आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काहे दिया' ते 'होम मिनिस्‍टर'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी मालिकांचे ‘हुशार’ लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळे मिळून इतक्या दिवसांत जी गोष्ट मराठी घरात पोहचवू शकले नाहीत, ती होम मिनिस्टरमधल्या एका वृद्ध दांपत्यानं पोहचवली. अवघ्या काही मिनिटात. काय होती ती गोष्ट...

गेले बरेच दिवस मनात हा विषय सतत रेंगाळतोय. पण बहुतांशी महिलांच्या मनाच्या अगदी जवळ असलेल्या गोष्टीबद्दल असं उघडपणे वाईटसाईट बोलावं का, हा विचार मनात डोकावायचा, अन मग सगळं अवसानच गळून जायचं...
(महिलावर्गाला केवळ पुरुषवर्गच दबकून असतो असं नाही. कुठची ओळ कुणाला कशी लागेल, अन कशाचा काय अर्थ निघेल, याचा भरवसा नसल्याने आजकाल लिहितानादेखील हजार वेळा विचार करावा लागतोच.)
 
असो, पण परवा मात्र पाणी डोक्यावरून गेलं, अन इतके दिवस अडवून धरलेली माझी लेखणी, अगदी सिनेमातील नटीने वडिलांनी करकचून पकडलेला हात झटक्यानिशी सोडवत बेभान होऊन नटाकडे पळत सुटावं, तशी काहीशी मोकाट सुटली.
तशी झी मराठी. ही वाहिनी म्हणजे तमाम लग्न झालेल्या, लग्न होऊ घातलेल्या मराठी ‘मुलींची’ आराध्य देवता असते. म्हणजे सुनेने कसं वागावं, कसं वागू नये,किती सहनशील सुसंस्कृत, सभ्य, सर्वगुणसंपन्न असावं आदींची व्याख्या चपखलपणे झी मराठी वर्षानुवर्षे मांडत आलंय. मग यातून आम्हाला मंजिरी, जान्हवी, मेघना, इत्यादी सोशिक, रडक्या, मुक्या अन तरीही (आश्चर्यकारकरीत्या) ‘चांगल्या’ सुना मिळाल्या. या सगळ्यांनी मिळून मराठी विवाहसंस्थेला, अन लग्नानंतर मुलीकडून असलेल्या तथाकथित अपेक्षांना अशा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं की आयुष्यात पहिल्यांदाच, भूमिती अन भौतिकशास्त्राचे सारे नियम माहीत असूनही मला ‘उंची’ प्रचंड ‘खोल’ भासली. काही काळानंतर मात्र या नाटकी सभ्यतेचा कंटाळा आला, अन मी मराठी मालिकांपासून ठरवून दूर झाले.
 
पण मधे ‘काहे दिया परदेस’ सुरू झाली, अन गौरीच्या घरातलं हसतं-खेळतं वातावरण, वैचारिक प्रगल्भता, सुसंस्कृतपणा, प्रेमळ माणसं दिसली, अन काहीतरी चांगलं बघायला मिळतंय की काय, अस उगाच वाटून गेलं. आपल्या मुलीला स्वतःचे वेगळे विचार देणारं, तिला स्वबळावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहित करणारं घर बघून समाधान मिळालं. कालांतराने मालिकेचा नायक आला, दोघांचं लग्न ठरलं, अन त्यासोबतच मुलीकडचे, मुलाकडचे, मानापमान, मागण्या या साऱ्या जुन्या गोष्टी परत एकदा नव्याने शिकवल्या गेल्या अन त्याचसोबत त्यांनी माझ्या रुपात एक प्रेक्षक गमावला.
 
लग्न करून गौरी सासरी आली, ती डोक्यावर पदर, हातात भल्यामोठ्या बांगड्या, शरीरापेक्षा जड झालेला तो आंबाडा, कापरा आवाज, अन डोळ्यात सतत साचून राहिलेलं भेदरलेपण घेऊनच. एका स्वाभिमानी, स्वावलंबी,आत्मविश्वासू मुलीची छबी एका रात्रीत बदलली, अन मुलगी आणि सुनेतला (आजकाल अस्तित्वात नसलेला) हा हास्यास्पद बदल, सर्वांनी अजिबात काचकूच न करता पचवलादेखील. डोक्याच्या शिरा उडवण्यासाठी इतर मुद्दे कमी का पडले, म्हणून आपण अजून एक वाढवावा, या साध्या विचारातून मी या ‘परदेस’ला रामराम ठोकला. पण परवा सहजच टीव्ही लावला, अन अचानक झी मराठी समोर आलं. शाळेतली एखादी मैत्रीण अचानक बाजारात दिसावी, अन चेहेरेपट्टीवरून ओळख पटावी, तशी काहीशी ‘nostalgic’ का काय म्हणतात ती भावना मनात तरळली. ‘काहे दिया’च चालू होतं.
 
एक दीड मिनिटात सगळ्यांची ओळख पटली, अन शुक्ल साहेबांच्या घरातलं ताणलेलं वातावरण दिसलं. आपल्या सुनेची नौकरीची इच्छा फारशी कोणालाही मानवलेली दिसत नव्हती, अन त्यासाठी सगळे मिळून गौरी, तिची आई, आज्जी, वाहिनी, वडील आदींबद्दल वाट्टेल तसं बोलून मोकळे होत होते. हे सगळं आमची सोशिक (मूर्ख) गौरी मूकपणे ऐकून घेत होती.(आपल्या आईवडिलांचा होणारा अपमान शांतपणे ऐकून घेणं कुठच्या संस्कारात बसतं देव जाणे.) आश्चर्य म्हणजे या सगळ्या प्रकरणात (नावाचा) नट असलेला तिचा नवरा खोलीच्या कुठल्याशा कोपऱ्यात नजर लावून उभा. 
 
लग्नाआधी जी ‘मुंबईची मुलगी’ त्याला तिच्या आत्मविश्वासासाठी आवडली होती, तिच्या नोकरीत याचा हा वाटा बघून तळपायाची आग मस्तकात जात होती. एकंदरीत एका सुशिक्षित, सुसंस्कृत युगुलाने केलेलं प्रेम, अंतरजातीय विवाहाचा घेतलेला धाडसी निर्णय, यातून सांस्कृतिक बदल, भाषेच्या गमती, तरीही असलेली भावनिक समानता असं बरंच काही चांगलं दाखवता येऊ शकलं असतं. पण तरीही कट-कारस्थानांत आमचा जीव जास्त रमत असल्याने, आम्ही मनोरंजनासाठीदेखील त्याचीच निवड केली. यात कुठेही आम्ही प्रेमाला, सन्मानाला, विश्वासाला महत्त्व दिलं नाही.  प्रेमविवाह, कर्तृत्व, स्वातंत्र्य या साऱ्यांना डावलून या काळात हे असलं काही लिहिणं, अन दाखवणं, यात कोणालाच काही वावगं वाटलं नसेल का? या विचाराने मन उद्विग्न झालं.
 
अन तितक्यातच सुरू झालं ‘ होम मिनिस्टर.’ एरवी मी हा कार्यक्रम एक ‘विनोदी’ कार्यक्रम म्हणून बघायचे. पण आजचा नूर मात्र वेगळाच होता. आलेलं जोडपं वयस्क होतं. आजोबा ८६ वर्षांचे तर आज्जी ८०च्या आसपास. दोघेही अगदी हसतखेळत इतके वर्षांचा संसार परत आठवत होते. आजीबाई खुदकन हसत  ‘लाजत’ होत्या.
एका प्रश्नाचं उत्तर देताना आज्जी म्हणाल्या, “आमचं लग्न आईवडिलांनी ठरवलं. माझं शिक्षण केवळ चौथीपर्यंत झालं असूनही आजवर यांनी मला कधीच कमी लेखलेलं नाही की, माझ्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही. खूप सन्मान मिळाला मला या घरात.” (हे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले होते.) त्यावर आजोबा म्हणाले, “हिला बोलावं, असं हिने काही केलंच नाही कधी. हिने नेहमी मला सांभाळून घेतलंय. आज जे आहे, ते हिच्याच मुळे.” (ते बघत असताना नकळत माझ्या डोळ्यातदेखील पाणी तरळलं.) केवळ चार वाक्यात त्या दोघांनी लग्नाचं, विश्वासाचं, आनंदाचं, सन्मानाचं जणू प्रात्यक्षिक दिलं.
 
तो काळ, एकमेकांना न भेटता ठरलेलं लग्न, कमी शिक्षण अशी तक्रार करण्यासारखी अनेक कारणं असतानादेखील, ती दोघे एका आदर्श संसाराची जिवंत व्याख्या शिकवत होते. जी गोष्ट मालिकांचे (आजच्या ‘हुशार’ काळातले पदवीधर ) लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळे मिळून इतक्या दिवसांत पोचवू शकले नाहीत, ती त्या दोघांच्याही डोळ्यात दिसून गेली. अवघ्या काही मिनिटात. शिकण्यासारख्या गोष्टी आजूबाजूलाच वावरत असताना, धावत्यामागे पळण्यात काय शहाणपण?
 
pathakpriyankasat@gmail.com
बातम्या आणखी आहेत...