आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजाततेचे पुनरागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादे अभिजात श्रेणीतले नाटक हा नाटककार, दिग्दर्शक, नट आणि प्रेक्षक यांचा एखाद्या चिरंतन आशयसूत्राच्या शोधाचा प्रवास असतो. एखाद्या लोलकाच्या बहुरंगांसारखं हे सर्व घटक नाटकाचं अभिजातपण शोधत असतात. ‘वाडा चिरेबंदी’त हे अभिजातपण आहे.
जिगिषा आणि अष्टविनायक या संस्थांनी ‘वाडा चिरेबंदी’ हे महेश एलकुंचवारांचं नाटक रंगभूमीवर आणलं आहे. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. काही काळापूर्वी रंगभूमीवर आलेल्या नाटकांच्या पुनरागमनाची परंपरा अलीकडच्या काळात रंगभूमीवर आली आहे. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ने तोच इतिहास गिरवला आहे. ‘वाडा चिरेबंदी’ पुन्हा रंगभूमीवर आले अन् ते नाट्यरसिकांनी डोक्यावर घेतले, यामागे नॉस्टाल्जियाची मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय मनोवृत्ती आहे. पण तरीही वाडा चिरेबंदी हे बंदा रुपयासारखे खणखणीत नाटक आहे. दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश अशा सर्वच गोष्टी जमून आलेल्या आहेत.

साहित्यात जीवनवाद, रंजनवाद, सौंदर्यवाद, वास्तववाद, अस्तित्ववाद अशा स्वतंत्र विचारप्रणाली आहेत. नाटकही त्यातून सुटलेले नाही. वर वर्णन केलेल्या या विचारप्रणालींची नाटके आणि नाटककार आपणास नाट्यक्षेत्राचा अभ्यास करताना निश्चितच स्मरणात राहतील. त्यातली एलकुंचवारांची नाटके म्हणजे, मानवी नातेसंबंधांचा तळ गाठणारी, वास्तववादी नाटके म्हणून सर्वपरिचित आहेत. वासनाकांड, पार्टी, गार्बो, युगांत अशा एकाचढ एक नाटकांनी एलकुंचवारांनी केवळ मराठी रंगभूमीवर नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रंगभूमीवर आपली नाममुद्रा उमटविली आहे. ‘वाडा चिरेबंदी’ हे त्यांचं असंच एक ‘अभिजात’ श्रेणीतलं नाटक. नाटकाला अभिजात का म्हणायचं, तर ते स्थल-कालाच्या भाषा, प्रांताच्या मर्यादा ओलांडून काहीतरी चिरंतन सांगू पाहतं. हा चिरंतन सांगोवांगीचा प्रवास हा एखाद्या सणा-वारांच्या, देवादिकांच्या, व्रत-वैकल्यांच्या कथेसारखा सुफळ संपूर्ण नसतो. एखादे अभिजात श्रेणीतले नाटक हा नाटककार, दिग्दर्शक, नट आणि प्रेक्षक यांचा एखाद्या चिरंतन आशयसूत्राच्या शोधाचा प्रवास असतो. एखाद्या लोलकाच्या बहुरंगांसारखं हे सर्व घटक नाटकाचं अभिजातपण शोधत असतात. ‘वाडा चिरेबंदी’त हे अभिजातपण आहे.

‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक एकत्र कुटुंबपद्धतीचे उभेआडवे धागे मांडणारे, आणि या उभ्याआडव्या धाग्यांच्या गुंत्यापाशी विराम घेणारं नाटक आहे. एकत्र कुटुंबपद्धती ही आपल्या समाजरचनेचा एकेकाळी कणा होती. हा कणा दिवसेंदिवस अधिकाधिक दुखरा होत गेला. एकत्र कुटुंबपद्धती काळाच्या कसोटीवर टिकून राहिली नाही. एखादं भरजरी वस्त्र विरत जावं, तशी एकत्र कुटुंबपद्धती विरत गेली. ही एकत्र कुटुंबपद्धती विशिष्ट मूल्यव्यवस्थेवर टिकून होती. पण समष्टी केंद्री समाजव्यवस्थेऐवजी व्यक्तिकेंद्री समाजव्यवस्था एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखी ढासळू लागली. मातृत्व, पितृत्व, बंधुत्व, परस्पर स्नेहभाव, आदरभाव, सोशिकता हे एकत्र कुटुंबपद्धतीचे काही गुणधर्म. या गुणधर्मांची घट्ट वीण व्यक्तिकेंद्री समाजव्यवस्था, शहरीकरण, औद्योगिकरण, कृषिप्रधान ग्राम संस्कृतीला येणारं विकलांग स्वरूप यामुळे सैल होत गेली. एकत्र कुटुंबपद्धतीच्या तुळया दिवसांगणिक खिळखिळ्या होत गेल्या. एकत्र कुटुंबांच्या चिरेबंदी वाड्याला तडे गेले. त्याचे दर्शन ‘वाडा चिरेबंदी’ नाटकात घडते.

पण, ही केवळ चिरेबंदी वाडा अथवा या वाड्यातल्या माणसांची कथा नाही, तर एकूणच ढासळत्या मूल्यव्यवस्थेचे यथार्थ दर्शन घडविणारे नाटक आहे. परंपरानिष्ठ विचार आणि या विचारांना छेद देणारा नवा व्यक्तिवादी विचार यांच्या ताण्याबाण्यातून ‘वाडा चिरेबंदी’ साकार होतं. विदर्भातील एका खेड्यातल्या चिरेबंदी वाड्यात राहणाऱ्या एकत्र कुटुंबातल्या माणसांची ही कथा. हे धरणगावकर-देशपांडे कुटुंब जुन्या भरजरी वस्त्राप्रमाणे जीर्णशीर्ण होत चाललेलं. स्वार्थ आणि परमार्थ यांच्या कात्रीत सापडलेली ही माणसं. म्हटली तर एकमेकांवर प्रेम करणारी, तरीही विंचवासारखी; नांगी आपल्या पोटाशी बाळगणारी. वेळप्रसंगी डंख देणारी. चिरेबंदी वाड्याचा मोठेपणा जपून ठेवू पाहणारा थोरला भास्कर. मुंबईत टुकीचा संसार करून गावच्या इस्टेटीकडे डोळे लावून बसलेला मधला सुधीर अन् त्याची बायको. कुठल्याही उद्देशाविना जनावरासारखा राबणारा धाकटा चंदू. आंधळ्या रूढींनी आयुष्याचं मातेरं झालं तरी बाहेर पडण्याची धडपड करणारी प्रथा, नवऱ्याचे दिवसकार्य व्यवस्थित पार पाडण्याची भ्रांत असलेली आई आणि संवेदनाहीन मरणासन्न दादी. नाटकातले संवाद आणि विराम यांच्या हिंदोळ्यावर अतिशय मोजक्या दोन-तीन प्रसंगांवर नाटकाचा डोलारा उभा. गावातल्या मास्तराबरोबर पळून जाणारी रंजू. बाप्पाजीच्या दिवसकार्यासाठी मुंबईहून आलेला सुधीर आणि त्याची पत्नी त्यांच्यातील वाद, इस्टेटीतील खलबतं. मोठ्या भास्करच्या फुशारक्या अन् सगळं तोट्यातच चाललंय इस्टेट ती काय? अशा आविर्भावात हे नाटक उभं राहतं. हे विदर्भातल्या ब्राह्मण कुटुंबाचं नाटक, ज्या कुटुंबाची नाळ ग्रामीण भागात रुजलीय. गावं आणि कृषिप्रधान संस्कृती बदलल्यानं काय होतं, ते ‘इंजेन’ या आनंद यादवांच्या कथेतून कळतं. ‘वाडा चिरेबंदी’तल्या चंदूच्या पायाला ट्रॅक्टरचा पत्रा लागतो. रक्त भळभळतं. ही भळभळ प्रातिनिधिक असून ग्रामीण भागात आधुनिकतेचे, यंत्र सुलभतेचे वारे वाहू लागल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागाच्या परस्पर अवलंबित्वाची ही भळभळ आहे.

‘वाडा चिरेबंदी’ची गती गती म्हणावी, अशी नाहीच. एखाद्या जुन्या वाड्यात धूळ भरलेला, तारा खिळखिळ्या झालेला तंबोरा छेडावा तसेच सारे. नाटकाची संथ गती आशयसुलभ असून ती कायम ठेवण्याचे कौशल्य दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी साधले आहे. वैदर्भीय बोलीचा लहेजा जपण्याचे काम कलाकारांनी केले आहे. चिरेबंदी वाडा ट्रॅक्टरने उद्ध्वस्त होणार असल्याने या संदर्भातील विषण्णता भास्करचा मुलगा पराग याने पाठमोऱ्या कृतीतून व्यक्त केली आहे. गतवैभव संपुष्टात येणार, चिरेबंदी वाड्याला चिरा पडणार, कारण परिवर्तन हा युगधर्म आहे. त्यातून वाडा आणि वाड्यातली माणसं तरी कशी सुटणार? हे विदारक सत्य अंधार-प्रकाशाच्या खेळात वाड्याच्या जुनाटपणात आपणाला जाणवत राहतं. ही ‘विषण्णता’ हेच वाडा चिरेबंदीचं सामर्थ्य आहे. ही विषण्णता नाटककार एलकुंचवार आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी समर्थपणे निर्माण केली आहे.

वैभव मांगले (भास्कर), प्रसाद ओक (सुधीर), प्रतिमा जोशी (प्रभा), निवेदिता सराफ (वहिनी), भारती पाटील (आई), नेहा जोशी (रंजू), सिद्धेश्वर झाडबुके (चंदू), पौर्णिमा मनोहर (अंजली), अजिंक्य ननावरे (पराग) या कलावंतांनी नाटकाचे वैदर्भीय रंग आपल्या भूमिकांमधून तंतोतंत जपले आहेत. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य तर लाजवाब. चिरेबंदी वाडा त्यांनी खरोखरच हालता-बोलता केला आहे.

(prakash.khandge@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...