आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Dahale Story About Womencentric Films At IFFI, 2014

नातेसंबंधांचा समकालीन परीघ व्यापणारे चित्रपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘नवरा काही तरी किडुकमिडुक काम करून पैसे कमावतोय नि लक्ष्मीच्या दोन मुलांना व आपल्या पहिल्या पत्नीपासूनच्या दोन मुलांना पोसतोय. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या व जेमतेम शिकलेल्या लक्ष्मीला घर कसे चालवायचे हा प्रश्न रोज सतावतोय. अशात तिला एक महिला भेटते, सरोगसी व्यवसायात उतरल्यानंतर मिळणा-या पैशाचा पर्याय लक्ष्मीसमोर खुला करते नि तिथून लक्ष्मीचा त्या पैशासाठी शारीरिक-मानसिक वेदनांचा प्रवास सुरू होतो.’ ईशानी दत्ता यांनी बनवलेल्या ‘वूम्ब ऑन रेंट’ या माहितीपटाचा हा आशय. तो गोव्यात नुकत्याच झालेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला.

तसे या महोत्सवामध्ये चित्रपट, लघुपट आणि माहितीपट अशा गटांमध्ये सुमारे पावणेदोनशे चित्रपट दाखवले गेले. या महोत्सवामध्ये महिला दिग्दर्शक आणि स्त्रीकेंद्रित कथांवरील चित्रपट हा स्वतंत्र विभाग जरी नसला तरी ब-याच चित्रपटांनी स्त्रीकेंद्रित विषय हाताळलेले दिसले. तसेच महिला दिग्दर्शकांचाही यामध्ये उल्लेखनीय सहभाग होता.
पण या महोत्सवात दाखवल्या गेलेल्या चित्रपटांचा विशेष म्हणजे स्त्रीकेंद्रित विषयांना दिलेला उत्तर आधुनिकतेचा स्पर्श आणि बदलत्या काळानुसार नात्याची परिभाषा बदलत असताना त्यात स्त्रीचे काय स्थान आहे याविषयी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केलेले भाष्य आहे. त्यामुळे लक्ष्मीची सरोगसी व्यवसायात उतरल्यानंतरची व्यथा ही आजची आहे. आमिर खानने सरोगसीद्वारे अपत्य पत्करल्याचे आपण वाचतो वा त्याविषयीच्या सेलिब्रिटी स्तरावरील प्रतिक्रिया वाचतो, पण प्रत्यक्षात सरोगेट मदरची अवस्था काय असते, तिला कोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, जन्माला येणा-या मुलाबाबतचे प्रश्न, मोबदला मिळताना होणारे गैरव्यवहार हे या ‘वूम्ब ऑन रेंट’मध्ये ईशानी यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
लक्ष्मी तिच्या पोटात वाढणा-या, पण तिच्याशी काहीही नाते नसणा-या बाळामुळे चिंतेत आहे, तर ‘लिबास’मधली शबाना आपली मुळे नक्की कुठे स्थिर राहू शकतील या विवंचनेत सापडलेली आहे. १९८८ सालचा गुलजार यांचा हा काही कारणास्तव प्रदर्शितच होऊ न शकलेला हा चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला नि तो पाहणारे प्रेक्षक नशीबवान ठरले. पण त्याहीपेक्षा या चित्रपटातून गुलजार यांनी २६ वर्षांपूर्वी जो अत्यंत आधुनिक व तितक्याच संयततेने प्रश्न मांडला तो विलक्षण होता. तो प्रश्न होता विवाहबाह्य संबंधांचा. आज नात्यांना कुठल्याही कंपार्टमेंट्समध्ये बसवता येत नाही. समाजाने घालून दिलेल्या नियमांचा अनेक नात्यांच्या बाबतीत आता नव्याने त्यावर विचार करायची वेळ आली आहे, यावर या चित्रपटातून भाष्य करताना शबाना आझमींची व्यक्तिरेखा नात्याच्या चौकटीत अडकू न पाहणारी, त्या त्या क्षणी कुणाकडेही आकर्षित होणारी, तिच्या इच्छा-आकांक्षा नि शेवटी सगळे मनासारखे मिळूनही येणारी अस्थिरता साकारताना, अलीकडील नैतिक-अनैतिक या गुंत्यात फसणा-या नातेसंबंधांवर मोकळेपणाने बोलू पाहते. तिची मनोवस्था जशी आहे तशीच जगू पाहते, त्यात तिला समाजाच्या धाकाने बदल करावासा वाटत नाही, हा जो महत्त्वाचा मुद्दा ‘लिबास’मधून दाखवला गेला तो समकालात अत्यंत तीव्र झाला आहे.

आई होणे ही किती सुंदर भावना आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण कुठली स्त्री कुठल्या पद्धतीने आई होते, त्यावर तिच्या पोटातले मूल नि तिची नैतिकता तोलण्याची पद्धत आहे. आधुनिकतावादाकडे आपल्यासारखीच चीनमधील झुकलेली पिढी या एका भावनेच्या बाबतीत विचित्र गुंत्यात सापडली आहे. महोत्सवात चीनच्या चित्रपटांवर यंदा अधिक जोर होता. त्यामुळे चीनमध्ये नातेसंबंधांबाबत सध्याचा काळ कसा आहे याचेही प्रतीकात्मक असे चित्र बघावयास मिळाले. ‘फाइंडिंग मिस्टर राइट’ हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटातील भावनोत्कट तमाशाच. पण आपल्या विवाहित बॉयफ्रेंडच्या घटस्फोटाची वाट पाहत आई होण्यासाठी न्यूयॉर्कला केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या चिनी तरुणीची कथा समकालातील वेगवान बदलांची व भावनिक गुंत्यांची जाणीव करून देते. आपली पत्नी अधिक कमावते म्हणून ती निवडेल त्या शहरात स्थायिक होऊन परिस्थिती स्वीकारणारा नवरा नि त्याच्या प्रेमात पडणारी ही चिनी तरुणी आपल्या बॉयफ्रेंडलाही सोडते, अशा विचित्र, गुंतागुंतीच्या कथेमध्ये स्त्री हा केंद्रबिंदू वेगवेगळ्या अंगांनी दाखवण्यात आला होता.

भारतामध्ये समकालीन नृत्यशैली रुजविणारे उदय शंकर यांचे नाव नृत्यक्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांच्यावरील चरित्रपट नॅशनल फिल्म अर्काइव्हजच्या वतीने या महोत्सवात दाखवण्यात आला. तो पाहताना चटकन उदय शंकर यांच्या कार्यप्रवासाखेरीज आणखी एक बाजू लक्षात येते ती म्हणजे त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या नात्यांनी जोडल्या गेलेल्या दोन स्त्रिया. त्यांच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या कामिनी या महत्त्वाकांक्षी तरुणीने त्यांना त्यांच्या कलासक्त स्वभावाकडून व्यवहाराकडे नेणे वा त्यांच्याबरोबर नृत्य करणा-या व नृत्य हीच साधना मानणा-या एका तरुणीचे त्यांना त्यांच्याप्रमाणे घडण्यात साहाय्य करणे. या दोघीजणी उदय शंकर यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

‘द डे आय बिकेम अ वुमन’ हा मारिझिए मेश्किनी दिग्दर्शित इराणी चित्रपट इराणच्या राजकारणातील क्रांतीपूर्व व नंतरची परिस्थिती अप्रत्यक्षपणे अधोरेखित करतो, ज्यात स्त्रीचे भोगणे नि सोसणे अंतर्भूत आहे. इराणमध्ये क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर महिला दिग्दर्शनाकडे वळल्याचा सकारात्मक सूर महोत्सवात उपस्थित असलेले इराणी दिग्दर्शक मोहसीन मखमलबाफ यांच्या बोलण्यात जाणवला. त्यांच्याच चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. ईशानी दत्ता, मखमलबाफ यांच्या बोलण्यातून स्त्रीचा समकालातील राजकीय-सांस्कृतिक-सामाजिक पटलावरील चेहरा बदलला असला तरी तिच्यापुढील समस्या दिवसेंदिवस चेहरा बदलून अधिक गंभीर होत चालल्या आहेत. पण स्त्रियाही तितक्याच नेटाने त्याच्याशी आपल्या पद्धतीने लढू बघताहेत असा सूर दिसला.

अलीकडील मनोवृत्तींचे चित्रण वरील चित्रपटांसारख्या माध्यमांतून स्त्रियांच्या बाबतीत होताना दिसून आले. यात रवी जाधव यांच्या ‘मित्रा’ या लघुपटाने महत्त्वाचे भाष्य केले ते समलैंगिकतेवर. १९४७मध्ये होत असलेली एका तरुणीची समलैंगिक असण्यामुळे होणारी घुसमट, स्वातंत्र्य मिळूनही ते नक्की कुणाला मिळाले असा प्रश्न पडायला लावणारी तिची अवस्था या लघुपटातून दाखवण्यात आली. ‘किल्ला’ या अविनाश अरुण दिग्दर्शित चित्रपटातही नव-याविना मुलाला वाढवताना तरुण विधवेला आजच्या काळातही कसे परिस्थितीला सामोरे जावे लागते, मुलाला आपले ताण न सांगता त्याचे विश्व समजून घेत ती कशी तग धरते, हे या चित्रपटात नेमकेपणाने दाखवण्यात आले.

या सगळ्याच चित्रपटांचे आशय व ते मांडण्याची शैली बघता, समकालाशी जुळवून घेत वर्तमानातील प्रश्न मांडण्यावर या चित्रपटांचा भर असल्याचे जाणवले. मात्र, या सगळ्या प्रश्नांची मुळे अद्यापही भूतकाळातच आहेत हेदेखील या चित्रपटांनी अधोरेखित केले.
दिग्दर्शक-पत्रकार सुदेष्णा रॉय यांनी चित्रपटांच्या बदलत्या संहितांवर बोलताना महिला व पुरुष यांच्यात आता समसमानतेची पातळी कलाक्षेत्रात निर्माण झाली आहे याची जाणीव नव्याने करून दिली. एकूणच मुद्दाम स्त्रीकेंद्रित सिनेमा असा वेगळा भाग न करताही या चित्रपटांचे अस्तित्व ठळकपणे महोत्सवात जाणवावे इतपत अशा चित्रपटांचे समाधानकारक प्रमाण या महोत्सवात जाणवले.