आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशावादाची कादंबरी ‘घर गेलं वाहून’ लवकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खासगी बेकायदा सावकारांच्या तावडीत सापडलेल्या बबन नावाच्या नामवंत शिक्षकाची घुसमट येथील प्रा. श्रावण गिरी हे लेखक आपल्या ‘घर गेलं वाहून’ या कादंबरीतून मांडत आहेत. स्वेच्छा निवृत्तीनंतर देवगिरी प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गिरी यांनी लिखाण सुरू असलेल्या या कादंबरीच्या माध्यमातून संस्थाचालकांना चुकीचे मार्गदर्शन करत शिक्षकांविरुद्ध भडकावणारे मुख्याध्यापक, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील दलाली करणा-या अधिकारी स्तरावरील आणि मध्यमवर्गीयांना वेठीस धरून बेकायदेशीर सावकारी करणा-या समाजातील तथाकथित प्रतिष्ठितांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाची ओठावर भाषा आणि प्रत्यक्षात क्षुल्लक कारणावरून शिक्षकांना वेठीस धरणारा, स्वत:च्या कंपूत वावरणारा, अपु-या ज्ञानामुळे शाळासंहितेचा हवा तसा छंदिष्ट वापर करणारा, पालकांना गुणवंत शिक्षकांच्या अंगावर घालणारा, संस्थेतील बेबनावाचा गैरफायदा घेत शिक्षकांवर दडपशाही करणारा; छुपा सावकार मुख्याध्यापक ‘मला नाइलाजाने हे करावे लागते’ अशी साळसूद भूमिका घेत नायकाची कशी दमछाक करतो, याचे दाखले लेखकाने दिले आहेत. शिक्षण क्षेत्रातील दुटप्पी प्रशासन आणि अनधिकृत सावकाराची पोलखोल ओघवत्या शैलीत सहज संवादांतून लेखकाने मांडली आहे.
लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक, व्यापारी व वकील मंडळी बेकायदेशीर सावकाराची बाजू घेत एका स्थानिक पत्रकाराला नायकाविरुद्ध बदनामीकारक वृत्त छापण्यास प्रवृत्त करतात. सावकारांकडे पूर्वीच स्वाक्षरी करून दिलेल्या बाँडवर नंतर मजकूर लिहून तो बाँड नोटरी केला जातो. गावातीलच एका ऊसतोड मुकादमाला हाताशी धरून त्याच्या नावे अर्ज घेऊन ग्रामपंचायत दप्तरी नायकाच्या पीटीआरवर अनधिकृत बोजा टाकला जातो. अशा भयंकर अवस्थेतही संकटाशी मुकाबला करत नायक संयमाने व सनदशीर मार्गाने लढताना त्याच्या वाटेत मुख्याध्यापक काटे अंथरतो. स्वच्छ प्रतिमेचा दावा करत समाजातील प्रतिष्ठित पेन्शनची मंजूर रक्कम लाटण्यासाठी सरसावतात, तेव्हा होणारी घालमेल पचवत नायक उभा राहतो. हा दुर्दम्य आशावाद ‘घर गेलं वाहून’ या लवकरच हातावेगळ्या होणा-या कादंबरीतून रेखाटला आहे.
शब्दांकन : मुकुंद कुलकर्णी, बीड.