आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Dahale's Artical On Sanjaylila Bhansali

भन्साळींचे काव्यपट.....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बाहों के दरमियाँ दो प्यार मिल रहें हैं’ यांसारख्या गाण्यांमधून एरवी सरधोपट प्रेमकथांचा हिट फॉर्म्युला वापरणा-या चित्रपटांच्या पठडीतून स्वत:ला वेगळे काढत भन्साळी यांनी ‘खामोशी’ हा चित्रपट काढला. व्यावसायिकदृष्ट्या या चित्रपटाला फारसे यश लाभले नाही, पण समीक्षकांच्या पातळीवर या चित्रपटाचे प्रचंड कौतुक झाले होते.
विधू विनोद चोप्रा यांच्याकडे सहायक म्हणून परिंदा, 1942 : अ लव्ह स्टोरी यांसारख्या चित्रपटांसाठी काम करताना भन्साळी यांनी करीब या चित्रपटासाठी काम करण्यास नकार दिला. स्वत:च्या दृष्टिकोनातून चित्रपट काढण्याची इच्छा असलेल्या भन्साळी यांनी 1996मध्ये खामोशी काढला आणि पहिल्याच चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळवली. अनेकदा समीक्षकांनी कौतुक केलेला दिग्दर्शक समांतर चित्रपटांच्या प्रवाहातच वाखाणला जातो, त्याला बॉक्स ऑफिसवरचे यश फारसे मिळत नाही; मात्र भन्साळी याला अपवाद ठरत गेले.
प्रेमत्रिकोण, चरित्रप्रेमकथा, साहित्यकृतीवर आधारित प्रेमकथा, ऐतिहासिक प्रेमकथा, घरंदाज प्रेमकथा हे प्रकार तसे बॉलीवूडला नवे नाहीत. त्यात भन्साळी यांनीही याच संकल्पना आपल्या पुढील चित्रपटांमध्ये वापरल्या. खरे तर त्याच त्या जुनाट संकल्पना म्हणून भन्साळी यांचे चित्रपट नेहमीच्या समीकरणामध्ये प्रेक्षकांनी, समीक्षकांनी बसवले असते; मात्र तसे झाले नाही. याचे कारण म्हणजे, भन्साळी यांनी आपल्या कुठल्याही चित्रपटात काही रूढ संकेत कटाक्षाने पाळलेले आहेत. त्याला कलात्मक स्पर्श देताना कुठेही भन्साळी यांनी या संकेतांचे खच्चीकरण होऊ दिलेले नाही.
देवदासमधील ‘डोला रे डोला’ गाणे असो; वा हम दिल दे चुके सनममधील ‘निमुडा निमुडा’ हे गाणे असो, या गाण्यांमध्ये नायिका या सुंदर दिसतात, मादक (सेन्शुअस) दिसतात; पण व्हल्गर वा अश्लील दिसत नाहीत. या चित्रपटांमधील प्रेमकथा ही कुठल्याही शरीरसंबंधांचे टोक गाठत नाही. संवादांमधून, भावाभिनयातून प्रेमाची अत्युत्कट अभिव्यक्ती होत राहते. एकमेकांवरचे असीम प्रेम, विरह ‘तडप तडप...’ यांसारख्या गाण्यांमधून व्यक्त करताना भन्साळी यांच्या चित्रपटाला कुठल्याही उसन्या बोल्ड सीन्सची गरज वाटत नाही.
भन्साळी यांच्या चित्रपटात एक प्रकारचा -ह‍ीदम जपलेला दिसतो. त्यांच्या चित्रपटांमध्ये कथाविष्कारापेक्षा एक चित्राकृती साकारलेली असते; ज्यात लय, नाद, सौंदर्य यांचा पुरेपूर वापर आढळतो. गुजारिशच्या निमित्ताने दिग्दर्शकाबरोबरच संगीत दिग्दर्शकाचीही भूमिका निभावताना त्यांनी चित्रपटभर एक दीर्घ कविताच चालू असल्याचा भास निर्माण केला होता. गुजारिशच्या कथेशी बहुतांश साधर्म्य असलेला गुजारिशच्या आधीचा सुखांत हा ज्योती चांदेकर आणि अतुल कुलकर्णी अभिनीत मराठी चित्रपट येऊन गेला होता, ज्यात सामाजिक आशय गंभीरपणे मांडला होता. मात्र, गुजारिशमध्ये हाच आशय भन्साळींनी आपल्या नजरेतून दाखवताना मरणाची वेदनाही सुंदर वाटेल इतपत काळजी घेतली होती. गोव्याच्या मनमोहक दृश्यांबरोबर गुजारिशमधल्या हृतिकने निभावलेल्या जादूगाराचे घरही यासाठी विचारपूर्वक दाखवले होते.
भन्साळी यांच्या चित्रपटांमधील केवळ कलाकारांचे अभिनय चित्रपटाची कथा सांगत नाहीत, ना त्यांचे संवाद. वा केवळ अभिनय, संवाद आणि कथेपुरतेच त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाहीत. भन्साळी यांचे चित्रपट पाहताना कॅमेरा साकारत असलेली सेट्सची भव्यता, सौंदर्याची प्रासादिकता, विविध कलात्मक फ्रेम्सदेखील नजरेत भरतात, ज्या सामान्य प्रेमकथेला एक उंची देऊन ठेवतात.
प्रेमकथांमधील गृहीत धरलेल्या प्रणयदृश्यांना, प्रणयकथांना भन्साळींनी खास लूक देऊन ठेवलेला आहे. नायिका वा नायक यांचा विविध पोश्चर्समधून व्यक्त होणारा प्रणय, प्रेम हे एखाद्या पुरातनकालीन राजमहालातील खांबांवर कोरलेल्या प्राचीन मूर्तींप्रमाणे वाटते.
त्यात सेक्सपेक्षा सेन्शुअ‍ॅलिटी अधिक असते. ही सेन्शुअ‍ॅलिटी दाखवताना त्यांच्यामधील चित्रात्मकता भन्साळींनी पुरेपूर रंगवली आहे.
वास्तवाशी या बाबी कितपत जुळतात? ब्लॅकमधील अमिताभ व राणीचे जे ऑब्सेस होत गेलेले नाते दाखवले, ते प्रत्यक्षात असतात का? असे प्रश्न व्यवहार पातळीवर कुणालाही पडण्यासारखे आहेत. पण प्रत्येक जण आपल्या विशिष्ट फेजमध्ये प्रेमाचे काव्यात्मक रूप मनात ठेवून असतो, ज्यातली भव्यता त्याला नेहमीच हवीहवीशी वाटत असते. ही अ‍ॅस्पिरेशनल प्रेरणाच नेमकी भन्साळी यांनी आपल्या चित्रपटांमधून साकारली.
अर्थात, सांवरिया या त्यांच्या चित्रपटाने सगळ्याच बाबतीत अतिरेक केल्याने सपाटून आपटी खाल्ली. पण याही चित्रपटातील केवळ निळ्या रंगाच्या शेड्समध्ये साकारलेली दृश्ये हा एक वेगळा प्रयोग म्हणावा लागेल. रामलीलाचे ट्रेलर्स सुरू झाले तेव्हा पुन्हा एकदा भन्साळी स्टाइल भव्यदिव्यता प्रेमामध्ये पाहायला मिळणार, असा अंदाज होता; जो खराही आहे. रामलीलामधले प्रियंका चोप्राचे नृत्य हे आधुनिक काळापर्यंत जोडण्याचे भन्साळी यांचे शैलीच्या दृष्टीने नवे माध्यम असले तरी दीपिका पदुकोणचा ‘ढोल बाजे’सारख्या गाण्यावरील गरबा, बदले रे दिल का भूगोल यांसारख्या या गीतांमधल्या ओळी, रणवीर आणि दीपिकाच्या प्रेमामधील उत्कटता, त्यातील संघर्ष, सुप्रिया पाठकची आव्हानात्मक भूमिका या सगळ्यातून पुन्हा एकदा सांगीतिक काव्य भन्साळी यांनी मांडले असले तरी या सांगीतिक काव्यपटामधून व्यक्त केले गेलेले, दाखवलेले देखणेपण हे निश्चितच नेत्रसुखद आहे. कथेपेक्षा या नेत्रसुखदतेला महत्त्व देणारा प्रेक्षक अशा चित्रपटांकडे वेगळ्या नजरेने पाहतो. या चित्रपटांमधला संघर्ष अशा नेत्रसुखदतेमुळे अतिरिक्त तणाव निर्माण करीत नाही; पण कविता, प्रेम, चित्र, भारतीय संस्कृतीच्या बॉलीवूडने रंगविलेल्या, सजावट केलेल्या चौकटी यांचा पुरेपूर वापर केल्याने असे चित्रपट एक प्रकारचा रिलीफ देतात. वास्तवापासून भारतीय संस्कृतीच्या या सजवलेल्या चौकटी कितीही दूर असल्या तरी पडद्यावर त्याचे केलेले देखणे चित्रण प्रेक्षकाला भावून जाते. कथेला गती असली की असा चित्रपट सगळ्याच बाबतीत यश मिळवून जातो. राम आणि लीला यांचे एकत्रित नाव देऊन शब्दचमत्कृतीबरोबरच अशा वर उल्लेखलेल्या अनेक अंगांनी आपला चित्रपट सजवणा-या भन्साळी यांचे अशा काव्यात्मक चित्रपटांमध्ये राखलेले सातत्य हेच रूढार्थाने यश म्हणावे लागेल.