आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरसभरित स्त्रीजीवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृती संपन्न आहे. सण, उत्सव, विविध परंपरा या सर्वांना पूजनीय मानणारी आहे. या संस्कृतीचं रक्षण, जतन आणि हस्तांतरण या प्रक्रियेत स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. वेदकाळ हा स्त्रीला समान हक्क देणारा काळ होता; मात्र त्यानंतर कौटुंबिक गरज म्हणून स्त्रीचं जीवन अनेक बंधनांनी जखडलं गेलं. मात्र त्या मर्यादित अवकाशात, तिच्या वाट्याला आलेल्या त्या विश्वाला सुंदर बनवणं हेच तिने तिचं ध्येय बनवल्याचं लक्षात येतं. आजही स्त्री विशिष्ट सामाजिक संकेत आणि मर्यादा यात बांधली गेली आहे. पण तरीही ती अधिक स्वतंत्रपणे व रसपूर्ण पद्धतीनं जगते. आज ती सर्व रसांची स्वामिनी आहे.

भरतमुनींनी ‘रससिद्धांत’ मांडला त्याला साहित्यशास्त्रात जसं अनन्यसाधारण महत्त्व आहे तसंच मानवी जीवनातही आहे. आजचं स्त्री जीवन सर्व रसांनी परिपूर्ण आहे. पण प्राचीन काळात ते होतं का, याचा शोध घ्यायला लागल्यास आपल्या लक्षात येतं की, भरतमुनींनी नाट्यशास्त्रात ‘अष्टनायिकांचं’ वर्णन केलं आहे. त्यात वासकसज्जा (पतीला भेटण्यासाठी शृंगार केलेली), विरहकोटकंठिका (विरहामुळे दु:खी झालेली), स्वाधीनभर्तृका (जिचा नवरा तिच्या स्वाधीन आहे), कलहांतरिता (भांडणामुळे वेगळी झालेली), खंडिता (परिव्यक्ता), विप्रलब्धा (फसवली गेलेली), प्रोशितभर्तृका (पतीसोबत राहणारी) आणि अभिसारिका (प्रियकराला भेटायला जाणारी) यांचा समावेश आहे. या अष्टनायिकांचं विभाजन पाहिल्यानंतर लक्षात येतं की, ती पतीसोबत कशी राहते त्यावरून हे विभाजन केलं आहे. तिला स्वतंत्र आयुष्य नाही. जे नवरस सांगितलेले आहेत- शृंगार, वीर, रौद्र, बीभत्स, हास्य, अद्भुत, भयानक, करुण आणि शीत रस इत्यादी. प्राचीन काळातील अतिशय बंदिस्त संस्कृतीमुळे त्या काळातील स्त्रीच्या जीवनात प्रामुख्याने शृंगार, हास्य, करुण आणि शांत हे चारच रस प्रामुख्याने होते. त्यात अपवादात्मकपणे चांदबीबी, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा यांची नावं सांगता येतील.

आधुनिक युगातील स्त्री मात्र नवरसांचा परिपोष असणारे परिपूर्ण जीवन जगत आहे. शृंगार, हास्य यांच्याबरोबरच वीर, रौद्र, अद्भुत आणि भयानक याही रसांनी युक्त, कधी परिपूर्ण तर कधी खेदजनक जीवन जगत आहे. कारण सकारात्मकतेसोबत वाढणारी नकारात्मकता, हिंसा, अत्याचार आणि त्यामुळे निर्माण झालेली असुरक्षिता हे या भयामागचे खरे कारण आहे.
या आधुनिक जगात काळासोबत बदलताना ती वैमानिक, सैनिक, फायरवुमन होऊन वीर रसाची अनुभूती घेऊ लागली. प्रशासन, राजकारण, शिक्षण, उद्योग या क्षेत्रांत काम करताना निष्क्रियतेशी, दांभिकतेशी आणि खोटेपणाशी लढताना तिला रौद्र रूप धारण करावं लागू लागलं. डोंबाऱ्याच्या मुली दोरीवर चालतात किंवा सर्कशीतल्या मुली अवकाशात ज्या विश्वासाने झेपावतात, तेव्हा त्या अद्भुताची अनुभूती घेतात. आधुनिक जीवनशैलीने स्त्रीला स्वावलंबी केलं, पण ती आता सुरक्षित राहिलेली नाही. त्यामुळे भंवरीदेवी किंवा दिल्लीची निर्भया यांच्यासारख्या शेकडो स्त्रियांच्या वाट्याला ‘भयानक’ अनुभवही येत आहेत आणि तिच्या आधुनिक व स्वतंत्र जगण्याला कारुण्य व्यापून टाकत आहे. मात्र निराश व्हावं, अशी परिस्थिती नाही. आताची स्त्री ही जागृत आहे. जाचक अंधश्रद्धांचे उंबरे ओलांडून तंत्रज्ञानाचा हात धरून अतिशय आत्मविश्वासानेच पाऊल टाकणारी आहे.

खरं तर अष्टभुजा किंवा अष्टलक्ष्मीची रूपं ही प्रत्येक स्त्रीमध्ये सामावलेलीच असतात. त्यांचंच आपण प्रतीकात्मक पद्धतीने नवरात्रीमध्ये पूजन करतो. ती मूर्तीत नाही तर प्रत्येक स्त्रीमध्येच आहे. ती दुर्गा आहे, तीच रणचंडी आहे, ती महिषासूरमर्दिनी आहे, तीच अभिसारिका आहे आणि तीच वत्सल माता आहे. स्त्री ही शक्ती, प्रकृती आणि सृजनाचे मूळ आहे. त्यामुळेच जीवनातील सर्व संकटांवर ती आपल्या सोशिक, समंजस आणि सात्त्विक वृत्तीने मात करू शकते.
आज शाळा, महाविद्यालये, बँका, माध्यमं, सामाजिक क्षेत्र, राजकीय, चित्रपट, साहित्य, संगीत या सर्वच क्षेत्रांत स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने मुद्रा उमटविली आहे. म्हणूनच पूर्वीच्या स्त्रीच्या संदर्भात फार वेगळी भाषा वापरली जात असे. उदा. ‘बाईचं जीवन कवडीमोल आहे,’ ‘बायकांना काय कळतं,’ ‘बाईनं फक्त चूल-मूल करावं’ अशी आणि याहूनही कटू भाषा वापरली जात असे. अलीकडच्या काळात ही भाषा सौम्य झाली आहे आणि काही ठिकाणी तर खूप बदललेली आहे. उदा. ‘पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री,’ ‘बाई शिकते आहे,’ ‘तिला मुलगा आवडलाय का विचारा,’ ‘आमची मुलगीच आमचा मुलगा आहे,’ ही वाक्यं बदलत असलेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक स्थितीचं भान देणारी आहेत. जी भारतीय समाजाला एका उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जात आहे.

शांत रस हा नववा रस मानला जातो. भारतीय अध्यात्माने मोक्षप्राप्तीच्या मार्गाने निघालेल्या, षड‌्रिपुंचा त्याग केलेल्या आणि निर्मोही अवस्थेला पोहोचलेल्या माणसाला शांत रसाची अनुभूती येते, असे सांगितले आहे. संसार करताना स्त्री कर्मकांड करते, मात्र संसारातून बाजूला गेल्यावर या अवस्थेचा अनुभव घेतेच.

स्त्रीला सोसावं लागत असलं तरी त्यातूनही आनंद कसा मिळवता येईल, याचाच ती निरंतर शोध घेत असते. सर्व रसांचा परिपोष असणारं रंग, सूर आणि शब्दांनी मोहरलेलं आयुष्य आपण जगायचं आणि इतरांनाही तितकंच भरभरून द्यायचं, हा तिचा स्थायीभाव. सृष्टीचं चक्र फिरत राहावं म्हणून हजार हातांनी ती देत राहते आणि माणसांना संतुष्ट, संपन्न आणि तृप्त करीत राहते.
(jyoti25.swami@gmail.com)