आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Dahale's Artical On 2013 Bollywood Film

एका सशक्त बदलाची नांदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडने या वर्षी आपली शंभरी साजरी केली. ही शंभरी साजरी करताना गतकाळातील अनेक बदलांचे आत्मपरीक्षण करण्याचे महत्त्वाचे कामही बॉलीवूडने या वर्षी केल्याचे अनेक चित्रपटांनी सिद्धही केले. बॉलीवूड सामान्य माणसाशी किती जोडले गेले आहे, याचे प्रत्यंतर देण्यापासून, क्लासपासून मासेसपर्यंतची अनेक भावविश्वे, स्थित्यंतरे चित्रपटात येऊ लागली आहेत. सिनेमाची चौकट मेलोड्रामापासून वास्तवापर्यंत प्रवास करताना अधिकाधिक सशक्त होऊ लागली आहे. बॉलीवूडमध्ये या वर्षी आत्मपरीक्षण करण्याची प्रक्रिया ठळकपणे केली गेली, हे याचे प्रतीक आहे.
चित्रपट शताब्दीच्या निमित्ताने ‘बॉम्बे टॉकीज’ नावाच्या चित्रपटातून हिंदी सिनेमांच्या सामाजिक प्रभावाची ओळख मांडण्यात आली. या चित्रपटाला खरे तर लघुपटमालिका म्हणता येईल. ‘मुरब्बा’सारख्या लघुपटातून स्टारडम असणा-या कलाकाराची पूजा करणारा सामान्य प्रेक्षक वा कतरिना कैफच्या ‘शीला की जवानी’ या आयटम साँगमुळे प्रेरित होऊन तसेच नृत्य करण्याचे स्वप्न बघणारा लहान मुलगा वा काही सेकंदांचा रोल करण्यामध्येही जगण्याची समृद्धता जगणा-या नवाजुद्दीन सिद्दिकीची सामान्य माणसाची भूमिका हे दाखवताना बॉलीवूडचे अनेक कंगोरे दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप, झोया अख्तर, करण जोहर यांनी दाखवले. बॉलीवूड आता संक्रमणावस्थेतून बाहेर पडून ठोस अशी भूमिका घेणा-या चित्रपटांनी व्यापतो आहे, हे या चित्रपटाने अधोरेखित केले. केवळ तंत्रज्ञान वा केवळ आशय याच्या आहारी न जाता समांतर आणि कमर्शियल या दोहोंचा मेळ साधण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक दिग्दर्शकांनी याच वर्षी केला, असे म्हणावे लागेल.
2013 चे चित्रपट पाहता कलाकारांच्या प्रतिमा अमुक एका साच्यात बसवता येत नाहीत. स्वत:च्या अभिनयापेक्षा दिसणे सिद्ध करणा-या जॉन अब्राहमचा ‘मद्रास कॅफे’मधला अभिनय पाहता त्याच्याविषयीचा स्टिरिओटाइप या वर्षाने बदलून टाकला. शुजित सरकार या नव्या विचारांच्या दिग्दर्शकाच्या या राजकीय पार्श्वभूमीवर अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट भाष्य करणा-या चित्रपटाने बॉलीवूडच्या विषयांची व्याप्ती किती वाढत चालली आहे, हे सिद्ध केले. हिंदी चित्रपटांमधून मुंबईचे जे चित्र दाखवले गेले, त्याच्या अगदी उलट एक अत्यंत हळुवार, साधीसोपी, निरागस महानगरीय संवेदना असलेली कहाणी ‘लंचबॉक्स’ या चित्रपटातून दाखवण्यात आली. ‘टेबल नं. 21’ या चित्रपटाने सस्पेन्स आणि थ्रिलरच्या स्वरूपात रॅगिंगचा विषय मांडला. पण आशयावरची सामाजिक पकड मात्र सोडली नाही. समकालीन तरुण पिढीची आत्मकेंद्रितता, करिअर ओरिएंटेड स्वभाव, प्रेरणा पकडण्याचा प्रयत्न या वर्षी काही चित्रपटांनी केला. ‘रंगरेझ’ या प्रियदर्शनच्या चित्रपटातून तरुण वयातली चंचलता, व्यवहारीपणा, उपभोगी वृत्ती दाखवण्यात आली. तर ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटातला हीरो हा ध्येयवेडा आहे, त्याला करिअर हवंय, तो कुठे अडकत नाही, पण शेवटी त्याला आयुष्यभर करिअर पुरते की नाती; याचाच निर्णय घ्यावा लागतोय, हे दाखवताना या चित्रपटाने आजच्या पिढीला या आपल्या विश्वात सामावून घेतले. बॉलीवूडचा रोमँटिसिझम बदलतो आहे, हेच या चित्रपटांतून जाणवते. राकेश रोशन यांनी ‘क्रिश 3’मध्ये भारतीय भावविश्व जपून तंत्रज्ञानाची एकांगी बाजूच न जपता यांत्रिकपणे सुपरहीरो न साकारता एक सक्षम विचारधारा रुजवणारा, माणूसपण जपणारा सुपरहीरो साकारला.
वितरकांना चित्रपटाचे हक्क न देण्यावरून ‘विश्वरूपम’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला. तसाच त्यातील अत्यंत संवेदनशील कथानकामुळेही वाद निर्माण झाला होता.
कमल हासनची बिरजू महाराजांशी साधर्म्य साधणारी भूमिका, त्याचा विविधांगी अभिनय आणि कथानकातील उत्कृष्ट सांधणीमुळे हा चित्रपट लक्षात राहील. ‘स्पेशल 26’ या चित्रपटाच्या माध्यमातून नीरज पांडे या दिग्दर्शकाने व्यवस्थेवर अत्यंत उपरोधिक आणि मार्मिक भाष्य केले. अक्षयकुमारच्या स्टारडमपेक्षाही मनोज बाजपेयीने साकारलेला सीबीआयचा अधिकारी या चित्रपटातून भाव खाऊन गेला. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘काये पोचे’ या चित्रपटाने गोध्रा हत्याकांड, क्रिकेट, भूकंप अशा तीन घटना एकत्र करून एक चांगला चित्रपट प्रेक्षकांना दिला. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने कमालीची प्रशंसा व यश मिळवले. फरहान अख्तरच्या कारकीर्दीतील हा माइलस्टोन चित्रपट ठरला. चरित्रपट कसा असावा, हे या चित्रपटाने दाखवून दिले.
संगीताच्या बाबतीत हे वर्ष जेमतेमच ठरले. ‘कबीरा’सारखे रेखा भारद्वाजने गायलेले गाणे वा ‘रामलीला’मधील गरबाची गाणी हा अपवादच. संगीत तांत्रिक-यांत्रिक होत चालले आहे, अशी ओरड होत असतानाच काही चित्रपटांमधील गाण्यांनी मात्र सुफी, सेमी क्लासिकलचा अनुभव दिला. संगीताचा पार्श्वभूमी म्हणून वापर करतानाही नवनवीन प्रयोग बॉलीवूड करतेय, याची जाणीव काही चित्रपटांनी दिली. या वर्षी चित्रपटांमधल्या नृत्यांमधली लोकसंगीत, वेस्टर्न क्लासिकलला साधणारी जवळीकता अनुभवायला मिळाली. एनी बडी कॅन डान्स, क्रिश 3, रामलीला, रंगरेझ यांसारख्या चित्रपटांमधून ही जवळीक प्रकर्षाने बघायला मिळाली. थोडक्यात, बॉलीवूडचे आता वय झाले आहे; पण त्यात वृद्धत्व नाही, तर सक्षमता येत चालली आहे. चाकोरीबद्ध संहिताही चाकोरीच्या बाहेर नेऊन ती पचवण्याची सवय बॉलीवूड आता प्रेक्षकाला लावत आहे.
वय झाले पण वृद्धत्व नाही...
संगीताचा पार्श्वभूमी म्हणून वापर करतानाही नवनवीन प्रयोग बॉलीवूड करतेय, याची जाणीव काही चित्रपटांनी दिली. या वर्षी चित्रपटांमधल्या नृत्यांमधली लोकसंगीत, वेस्टर्न क्लासिकलला साधणारी जवळीकता अनुभवायला मिळाली. एनी बडी कॅन डान्स, क्रिश 3, रामलीला, रंगरेझ या चित्रपटांमधून ही ते प्रकर्षाने बघायला मिळाले. बॉलीवूडचे आता वय झाले आहे; पण त्यात वृद्धत्व नाही, तर सक्षमता येत चालली आहे.
बॉक्स ऑफिस हिट्स
1. क्रिश 3
2. चेन्नई एक्सप्रेस
3. ये जवानी है दीवानी
4. भाग मिल्खा भाग
5. ग्रँड मस्ती
6. रेस 2
7. गोलियों की रासलीला रामलीला
8. आशिकी 2
9. स्पेशल 26
10. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा
11. रांझणा
dahalepriyanka28@gmail.com