आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सपायरी औषधांची!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगले मित्र आणि औषधे दोघेही आपल्या वेदना दूर करतात. मात्र, मैत्रीला एक्स्पायरी डेट (अंतिम मुदत) नसते, औषधांना मात्र असते.'' मैत्रीचे अमरत्व आणि औषधांचे अल्पायुष्य सांगणारा व नकळतच ‘औषधांची एक्स्पायरी’ हा मुद्दा मनावर ठसवणारा हा मेसेज व्हॉट्सअॅपवर नेहमी फिरत असतो.
अनेकांना या ‘एक्स्पायरी’बद्दल अनेक शंका असतात. अंतिम तारखेनंतर औषध लगेच खराब होते का? काही फार्मा कंपन्यांचा बिझनेस चालावा यासाठी अशी ‘एक्स्पायरी’ ठरवलेली नसते ना? का असते अशी एक्स्पायरी?

वरील शंका तशा रास्तच. याचे निराकरण करण्यासाठी काही बाबी समजून घेणे आवश्यक आहे. औषधे ही रसायने आहेत. त्यांची गुणकारता, सुरक्षितता ही त्यांच्या रासायनिक संरचनेवर अवलंबून असते. जर यात फेरफार झाले तर औषधाचा गुण कमी होऊ शकतो. किंवा त्यात काही विषारी घटक तयार होऊन, त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. हवामान, विशेषत: तापमान, आर्द्रता अशा गोष्टींचा औषधाच्या मूळ घटकांवर व साहाय्यक घटकांवर परिणाम होत असतो. त्यामुळे अंतर्गत विघटन, रंग-रूप चवीत बदल, जंतूंची लागण असे दृश्य वा अदृश्य बदल औषधांत होऊ शकतात.
हे लक्षात घेऊन प्रत्येक औषधाची निर्मिती करताना, ते नेमके किती कालावधीसाठी प्रभावी व सुरक्षित राहणार आहेत, याचा अभ्यास औषध उत्पादक करत असतात. हा अभ्यास (स्टेबिलिटी स्टडीज) करून औषधाचे ‘शेल्फ लाइफ’ म्हणजे, त्याचे आयुर्मान ठरवले जाते. या शेल्फ लाइफचा शेवट म्हणजे, त्याची एक्सपायरी. लेबलवर लिहिलेल्या औषधाच्या प्रमाणातील किमान ९०% औषध तरी या एक्सपायरी तारखेपर्यंत उत्तम रासायनिक स्वरूपात टिकून असते आणि ते अपेक्षित सुपरिणाम साधू शकते, अशी ग्वाही उत्पादक देत असतात. मूळ औषध तेच असले, तरी त्याच्या वेगवेगळ्या डोसेज फॉर्मसाठी (म्हणजे टॅबलेट््स, कॅप्सूल्स, सिरप्स, मलम वगैरे) वेगवेगळी अंितम मुदत असू शकते.

औषधानिर्मितीच्या तारखेपासून साधारण १ ते ५ वर्षांच्या कालावधीमध्ये (हे औषधाचे गुणधर्म, त्याचा डोसेज फॉर्म यावर अवलंबून असते. उदा. अनेक व्हिटॅमिन्सना, अँटिबायोटिक्सना ‘शॉर्ट एक्स्पायरी’ असते.) बहुतेक औषधांची एक्स्पायरी असते. अॅलोपॅथिक औषधांच्या लेबलवर अशी मुदत नमूद करणे, कायद्याने बंधनकारक आहे. असेच बंधन आता बहुतांशी आयुर्वेदिक औषधांनाही लागू आहे.
लेबलवर एक्स्पायरी लिहिण्याची पद्धत जरी सर्वत्र सारखी असावी, अशी आपली रास्त अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात ती लेबलवर वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेली असू शकते. आता हा प्रश्न मनात येतोच की, वरील उदाहरणातील औषध ३१ डिसेंबरपर्यंत वापरायचे, म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी, १ जानेवारीला ते ‘टाकाऊ’ झाले का? कदाचित ते तसे लगेच खराब होतही नसेल; पण आधी सांगितल्याप्रमाणे औषधाची सुरक्षा व गुणकारकतेसाठी उत्पादकाने घालून दिलेली सीमारेषा पाळणे, आपल्या आरोग्याहितासाठी उत्तम. दुकानातील फार्मासिस्ट ‘एक्स्पायरी’वर कडी नजर ठेवून असतात. मुदतीच्या आधी एक ते दोन महिने औषधे शेल्फवरून काढून स्वतंत्र ‘एक्स्पायरी कक्ष/बॉक्स’मध्ये ठेवतात.
ही औषधे न विकता परत पाठवली जातात. अशा प्रकारे फार्मासिस्ट दक्षता घेतातच, तरी जागरूक ग्राहक म्हणून औषधे विकत घेताना, त्याची अंतिम मुदत तपासून बघणे आवश्यकच.
डोळ्यात घालण्याचे थेंब (आय ड्रॉप्स), ड्राय सिरप यांना दोन-दोन एक्स्पायरी असतात. एक उत्पादन तारखेपासूनची अंतिम मुदत व दुसरी औषध उघडून वापरण्यास सुरुवात केल्यापासूनची. आयड्रॉप्स, डोळ्यांत घालायची क्रीम्स ही सर्वसाधारणपणे पॅकिंग उघडल्यावर एक महिन्याच्या आत वापरायची असतात. तर ड्राय सिरपमध्ये (बाटलीत येणारी कोरडी पावडर) उकळून थंड केलेले पाणी मिसळून तयार केलेले मिश्रण सात किंवा १५ दिवसांच्या आत वापरायचे असते. तशा सूचना या औषध प्रकारांच्या लेबलवर असतात, त्या वाचणे जरुरीचे आहे.
औषधांच्या गोळ्यांच्या स्ट्रीपवर एक किंवा दोन ठिकाणीच अंतिम मुदतीचा स्टॅम्प असतो. म्हणून अंतिम तारीख नमूद केलेल्या भागातील गोळी सर्वात शेवटी घ्यायची. मार्कर पेनने स्ट्रीपवर दोन्ही कडांना अंतिम मुदत लिहिल्यास स्ट्रीप अर्धवट वापरून पडून असल्यास नंतर परत वापरताना ‘एक्स्पायर’ झाली आहे का नाही, हे लक्षात येईल. स्ट्रीपमधील गोळी काढताना ही स्ट्रीप कमीत कमी फाटेल, अशीही काळजी महत्त्वाची. एक्स्पायरीची चर्चा करताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, औषधाच्या स्टोरेज म्हणजे साठवणीचा. योग्य प्रकारे साठवण केली तरच औषध अंतिम मुदतीपर्यंत सुस्थितीत राहील, अन्यथा त्या आधीच ते खराब होऊन एक्स्पायर होईल. औषध कसे स्टोअर करावे, यासाठी उत्पादकाने लेबलवर सूचना दिलेल्या असतात. त्यानुसार घाऊक विक्रेत्यांनी (होलसेलर्स, डिस्ट्रिब्युटर्स), औषध दुकानदारांनी व अर्थात ग्राहकांनी औषधांची साठवण करणे अपेक्षित आहे.
आपण बहुतेक घरांत पाहिले, तर औषधे इतस्तत: विखुरलेली असतात. काही गोळ्यांची पाकिटे कपाटात व्यवस्थित असतात, तर काही मात्र खिडकीत उन्हात, ड्रॉवरमध्ये, बाथरूममध्ये, फ्रीज, ओव्हनवरही असतात. द्रव औषधाच्या बाटल्याही किचन टेबलवर लोणची/चटण्यांसोबत किंवा खिडकीत, फ्रीजवर सापडतात. परदेशात ‘मेडिसिन कॅबिनेट’ची (औषध कपाट) संकल्पना रुजलेली आहे. आपणही घरातील औषधे व्यवस्थित मेडिसन बॉक्स तयार करून, औषध सूची करून ठेवल्यास औषध साक्षरतेची एक महत्त्वाची पायरी पार होईल. symghar@yahoo.com
औषधे ठेवताना घ्यावयाची काळजी
- औषधे त्याच्या मूळ पॅकिंगमध्ये ठेवावीत.
- दमटपणा, पाणी, ऊन, गॅस, ओव्हन यापासून दूर कोरड्या व थंड ठिकाणी म्हणजे, एखाद्या कपाटात, बंद बॉक्समध्ये ठेवावीत.
- बाहेरून वापरायच्या औषधांसाठी (क्रिम्स, ड्रॉप्स) वेगळा बॉक्स ठेवावा.
- कायमस्वरूपी लागणाऱ्या औषधांसाठी (उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब) वेगळा डबा ठेवणे उत्तम.
- नैमित्तिक औषधांचा डबा वेगळा ठेवून त्यावर औषधाचे नाव, उपयोग, अंतिम मुदत याची यादी करून ठेवल्यास कालांतराने वापरताना गोंधळ होणार नाही.
- कोणतीही औषधे लहान मुले व पाळीव प्राणी यांच्या हाती लागणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक. आजकालच्या औषधांचे आकर्षक रंग, पॅकिंग यामुळे लहान मुलांनी अशा गोळ्या मोठ्या व्यक्तींच्या नकळत खाऊन विषबाधा झाल्याच्या घटना होत असतात, म्हणून ही काळजी अत्यंत आवश्यक.
- लेबलवर ‘Store in cold place’ लिहिले असेल तर २ ते ८ अंश सेल्सियस तापमानात म्हणजे फ्रिजमध्ये (फ्रीझरमध्ये नव्हे) ठेवणे. उदा. इन्सुलिन इंजेक्शन्स, काही अँटिबायोटिक्स.
- लेबलवर ‘Store in cool place’ लिहिले असेल, तर रूम टेम्परेचरला ठेवता येईल. ३० अंश सेल्सियसहून अधिक तापमान सातत्याने असेल, तर घरातील त्यातल्या त्यात थंड जागी वा फ्रिजमध्ये ठेवावीत.
लेबलवरील सूचना अर्थ
Expiry Date : Dec’15 ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत
Use Before or औषध वापरू शकतो.
Best Before : Dec’15
24 Months from निर्मिती तारखेनंतर
Date of Manufacturing दोन वर्षांचा कालावधी