आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नातलं नातं प्रत्यक्षात उतरलं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलीच्या मनातल्या गुलाबी कप्प्यात हा विषय अगदी लहानपणापासूनच फुलत असतो, पण हा जपलेला कप्पा उघडतो मात्र लग्न ठरल्यावर. आपण ‘नवरी’ होणार, ही कल्पनाच मुळात इतकी हुरळून टाकणारी असते की, तुम्ही तुमच्याही नकळत त्या दिवशीचं तुमचं रूप आधी मनात रेखाटता. ज्या दिवशी हे स्वप्न सत्यात उतरतं, तो दिवस कधीही न विसरता येण्याजोगा..
आजवर, “एक वर्ष कसं संपेल, तुला कळणारसुद्धा नाही.” किंवा “पहिलं वर्ष तर कसं येतं अन‌् कसं जातं, पत्ताच लागत नाही.” असा काहीसा आशय असलेल्या वाक्यांचं मला भारी आश्चर्य वाटायचं. किंबहुना, असं बोलणारे लोक मला काहीसे वेडसर वाटायचे. विशेषतः दिवस बघ कसे हा हा म्हणता उडून जातील, हे वाक्य मला जास्तच हास्यास्पद वाटतं. त्यामुळे वर्ष कधीच ‘हा हा’ म्हणता निघून जाऊ शकत नाही, अन‌् तसं व्हायचंच असेल तर तुम्हाला जवळपास ३६५ दिवस ‘हा हा’ म्हणावं लागेल, यावर माझं ठाम मत होतं. असो. परवा लग्नाला एक वर्ष झालं, अन‌् माझं हे गृहीतक चांगलंच कोलमडून पडलं.
मला आठवतंय, साधारण दीड वर्षापूर्वी आयुष्यात एकमेव विषयात रस उरला होता, तो म्हणजे ‘लग्न’. अर्थात प्रत्येक साधारण मुलीच्या मनातल्या गुलाबी कप्प्यात हा विषय अगदी लहानपणापासूनच फुलत असतो, पण हा जपलेला कप्पा उघडतो मात्र लग्न ठरल्यावर. अन‌् मग आसपासची कुठलीच गोष्ट त्याहून महत्त्वाची वाटत नाही. तुम्ही मनात घेतलेले कित्येक निर्णय अगदी तुम्हालाही याच काळात कळतात. आपण ‘नवरी’ होणार, ही कल्पनाच इतकी हुरळून टाकणारी असते की, तुम्ही तुमच्याही नकळत त्या दिवशीचं तुमचं रूप आधी मनात रेखाटता, अन‌् त्यानुसार पुढची खरेदी करता. थोडक्यात, तुम्हाला काय हवंय, यासाठी प्रत्यक्ष दुकानात जाण्याची गरज भासत नाही. तो निर्णय कधीच झालेला असतो. आता फक्त ती गोष्ट मिळवायची असते. माझ्या बाबतीत तरी असंच झालंय. या गोष्टीचा त्रास माझ्या घरच्यांना किती झाला असेल, याची जाणीव मला आत्ता होतेय; पण त्या क्षणी मात्र त्यांची लाडकी मुलगी नवरी होण्याची तिची हौस पुरेपूर पूर्ण करून घेत होती, अन‌् ते सर्व जण माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी अगदी काहीही करायला तयार होते. शेवटी कित्येक दिवसांपासून उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या वेडावून टाकणाऱ्या स्वप्नाचा प्रश्न होता. अखेर तो दिवस आला, अन‌् कित्येकदा स्वप्नात पाहिलेलं माझं रूप, मी पहिल्यांदाच आरशात पाहिलं. त्या क्षणी इतक्या भावना मनात होत्या, की नेमकं काय वाटतंय, हे कळलंच नाही.
हातात हिरव्यागार बांगड्या, मला हवा होता अगदी तसा शालू, अन‌् ज्या गोष्टीच्या मी आकंठ प्रेमात होते, त्या म्हणजे मुंडावळ्या. यासाठीच तर मला ‘नवरी’ व्हायचं होतं. लोकांशी बोलताना जरा मान हलली की, अगदी डौलदारपणे मुंडावळ्यादेखील हलायच्या. मला खरंच मज्जा वाटत होती त्या साऱ्याची.
आपण नवरी झालोय, याचा आनंद गगनात मावत नव्हता. मग हळूहळू एकेक विधी पार पडत गेले, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी आली, कपाळावर भलं मोठं ठसठशीत कुंकू आलं, कन्यादानातून मी अगदी जाहीरपणे चौसाळकर झाले, अन‌् लोकांनी आग्रहाने घ्यायला लावलेल्या उखाण्यातून या सर्वाची जाणीव अगदी ठळकपणे व्हायला लागली. हळूहळू भान येत गेलं, की आपण तर इतके दिवस अर्धवटच स्वप्न पाहिलंय. माझ्या प्रत्येक स्वप्नात मी फक्त नवरी झाले होते. पण आजचा नाममात्र हा एक दिवस सोडला, तर जन्मभरासाठी मी कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून, कोणाची तरी वहिनी असणार होते. अख्ख्या एका घराची जबाबदारी माझ्यावर येणार होती. इतके दिवस आईची ऐकून न ऐकल्यासारखी केलेली अगदी सगळी कामं मला करावीच लागणार होती. हे समजायला लागलं, अन‌् मग मात्र लग्न हे केवळ गोड स्वप्नापुरतंच उरलं नाही. त्याचे अजूनही खूप सारे अर्थ होते, जे मी आजवर सोयीस्कररीत्या दुर्लक्षितच ठेवले होते. भातुकलीचा खेळ मांडून केवळ मजेसाठी खेळण्याइतकं लग्न नक्कीच सोपं नाही, हे कळायला फारसा वेळ लागला नाही. पण “जगात कोणीच जन्मजात सगळं शिकून येत नाही. अन‌् अशी कुठलीच गोष्ट नाही, जी मला जमणार नाही” या वाक्याचा हात करकचून पकडला, अन‌् देवदत्तसोबत नगरला आले.

मला आजही तो प्रवास आठवतोय. चमच्यापासून बादलीपर्यंत संसारात लागतील, अशा ज्या काही गोष्टी होत्या, त्या एका गाडीत जवळपास कोंबल्या. अन‌् प्रवासाला निघालो. त्या पाच तासांत फारसं काहीच बोललो नाही. खरं तर सलग पाच मिनिटंही शांत बसणं माझ्यासाठी फार कठीण कर्म असताना पाच तास न बोलता राहणं म्हणजे प्रसंग खरोखर गंभीर होता.
रस्त्यावरच्या खड्ड्यांसोबत खणखणाट करणारी भांडी वातावरण अधिकच भयाण करत होती. एकीकडे मनात भातुकलीचा खेळ आठवत होता, पण त्यातील भांडी कधीच इतका आवाज करायची नाहीत, हेदेखील कळत होतं. कदाचित माझ्या इतकाच तोदेखील या बदलाला घाबरला होता; पण आम्ही दोघांनीही मनातली भीती चेहऱ्यावर येऊ दिली नाही. कदाचित इतका समजूतदारपणा पेलण्याइतके आम्ही दोघेही मोठे झालो होतो. पुढचे दोन दिवस तर स्वप्नाहून सुंदर होते. आम्ही दोघे मिळून घर लावत होतो. लग्न लावून दिल्यावर घरही लावून देण्यासाठी आईवडिलांची मदत घेणं आम्हाला रास्त वाटलं नाही, अन‌् याचा मला मनापासून सार्थ अभिमान वाटतो. आजपर्यंत एका वर्षात आम्ही एकूण तीन घरं बदलली, अन‌् प्रत्येक वेळी आम्ही हा कुटाणा इतर कोणाच्याही मदतीविना केला. हे कदाचित मोठं होत असल्याचं लक्षण होतं.
एक ना अनेक नवनवीन अनुभव पदरी पडत गेले. काही चांगले होते, काही वाईट. काहींनी पाठीवर थापही मारली, अपेक्षेपेक्षा जास्त कौतुक केलं, ओळख नसतानाही मदत केली. माझ्यासाठी नवीन नोकरी शोधताना, माझं अस्तित्व परत घडवताना. असंख्य बदल होत गेले. अपेक्षा बदलत गेल्या. अन‌् त्या साच्यात बसता बसता दोघांच्याही नाकी नऊ यायला लागले. त्यातल्या त्यात एक अप्रतिम गोष्ट होती, ती म्हणजे आमचे पहिले सण, अन‌् ते सगळे जोरदार साजरे करायचा दोन्ही आईंचा उत्साह. दोन्ही घरातून मिळणारं अमाप प्रेम, कौतुक, लाड या साऱ्या वर्षावातून परत एक उत्साह यायचा संसाराला सामोरं जाण्याचा. दोन्ही घरातून मिळणारं अमाप प्रेम, कौतुक, लाड या साऱ्या वर्षावातून परत एक उत्साह यायचा संसाराला सामोरं जाण्याचा.

पण या सगळ्या बदलांतून जाताना आम्ही दोघेही कधीच एका क्षणासाठीदेखील ‘एकटे’ नव्हतो. कदाचित हाच लग्नाचा खरा अर्थ होता. आनंद, उत्साह, बालिशपणा, मिश्कीलपणा, ताण, गोंधळलेपण, राग, नैराश्य या प्रत्येक भावनेत एकमेकांचा आधार होता.

अन‌् या साऱ्या प्रसंगातून एक गोष्ट उलगडत गेली, ती म्हणजे ‘नवरा–बायको’ एकमेकांचे केवळ ‘नवरा–बायको’ कधीच नसतात. ते तर फक्त समाजाने त्या नात्याला दिलेलं नाव आहे. पण वेळोवेळी प्रसंगानुसार आपण आपलं स्थानदेखील बदलत असतो. कधी मी त्याची आई असते, कधी मैत्रीण, तर कधी मित्रदेखील. अन‌् मीदेखील कित्येकदा त्याला बघतेय माझी आई होताना, माझा प्रियकर होताना, माझा मित्र होताना. काहीही झालं, तरी ही एक व्यक्ती कायम माझ्या सोबत असणारच, ही ठाम भावनाच तुम्हाला नवनवीन संधी शोधण्यासाठी मदत करते. अन‌् मग हा संसाराचा दुरून कठीण वाटणारा प्रवास तितकासा कठीण उरत नाही. उलट प्रत्येक अडचणीतून तुम्ही काहीतरी शिकता, काहीतरी शिकवता, संबंध अजूनच घट्ट करता. खऱ्या अर्थाने जगता, अन‌् तुमच्या बरोबरीने सोबतच्यालाही तितक्याच रसिकतेने जगायला लावता.
एका वर्षापूर्वीची मी अन‌् आत्ताची मी, यात खूप तफावत आहे. लग्न म्हणजे जबाबदारी, मोठेपण, दडपण, घरकाम या साऱ्या गृहीतकांत हरवत जाणाऱ्या मला हलवून जागं करणारा, माझ्यातल्या कवयित्रीला, गायिकेला, लेखिकेला सतत जिवंत राहण्यासाठी स्फूर्ती देणारा, माझ्या कर्तृत्वावर माझ्याहूनही जास्त विश्वास ठेवणारा ‘तो’ म्हणजे लग्नाचा खरा अर्थ.
पूर्वी स्वप्नात कधीच न पाहिलेला हा सुंदर प्रवास जगणं म्हणजे लग्न. स्वप्नापेक्षाही सत्य सुंदर असू शकतं, याचा नव्याने अनुभव घेणं म्हणजे लग्न. अन‌् आत्ता लेख लिहिताना लक्षात आलं, कधीच स्वप्नातही पाहिलं नव्हतं, इतक्या सुंदर स्वतःच्या घरात बसून मी हे लिहितेय. न बघितलेली स्वप्नंही मिळून साकार करणं, म्हणजे लग्न. ‘नवरी’ इतक्याच सुंदरपणे ‘बायको’ होणं म्हणजे लग्न. झालेल्या बदलाची जाणीव झाली, तरी त्यासाठी लागलेल्या काळाची मात्र कधीच जाण झाली नाही; अन‌् खरंच, हे अख्खं एक वर्ष, “हा हा म्हणता” निघून गेलं देखील.
pathakpriyankasat@gmail.com
बातम्या आणखी आहेत...