बाकावर बसवतो, त्याच्याशी कुजबुजल्या स्वरात गप्पा मारतो. नीट कोसळ रे, फक्त रात्रीच पडून घे, दिवसा आम्हाला कामे असतात रे असं सांगितलं आणि जर त्यानं ऐकलं नाही तर हळूच त्याला एक चापट मारायची अन् म्हणायचं, ऐकशील तर तू पाऊस कसला?
या पावसासारखं आपणही आपल्या मनाचे राजे व्हावं असं आपल्याला कधी ना कधी वाटतच असतं. एखाद दिवशी नाही करायचा स्वयंपाक, नाही जायचं ऑफिसला. नुसतं खिडकीतून पाऊस न्याहाळत राहायचं असं कधी जमणार आपल्याला? जरा निवांत झालं तर नाही नाही, पोरं अजून शाळेतून यायचीयत, त्यांच्यासाठी नाश्ता करून ठेवायचाय. हा पाऊस काय नेहमीचाचंय, असं म्हणत एखादी नोकरी करून घर सांभाळणारी ती पटकन स्वयंपाकघरात पळते. तिच्या लेखी पाऊस नेहमीचाच पाहुणा.
पाऊस हळूहळू कॉलेजमध्ये शिरायला लागतो. कॉलेजमधली गर्दी त्याला तरुण करून टाकते. जरा पाऊस कोसळला तर ही तरुण मंडळी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटतात. या मंडळींमधल्या एखादीला कुणी नुकतंच प्रपोझ केलेलं असतं. मग तिला हा पाऊस अगदी जिवाभावाचा वाटून जातो. नजरेत ‘तो’ सापडत नसताना ती पावसालाच त्याच्यापाशी घेऊन जायला सांगते.
काल असाच संध्याकाळी पाऊस पडत होता. मी छत्री घेऊन रस्त्यावर अगदी जपून चालत होते. एक आजीआजोबा पलीकडून चालत होते. आजी सारखी ओरडत होती, छत्री उघडा लवकर, नाहीतर सर्दी होईल. पण आजोबांकडून छत्री काही उघडली जात नव्हती. थोड्या वेळानं कळलं, आजोबा मुद्दाम छत्री उघडत नाहीयत. मला हसायलाच आलं. आजोबांसाठी पाऊस कसा उतारवयात तारुण्य घेऊन आला होता.
पाऊस तसा नेहमीचाच, त्याची रूपंही नेहमीचीच. पण प्रत्येकाच्या मनामध्ये तो वेगवेगळं रूप घेऊन बसलाय. तो कधी कुणाच्या कपाळावरची आठी होतो तर कधी कुणाच्या ओठी हसू. म्हणूनच तर आपल्या विश्वात हा पाऊस अगदी खोल रुजलाय.