आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरसा (प्रियंका पाठक)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे आणि तिथली वाहतूक हा सर्वांच्याच आवडता चर्चेचा विषय. मधुरिमाच्या वाचक सखीने अत्यंत बोलक्या शब्दांत हा अनुभव टिपण्याचा प्रयत्न केलाय. या वाहतूक खोळंब्याचा त्रास करून न घेता रंजक पद्धतीने केलेले हे चित्रण..
सा डेसहा वाजले अन‌् एकदाची मी कंपनीतून घरी निघाले. ही वेळ म्हणजे हिंजवडीत साचलेल्या माहिती-तंत्रज्ञानाने तुडुंब भरलेल्या असंख्य बुद्ध्यांची घरी निघण्याची वेळ असल्याने, तिथल्या अरुंद रस्त्यांवर अगणित वाहनांनी कोंडी केलेली होती. आपापल्या परीने, किंबहुना आपल्यापुढील वाहक जाऊ देईल, त्यापरत्वे अनेक चाकं गरगरण्याचा प्रयत्न करत मार्गक्रमण करत होती. गर्दीत गाडी चालवण्याचे तोटे, तसेच फायदेदेखील आहेत. कारण तुमचा चुकूनही ‘गती वाढल्याने’ अपघात होऊ शकत नाही अन‌् तोलही जाऊ शकत नाही. मुळात गाडी चालवताना पाय वर घेण्याची संधीही जिथे मिळणं कठीण, तिथे वेग वाढणं जवळपास अशक्य. अन‌् या अवस्थेतही काहीतरी करामत करून तोल गेलाच, तरी तुम्ही फार तर शेजारच्या चारचाकीवर रेलले जाल. पण वाहनासकट साष्टांग नमस्कार घालण्याइतकी जागा, किमान इथे तरी तुमच्या नशिबी नाही.

स्वतः गाडीवर बसून कुठेतरी जाण्याला गाडी ‘चालवणं’ का म्हणतात, ‘पळवणं’ का म्हणत नाहीत, ते मला इथे कळलं. या गर्दीचा आणखी एक फायदा मी सांगू शकते. इतक्या कमी जागेतून आपली गाडी थोडी पुढे घेण्याच्या प्रयत्नात अनेकदा आपल्या गाडीचा आरसा अन‌् शेजारच्याच्या गाडीचा आरसा यांची जुनी ओळख निघते, अाणि इतक्या गर्दीतही ते दोघं एकमेकांची हातमिळवणी करतात. सायकलीवरून जाताना अचानक समोरून येणाऱ्या आपल्या मित्राला एखाद्या शाळकरी पोराने सहज टाळी द्यावी अन‌् पुढे जावं, असा काहीसा हा प्रसंग असतो. मुळात एरवी जर असा कोणाच्या गाडीचा हलकासा धक्का जरी लागला, तरी किमान एक साधारण शिवी मनात येणं अगदी साहजिक आहे. बरेचदा तर त्या व्यक्तीला गाठून ‘गाडी येत नसेल तर घरी लाव,’ ‘डोळे फुटलेत का?’ अशा काही ठरलेल्या ओळीही ऐकायला मिळतात. यात नवीन काहीच नाही. पण असा प्रसंग हिंजवडीत सहसा घडत नाही. इथे सगळेच मिळेल तेवढ्या वाटेतून आपली गाडी पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात असल्याने, असे प्रसंग किंबहुना अशा ‘भेटी’ होणारच, अशी मानसिक तयारी करूनच बाहेर पडलेले असतात. या वाहनसंग्रामात आम्ही संथपणे का होईना, पण जिद्दीने लढत देऊन अखेर आपापल्या भागाकडे जाणाऱ्या रस्ताला वळतो. सर्दीने नाक गच्च झालेलं असताना अचानक मध्येच थोडासा श्वास घेता आल्यावर जसं सुख मिळतं, तसं काहीसं या रस्त्यांवर मिळतं. तुमच्या गाडीला एक्सलेटर असल्याची आठवण करून देणारा हाच एक रस्ता असतो. आदित्य बिर्ला रस्त्यावरून चिंचवडकडे जाणाऱ्या रस्त्यावर मी काहीशा याच सुखावणाऱ्या भावनेतून वळले. आता छान लवकर घर गाठता येणार, या भावनेतून फारसं इकडेतिकडे न बघता मी अगदी तांत्रिकपणे रस्ता कापत होते. काही अंतरानंतर माझ्यासमोर एक दुचाकी आली. मनात असंख्य विचार, अन‌् उरलेलं लक्ष रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे असल्यामुळे मी आपल्यासमोर नेमकं कोण आहे, याकडे फारसं लक्ष दिलं नाही. केवळ समोरच्या गाडीत अन‌् माझ्यात पुरेसं अंतर आहे, याचा अंदाज घेण्यासाठी मी त्या गाडीचं मागचं चाक माझ्या नजरेच्या टप्प्यात ठेवलं होतं. आता रस्ता ‘रस्ता’ उरला नसून त्याची जवळपास ‘बोळ’ झाली असल्याने पुढच्या गाडीच्या पुढे जाणं अशक्य होतं. पण ती गाडी काही ‘गाडी’ म्हणून चालायला तयार नव्हती. अर्थात गर्दीत होतं असं, असा विचार करून मी पुढच्या परिस्थितीचा जरा अंदाज घेतला, पण पुढे रस्ता रिकामा होता. ते पाहून मात्र माझ्या कपाळावरच्या आठ्या बऱ्याच ठळक झाल्या. चिडून हॉर्नवर बोट जाणार, इतक्यात मला समोर गाडीवर बसलेले ‘ते दोघे’ दिसले, अन‌् आपोआप हॉर्नवरचं बोट, कपाळावरच्या आठ्या आपापल्या पूर्वस्थानी परतल्या.
गाडी एक आजोबा चालवत होते अाणि त्यांच्या मागे गाडीला घट्ट पकडून आज्जी बसल्या होत्या. अंगावर फिकट गुलाबी रंगाची फुलांची प्रिंट असलेली साडी, हातात ४-४ काचेच्या लाल रंगाच्या बांगड्या, मुळापासून ते शेंड्यापर्यंत चोपडून तेल लावून घातलेली सैल वेणी, बांगडीच्या पिनेत टोचलेला जाईच्या फुलांचा गुच्छ कसाबसा ४ केसात मळलेला. हातात घरी शिवलेला बटवा. पायात ‘अंगठ्याची’ चप्पल, सर्वांगावर चमकणाऱ्या सुरकुत्या अाणि बावरल्यागत इकडून तिकडे वेगाने जात असलेल्या गाड्यांकडे बघणारी धूसर झालेली नजर. आजोबांचीही अवस्था फार वेगळी नव्हती. चमकदार चंदेरी विरळ केस, अंगापेक्षा जरा मोठा झालेला ढगळ शर्ट, अगदी जुन्या पद्धतीचा धूसर झालेल्या काचांचा चश्मा, झाडांची हिरवट मुळं उघडी पडल्यानंतर जशी दिसतात, तशा वर आलेल्या हातांच्या शिरा आणि पंचप्राण एकवटून रस्ता बघणारे डोळे. खालीवर होणाऱ्या रस्त्याबरोबर अन‌‌् जवळून जाणाऱ्या गाड्यांच्या वेगामुळे बदलणारे चेहऱ्यावरचे हावभाव तर सुईत दोरा ओवताना असतात तसे आत्यंतिक काळजीपूर्ण होते. त्यात आज्जी एका हाताने गाडी अन‌् पिशवी घट्ट पकडून स्वतःला कशाबशा सावरत दुसऱ्या हाताने मागून येणाऱ्या गाड्यांना दुरून जाण्यासाठी खुणवत, मागून सतत आजोबांना ‘शांततेत चालवा,’ ‘हळू जाऊ द्या,’ अशा सूचना देत होत्या.

हे सगळं समोरचं ‘परिपक्व’ चित्र बघितलं, अाणि होणारा उशीर, पाठीला लागलेली कळ, या साऱ्या ‘तरुण’ भावना क्षणात मागे पडल्या. ते चित्र म्हणजे ‘वृद्ध माणसं लहान बाळासारखी असतात’ या वाक्याचा पुरावा होतं. लहानपणी स्वतःच्या शरीरावर ताबा नसलेल्या अवस्थेत पहिल्यांदा उभं राहणं, पाहिलं पाऊल टाकणं, खाली पडलेली खेळणी उचलणं, चमचा धरण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या कृतींमध्ये जसा हळुवारपणा असतो, अन् कुठलीही नवीन गोष्ट करताना डोळ्यात जी ‘पहिलेपणाची’ भीती असते, ती मी त्या दोघांमध्येही बघत होते. तारुण्यात सळसळणारं रक्त, उत्साह, जोम, सारं काही जणू बुद्धिपटलावरून हळूहळू नाहीसं होतं. अनुभवातून आत्मविश्वास वाढतो असं म्हणतात, पण काळाबरोबर तो नाहीसादेखील होतो, ते आज मी प्रत्यक्ष बघत होते. काळ अन‌् अनुभव दोघे जर सम प्रमाणात येत असते, तर कोणत्याही जाणीवशून्य अवस्थेत आपण कदाचित संपलोदेखील असतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अनुभव पदरी बांधणाऱ्यांनाच आत्मविश्वासाचे चार क्षण मिळतात, हे नवीन सत्य आज मला समजलंय.

आज फार सहजतेने गाडी चालवणारी मीदेखील कदाचित उद्या थरथरत्या हाताची मूठ प्रयत्नपूर्वक आवळत असेन, असा विचार मनात डोकावला. मला जाणवलं, आत्ताही हात थरथरत होता नुसत्या विचारानेसुद्धा...
pathakpriyankasat@gmail.com
बातम्या आणखी आहेत...