आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Priyanka Dahale Story About Health Issues Faced By Young Girls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाळी चुकते तेव्हा दुर्लक्ष करू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी वयात येताना अनेक बदल अनुभवत
असते. या बदलांच्या संदर्भात आपल्या शरीरात
होणाºया घडामोडींकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवले
पाहिजे. मासिक पाळी ही या घडामोडींपैकी सर्वात महत्त्वाची.
ती नियमित येते अथवा नाही, काही त्रास होतो का, याचे
निरीक्षण करून त्यावर योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.


मुलींच्या शरीरात वाढत्या वयानुसार होणारा बदल म्हणजे मासिक पाळी. हार्मोनल चेंज हा आताच्या महिलांच्या तोंडचा परवलीचा शब्द झालाय. ‘आमच्या काळी या काळात बाजूला बसायचो, देवाला शिवायचो नाही, चौथ्या दिवशी आवर्जून न्हाणे व्हायचे इथपासून पाळी कधीच चुकली नाही, खूप व्यायाम रोजच्या कामातून होतो. त्यामुळे हमखास दर महिन्याला पाळी येतेच, फारसे तणावही नव्हते,’
असे मागली पिढी सारखी पुढच्या पिढीला सांगत असते. पण वर्तमानातील वाढत्या तणावांमुळे आजच्या पिढीतील 20 ते 25 या वयोगटातील मुलींची मात्र या ना त्या कारणाने पाळी अनियमित येत असते. अनेक जणींची तर पंधरा दिवस आधी येते वा सहा-सहा महिने येत नाही. यालाच वैद्यकीय भाषेत पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) म्हणतात.
पीसीओडीची समस्या 20 ते 25 वयोगटातील मुलींमध्ये अधिक प्रमाणात आढळते. नाशिकच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार यांच्या म्हणण्यानुसार, आजकाल दर दहापैकी सहा मुलींमध्ये ही समस्या आढळू लागली आहे. त्यातही समस्या नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर अधिकृत उपचार घेण्यास आलेल्या मुलींचेच प्रमाण अधिक.

आता हे पीसीओडी नेमके काय प्रकरण आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे. मुलीच्या बीजांडकोषामध्ये (ओव्हरी) उबाळू (सिस्ट) हा अनावश्यक भाग वाढतो व त्यामुळे पाळीतील अनियमितता वाढत जाते. सिस्टमध्ये नॉर्मल सिस्ट व चॉकोलेट सिस्ट असे दोन प्रकार असतात, जे दोन्ही कोषांमध्ये वाढू शकतात. त्याची लांबी जितकी जास्त तितकी पाळीच्या चक्रातील अनियमितता जास्त. अनेकदा सिस्ट सोनोग्राफीद्वारा ओळखले जाऊ शकतातच असे नाही. अर्थात सगळ्याच रुग्णांना शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय उपयोगी ठरत नाही. स्त्रीरोगतज्ज्ञांनी अधिकृतपणे दिलेल्या गोळ्या म्हणजे उपचार नियमित घेतल्यानंतर सिस्ट कमीदेखील होऊ शकतात. मात्र त्याबरोबर डॉक्टरांनी सुचविलेले जीवनशैलीतील बदलदेखील अमलात आणणे गरजेचे असते.

पाळी अनियमित येणे या पीसीओडीतील प्रमुख लक्षणाचा केवळ गर्भधारणेच्या दृष्टीने धोका नसतो तर यामुळे अकारण लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह,
केस अति प्रमाणात गळणे हे शारीर पातळीवर त्रास उद्भवतात तर चिडचिडेपणा, नैराश्य आदी मानसिक त्रासही पीसीओडीमुळे होऊ शकतात. त्यामुळे वरकरणी केवळ पाळीशी संबंधित दिसणारी ही समस्या इतक्या साºया आजारांना आमंत्रण देऊ शकते, त्यामुळे त्याकडे मुलींनी व त्यांच्या पालकांनी वेळीच गांभीर्याने पाहावे.

अलीकडील काळातल्या पिढीतच ही समस्या अधिक का उद्भवते याचे कारण डॉ. निवेदिता सांगतात, ‘अलीकडे ज्या मुली करिअर करतात वा नोकरी करतात त्यांना कामाचा, वाढत्या स्पर्धेचा अधिक ताण असतो. शिवाय जंक फूड, अति गोड वा अति तिखट खाणं या सवयी त्यांच्या शरीरावर परिणाम करतात. मुख्य कारण खरे तर वाढता तणावच आहे, जो मुली नीट पेलायला वा सांभाळायला शिकत नाहीत. योग्य व्यायाम न करणं, वेळी-अवेळी खाणं, जरा काही दुखलं तर ऊठसूट स्ट्राँग अ‍ॅँटिबायोटिक्स घेणं अशी अनेक कारणे पीसीओडीची समस्या उद्भवण्यामागे आहेत.’

पण ही समस्या उद्भवलीच तर अनेकदा मध्यमवर्गीय घरांमध्ये फारसे गांभीर्याने त्याकडे लक्ष पुरवले जात नाही. घरगुती वा आयुर्वेदिक उपचारांवरच अधिक भर दिला जातो. गीता (नाव बदलले आहे) ही एक सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून पुण्यातील एका कंपनीत दिवसाचे तब्बल 18 तास काम करणारी 28 वर्षांची तरुणी याबाबत आपला अनुभव सांगते, ‘मी 22 वर्षांचे झाले तरीही मला सहा ते सात महिने पाळी येत नव्हती. सात महिन्यांनंतर आली की पोटात प्रचंड दुखायचं व खूप रक्तस्राव व्हायचा. कधी पाळी दोन दिवसांत आटपायची.

माझं वजन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. खाण्यावर नियंत्रण मिळवलं तरी मनावरचा कामाचा ताण जात नव्हता. पालकांच्या सूचनेनुसार तºहतºहेचे उपाय करून पाहिले. पपई खा, हे खा, ते खा, आयुर्वेदिक गोळ्या घे वगैरे वगैरे. अकारण आता येईल मग येईल अशी वाटही पाहून झाली. शेवटी माझ्या ओळखीच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेले. सोनोग्राफी केली, पोटात 4 सेंटिमीटर लांबीचा सिस्ट निघाला. अर्थात आता समस्या इतकी हाताबाहेर गेली होती की शस्त्रक्रिया करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. शस्त्रक्रिया केल्यानंतर जरा कुठे आता मी थोडी स्थिरस्थावर झालेय.’
पण डॉ. निवेदिता सांगतात, ‘वेळीच ही समस्या लक्षात घेऊन योग्य उपचार घेतले तर समस्या हाताबाहेर गेली नसती. जीवनशैलीत बदल केले तर ही समस्या आटोक्यात येऊ शकते. आपण मनाला व शरीराला शिस्त लावली, योग्य उपचार घेतले तर शरीर पूर्ववत काम करू शकते. कारण शस्त्रक्रियादेखील भविष्याची पूर्णत: हमी देऊ शकत नाही.’ शिवाय त्या सांगतात, ‘डॉक्टरांचा योग्य सल्ला न घेता पाळी येण्यासाठी केलेले उपचार म्हणजे चुकीच्या पथ्यापासून घरातूनच सुचविलेल्या गोळ्यांपर्यंतचे उपाय अनेकदा अघोरीही ठरू शकतात.’

सुरुवातीलाच पीसीओडीचे निदान झाल्यास ही समस्या फारशी गंभीर स्वरूप धारण करत नाही याचा अनुभव 23 वर्षांच्या मानसीला (नाव बदलले आहे) आला. नाशिकमध्ये एचआर म्हणून काम करणाºया मानसीलादेखील वर्षभरापूर्वी पाळी नियमित येत नव्हती. मात्र घाबरून न जाता, घरगुती उपचार न करता तिने थेट स्त्रीरोगतज्ज्ञांची भेट घेतली. त्यांनी सांगितल्यानुसार जीवनसत्त्वं, लोह व पीसीओडीसाठीच्या (पीसीओडी आहे असे निदान झाल्यानंतर) गोळ्या घेतल्या, गोड व जंक फूड खाणं कमी केलं, नियमित योगासने आणि पुरेशी झोप व वेळेवर जेवण अशी पथ्ये पाळली. त्यामुळे केवळ एक वर्षात मानसीची विनाशस्त्रक्रिया समस्या सुटली. आता तिची पाळी नियमित येते आहे शिवाय सोनोग्राफी पुन्हा केल्यानंतर सिस्टचीही लांबी बरीच कमी झाल्याचे निदान बघून तिचा तणाव कमी झाला आहे.
खरे तर पाळीकडे आपली मागली पिढी अजूनही पारंपरिक दृष्टिकोनातून बघते. मात्र बदलत्या काळानुसार पाळी येण्या-न येण्यामागच्या कारणांचा वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार करायला हवा.

हार्मोन्स हे पूर्ण शरीराचा पोत, त्याचे निरोगीपण ठरवत असतात. शिवाय मनाचा निरोगीपणाही हार्मोन्सवर अवलंबून असतो. हात मोडण्याएवढे हार्मोन्सशी निगडित समस्यांना सहजपणे घेता येत नाही. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याअभावी हार्मोन्सशी निगडित उपचार घेणे म्हणजे जिवाशी खेळणेच आहे. केवळ पुनरुत्पादनाशी निगडित पाळीची समस्या नाही. ती गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते, हे लक्षात घेतलेच पाहिजे.

dahalepriyanka28@gmail.com