आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छारा नव्हे 'सारा' छोकरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘नोमॅड’ या इंग्रजी शब्दाचे रूपांतर म्हणजे भटके. आपल्याकडे भटक्या-विमुक्त जाती-जमातींचे नोमॅडिक ट्राइब्ज-डिनोटिफाइड ट्राइब्ज असे नामकरण झाले आहे. छारा ही अशाच जातसमूहांपैकी एक जात. एक अशी जात जिला माणूस म्हणून मान्यता शून्य...दक्षिण बजरंगे छाराचे धाडस इतके की तो त्याच ‘नोमॅड फिल्म्स’ नावाने बॉलीवूडच्या दुनियेत दाखल होतो आणि अनेक अडथळे पार करत नोमॅड फिल्म्स या बॅनरखाली त्याचा `समीर` हा व्यावसायिक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्जही होतो.

पथनाट्य, एकांकिका, लघुपट-माहितीपट आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे अर्थातच चित्रपट... सिने-नाट्यसृष्टीत नाव कमावणाऱ्यांचा साधारणपणे याच मार्गाने प्रवास होतो. तसा प्रवास दक्षिण बजरंगेचाही झाला. मग त्यात नवल ते काय? हे नवल दक्षिण बजरंगेच्या ‘छारा’ या आडनावात आहे. छारा हे आडनाव असतानाही दक्षिण बजरंगे जर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिने वर्तुळात आपली छाप पाडत असेल तर ते नवल आहे... 

छारा म्हणजे जन्मजात गुन्हेगार जमातीचा कायदा रद्द होऊनही चोर-गुन्हेगार असल्याचा शिक्का अजूनही कपाळावरून ठळकपणे न पुसलेला समाज... छारा म्हणजे समाजाला लागलेली कीड... छारा म्हणजे नागर समाजाने ज्यांना आपल्या आजूबाजूलाही फिरकू दिले नाही तो समाज... अशा छारा जातीत जन्मलेल्या आणि अहमदाबादच्या छारा नगरीत जिथे आजही नागर समाज पाय ठेवायला नाखुश असतो तिथे वाढलेला दक्षिण बजरंगे छारा हा जर छारा नगरीची वेस ओलांडून जग पादाक्रांत करायला निघाला असेल तर मात्र ती खरोखरच नवलाईची गोष्ट ठरते. ‘नोमॅड’ या इंग्रजी शब्दाचे रूपांतर म्हणजे भटके. आपल्याकडे भटक्या-विमुक्त जाती-जमातींचे नोमॅडिक ट्राइब्ज-डिनोटिफाइड ट्राइब्ज असे नामकरण झाले आहे. छारा ही अशाच जातसमूहांपैकी एक जात. एक अशी जात जिला माणूस म्हणून मान्यता शून्य...दक्षिण बजरंगेची धाडस इतके की तो त्याच ‘नोमॅड फिल्म्स’ नावाने बॉलीवूडच्या दुनियेत दाखल होतो आणि अनेक अडथळे पार करत नोमॅड फिल्म्स या बॅनरखाली त्याचा `समीर` हा व्यावसायिक चित्रपट प्रदर्शनासाठी सज्जही होतो.

दक्षिणच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अहमदाबादच्या छारा नगरीची सांस्कृतिक प्रतिमा बदलण्यास सुरुवात झाली आहे. वर्षानुवर्षे फक्त अपमान आणि अवहेलना वाट्याला येणाऱ्या छारानगरकडे समाज आता आदराने, उत्सुकतेने पाहू लागलेत. ज्या छारा मुलांना कुणी जवळही उभं करत नसे, छारा म्हणून हिणवलं जायचं, त्या मुलांना आज ‘तू छारा नही, सारा छोकरा छे’, असं लोकं प्रेमाने म्हणू लागलेत. या आधी केवळ आडनावामुळे वस्तीवर येऊन धरपकड करणारे पोलिस आता मात्र इथल्या मुलांशी आदराने बोलू लागलेत.

हा बदल सहजासहजी घडलेला नाही. गेल्या वीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर हे चित्र आता हळूहळू बदलू लागलं आहे. दक्षिणने याच वस्तीतल्या मुलांना सिनेमात घेऊन, इथेच चित्रीकरण करून हा सिनेमा बनवलाय. छारा समाजातल्या एखाद्या तरुणाने एखादा बॉलीवूड सिनेमा दिग्दर्शित करावा, त्यात छारानगरला अनेकांगी सामावून घ्यावं ही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अर्थाने खूप मोठी आणि निश्चितच ऐतिहासिक घटना आहे. दक्षिणने दिग्दर्शित केलेल्या ‘समीर’ या सिनेमामुळे अनेक छारा तरुणांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि ते आता आणखी मोठी स्वप्न पाहू लागलेत. 
‘समीर’ ही कथा हैदराबादमध्ये इंजिनिअरिंग करणाऱ्या एका तरुणाची आहे. शिकत असताना एके दिवशी अचानक दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून या तरुणाला पोलिस पकडून गुजरातला नेतात. पुढे पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक काय करतं, इतर राजकीय घडामोडी, राजकीय घडामोडींचा यावरील परिणाम हे सगळ उलगडणारी ही कथा आहे. 
 
सूचक राजकीय घटना, धार्मिक दंगली, बॉम्बस्फोट या सगळ्यांच्या मुळाशी जाणारं कथानक यामुळे सिनेमा सेन्सॉर होताना अनेक अडचणी आल्या. अनेक महत्त्वाच्या संवादाना कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय कात्री लावण्यात आली. आजच्या जातीय, धार्मिक धृवीकरण चरमसीमेवर पोहोचण्याच्या काळात एखाद्या जमातीवर, अल्पसंख्याक धार्मिक समूहावर अनेक प्रकारचे शिक्के मारले जातात. या समुहाचे सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या खच्चीकरण करण्याची एक मोठी राजकीय प्रक्रिया आजूबाजूला काम करते, अशा वेळी सामाजिक अन्यायाला बळी पडलेल्या जमाती-धार्मिक समूहाची समांतर कहाणी अस्वस्थ करते आणि या अस्वस्थतेला कोंडी फोडण्याचं, ही प्रक्रिया सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक भिंगातून ‘एनलार्ज’ करून पाहण्याचं काम हा सिनेमा करतो.

अंजली पाटील, मोहंमद झिशान अयुब, चिन्मय मांडलेकर, सीमा बिस्वास, सुब्रत दत्ता या कसलेल्या कलाकारांनी या सिनेमात ताकदीच्या भूमिका निभावल्यात. या सगळ्या कलाकारांसोबत या सिनेमात ४० ते ४५ छारा तरुण-तरुणींनी मध्यवर्ती तसंच लहान-लहान भूमिका केल्या आहेत. सिनेमा बनवताना अनेक तांत्रिक कामे करण्याची, अगदी शूटपासून स्पॉटबॉयपर्यंत अनेक गोष्टी करण्याची संधी जाणीवपूर्वक छारा मुला-मुलीना दिग्दर्शकाने दिली. यातल्या काही जणांनी तर कधीही शाळेचं तोंडही पाहिलं नाही, मात्र तरीही काही तरी करून दाखवण्याची जिद्द असणाऱ्या हाताना आणि स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांना दक्षिणने काम दिलं. त्यासाठी या मुला-मुलींवर खूप मेहनत त्याने घेतली. अभिनयाच्या खास कार्यशाळा घेतल्या.
दक्षिणकुमार बजरंगे छारा हा तरुण कलाकार, दिग्दर्शक गेली पंधरा वर्षं या स्वप्नासाठी मेहनत करतोय. हे स्वप्न अर्थातच एका चित्रपटाचं नाही, तर ते आहे संपूर्ण छारा समाजाच्या सर्वांगीण उत्थानाचं. या समूहाच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रतिमेच्या पुर्ननिर्मितीचं.

यासाठी दक्षिणने छारानगर वस्तीतच या प्रवासाची सुरुवात केली. बुधन थिएटर ही नाट्यचळवळ इथे सुरू केली. मुला-मुलींसाठी वाचनालय सुरू केलं. हळुहळू अनेक मुलं इथे येऊन दक्षिणसोबत अभिनयाचे धडे गिरवू लागली. पथनाट्य, समूहगीतं सादर करू लागली. त्यांचे विषयही आपल्या जमातीवर झालेला अन्याय, उपजीविकेचा प्रश्न, जल-जंगल-जमीन असे. या सगळ्या मुलांना घेऊन दक्षिणने भारतभर कार्यक्रम केले आणि आता याच मुलांना आणि वस्तीतल्या इतर लोकांना घेऊन सिनेमा. इथे येऊन अनेक तरुण स्वप्न पाहू लागले... आपणही काही करू शकतो, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. आज या मुलांकडे लोक आदराने पाहतात. कलेमुळे मिळालेला आत्मविश्वास आणि सन्मानामुळे ही मुलं जीवतोड मेहनत करतात. शिकण्याचा निर्धार करतात.

दक्षिण म्हणतो, मी काही विशेष करत नाही. खरं तर नाच, गाणं-अभिनय या जमातीच्या रक्तातच आहे, पूर्वीपासून लोकांचं मनोरंजन करून पोट भरणारी ही जमात आहे. पण ब्रिटिशांनी गुन्हेगार जमातीचा शिक्का मारल्यावर त्यांना सन्मानाने पोट भरण्याच्या संधीच उरल्या नाहीत, चहुकडून अन्याय होऊ लागला, तेव्हा काहीच पर्याय नसताना हे लोक चोरी करू लागले. पण त्यांच्या मूलभूत कलागुणांना, अंगभूत क्षमतांना दिशा देऊन काही संधी निर्माण करण्याचा प्रयत्नच कधी झाला नाही. या लोकांच्या आयुष्यातच इतकं नाट्य आहे, मुलभूत गरजांच्या अभावाचा आक्रोश इतका आहे कि त्यांना वेगळा अभिनय करावाच लागत नाही. मी फक्त त्यांच्यातल्या या गुणांना दिशा द्यायचं, संधी द्यायचं काम करतो. मानववंशशास्त्राच्या अनेक संशोधनांतून हे सिद्ध झालंय की बहुतांश भटक्या जमाती या कधी काळी ‘हाडाच्या परफॉर्मर’ होत्या. पण सांस्कृतिक राजकारणात, राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक या जमातींना त्यांच्या मूळ सांस्कृतिक जनुकांपासून वेगळं केलं जातं. राजकीय पक्ष तर या प्रक्रियेत आघाडीवर आहेत. म्हणूनच माझ्यासारख्या तरुणाला या लोकांना पुन्हा त्यांच्या आदिम संस्कृतीकडे नेऊन प्रवाहात आणावंसं वाटतं. अफाट क्षमता आहे त्यांच्याकडे, आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायची गरज आहे.

दक्षिण हे जे काही बोलतो त्यातला शब्दन् शब्द तो कृतीत उतरवतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने या जमातीतल्या अनेकांना आपलं स्वप्न तर पूर्ण करता आलंच. पण यावरच दक्षिण थांबत नाही, तर या सिनेमातल्या विविध प्रकारची कामे केलेल्या लोकांना कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना इतर सिनेमा आणि कलाकृतीत काम मिळावे यासाठीही प्रयत्न करत आहे. छारानगरमध्ये ‘समीर’ सिनेमाचं शूट झाल्यानंतर तिथे ‘कोख’ नावाच्या आणखी एका सिनेमाचं शूट झालं. अहमदाबादमधल्या हिंदू-मुस्लिम घेटोयजेशन असलेल्याही अनेक वस्त्यांमध्ये सिनेमाचं शूट झालंय. एरव्ही ज्या वस्त्या, मोहल्ले सामान्य लोकांसाठी निषिद्ध होत्या, त्यांची सांस्कृतिक ओळख आता बदलू लागलीय आणि स्वातंत्र्याच्या पहाटेपासून कोसो दूर असलेल्या भटक्या विमुक्तांच्या नव्या स्वप्नांचा उदय होऊ लागलाय. कला प्रांतातली स्पृश्याअस्पृश्यता, जातिवाद, एकूण आशय-विषय, शैलीवरचा ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा पगडा, प्रस्थापितांच्या सांस्कृतिक मक्तेदारीलाही अशी आव्हानं मिळणं हे कलेच्या क्षेत्रात काही चांगलं घडू पाहण्याचं द्योतक आहे.

आपली गोष्ट, कैफियत मांडता येणं, आपल्याकडे असलेल्या सांस्कृतिक संचिताच्या आधारे जगण्याच्या, स्वप्न पाहण्याच्या नव्या शक्यता धुंडाळणं... ही भटक्या विमुक्तांच्या स्वातंत्र्याची व्याख्या जेव्हा कणभर का होईना बदलात परावर्तित होते... त्याचं मोल समजत आपण हा आनंद साजरा केला पाहिजे.
 
- प्रियंका तुपे
tupriya2911@gmail.com
संपर्क - ९५९४०३७९१९
बातम्या आणखी आहेत...