आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अॅडजस्‍टमेंट'चे धडे देणारी होस्‍टेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बनारस हिंदू विद्यापीठाच्या आवारात मुलांनी काही मुलींची छेड काढल्याचं निमित्त झालं आणि तिथल्या होस्टेलवर राहणाऱ्या मुलींचा दबलेला आवाज उफाळून वर आला. पुढे काय झालं ते अधिकच दुर्दैवी. पण या निमित्ताने महाराष्ट्रातल्या होस्टेलमध्ये काय परिस्थिती असते, मुली कशा राहतात, काय सहन करतात, ते जाणून घ्यावंसं वाटलं. सध्या सोलापुरात फिजिक्सची लेक्चरर असणाऱ्या लेखिकेचे हे अनुभव प्रातिनिधिक आणि विचार करायला लावणारेही.

मी मूळची मंगळवेढा जिल्ह्यातल्या रहाटेवाडी गावातली. अकरावीत कॉलेजसाठी बाहेर पडले तेव्हा सुरू झालेलं होस्टेल लाइफ यंदा नववं वर्ष साजरं करतंय. आत्तापर्यंतच्या होस्टेल लाइफमध्ये अनेक अनुभव आले, बरेच चांगले काही वाईट. मात्र ‘फार त्रास भोगला बाई’ प्रकारात मोडणारे काहीच नाहीत.

अकरावीला सोलापुरात एका प्रायव्हेट होस्टेलला राहत होते. आठशे रुपये भाडं. तशा सोयी भरपूर होत्या. गरम पाणी, बेड, लॉकर, वगैरे. एका रूममध्ये सहा जण होतो. रात्री आठचं टायमिंग होतं यायचं. त्यानंतर गेट बंद. वरच्या मजल्यावर आम्ही आणि खाली मालक राहत असल्यानं आम्हाला गोंधळ करायला तर दूरच, मोठ्यानं बोलताही येत नव्हतं. सुट्टीला त्यांची नातवंडं आल्यावर मात्र परीक्षा असल्या तरी गोंधळ कमी होत नसे. एकदा तर खाली त्यांच्या लाइटचा फ्यूज उडाल्यावर आमच्या रूमचा लावलेला, कारण पोरांना टीव्ही बघायचा होता. ते जैन असल्यानं आम्हाला नॉनव्हेज बंद होतं. महिना संपल्यावर जर तुम्ही रूम सोडून जाणार असाल तर वरती एक रात्रही राहिलात तर पन्नास रु. द्यावे लागायचे.

नंतर बारावीला कॉलेजच्या होस्टेलवर गेलो. सातच्या आत परत यावं लागे. कॉलेजचे एक प्रोफेसरच रेक्टर होते. त्यांच्या कुटुंबासह राहायचे ते. त्यांची बायको फारच खडूस. होस्टेलला बाग होती. तिथं जायची, फळं तोडायची मनाई. मोठ्यानं बोलणं नाही आणि चालताना पायाचा आवाज नाही. उलट दुपारी तिची पंचविशीतील बाळं झोपायची म्हणून आम्ही तोंड गप्प ठेवून राहायचं.  त्यांचा, सरांचा, त्यांच्या मुलाचा सगळ्यांचे बड्डे सेलिब्रेट करायचे. खाऊ उरला तर त्यांनाच द्यायचा. रात्री १२-१ला मॅडम कुणाच्या रूमची लाइट चालूय का चेक करायच्या. असेल तर फाइन भरायचा. मोबाइल बंदी होती. रूम्समध्ये पंखेही नव्हते. रॅगिंग वगैरे नाही झालं, पण खाली मॅडमच्याच रूममध्ये कॉइन बॉक्स होता. मॅडम आल्यावरच फोन करता यायचा रात्री आणि कोण काय बोलतंय ते मॅडम ऐकायच्या. सतत ओरडा आणि धारेवर धरायच्या. 

सोलापुरातच बीएड केलं. तेव्हा मात्र होस्टेलवर राहताना अतिशय विचित्र अनुभव होते. तळमजल्यावर शाळा भरायची. पहिल्या मजल्यावर डीएड तर दुसऱ्यावर बीएडचं कॉलेज होतं. तिसऱ्या मजल्यावर होस्टेल. होस्टेल म्हणजे क्लासरूम्सच होत्या त्या. भयंकर डास होते तिथं. वरती खारं पाणी. अंगाची खाज उठायची. पहिल्या मजल्यावर पिण्यासाठी म्हणून गोड पाणी होतं. तिथून बादलीनं आणावं लागे. रेक्टर कुणीही नव्हतं. रात्रपाळीचे शिपाई असायचे. सुदैवाने ते चांगले असल्यानं आम्ही सेफ होतो, पण हे विचित्र वाटायचं. कधीकधी पाणीच नसायचं. शिपायांना सांगितलं तर ते सरांना सांगा म्हणायचे आणि सर कधीच ऐकायचे नाहीत. उलट अॅडजस्ट करा, असा डोस द्यायचे. माझा फोन होस्टेलवरून हरवल्यावर, तेही सगळे शिक्षक असताना, तरी त्यांनी दखल घेतली नाही. 

एमएस्सीसाठी नांदेडला होस्टेलवर. पण ते होस्टेल जरा बरं होतं. म्हणजे आजवरच्यात जरा बरं. पण तिथंही लाइट जाणं, पाणी नव्हते. रेक्टर मॅडम दोन वर्षांतून एकदाच आल्याचं आठवतंय. केअरटेकर फॅमिली होती, ती बरी होती. पण स्लीव्हलेस, शॉर्ट कपडे घातले की ओरडायचे. गुडघ्यापर्यंतचा स्कर्टही त्यांना चालत नव्हता. वायफाय वगैरेची थेरं तर दूरच; पण होस्टेलवर कपाटं, टेबलखुर्ची द्या बोललं तरी लवकर दखल नव्हती घेतली. पिण्याच्या पाण्याचा फिल्टर बिघडल्यावर पर्यायी व्यवस्थाही नव्हती. बऱ्याच सोयी गैरसोयी होत्या पण बनारस हिंदू विद्यापीठासारखे प्रकार नाही झाले. सगळ्या होस्टेल्सना ‘सातच्या आत घरात’ ही वेळमर्यादा होतीच. आणि सगळ्या मुली येईपर्यंत गेटवर कुणी ना कुणी असायचं कारण लेडीज होस्टेलबाहेर टवाळखोरांची गँग थांबते. मुलींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कॉलेजची असल्याचं एवढं पक्कं भिनलं होतं की, होस्टेलबाहेरही एखादी मुलगी मुलाशी बोलताना दिसली की, चौकशी होई. 

खरं तर कुठल्याही होस्टेलवर मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची व्हेंडिंग मशीन, वायफाय, महिला रेक्टर, पिण्याचं, आंघोळीचं पाणी असणं गरजेचं असतं. जर पैसे घेत असाल तर मोबदलाही पूर्ण हवा. सुरक्षितता हवी. पण अनेक ठिकाणी तीही मिळतेच असं नाही.
 
- प्रियांका पाटील, सोलापूर pppatilpriyanka@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...