आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prof. Keshav Deshmukh Writes Article About Marathi Language In Nanded University

मराठी भाषा दिन: सार्थ संशोधन पुष्कळसे अल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 भाषा आणि भाषेतले शब्द पहिल्यांदा कानी पडतात, ते आईच्या मुखातून म्हणून ती मातृभाषा. या मातृभाषेचं खऱ्या अर्थाने शास्त्रशुद्ध जतन-संवर्धन होतं, ते शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून. विद्यापीठे ही भाषेची राखणदार आणि पालकही. या पालकांनी भाषाशास्त्राच्या अंगाने तिचं रक्षण करण्याबरोबरच  सातत्यपूर्ण शोध घेण्यावर आणि संशोधन करण्यावर तिचं भवितव्य अवलंबून. म्हणजेच, भाषेच्या भवितव्याची दोरी या विद्यापीठांच्या हाती. ती जितकी मजबूत िततकं तिचं भवितव्य उज्ज्वल. अशा प्रसंगी राज्यातल्या विद्यापीठांत सध्या कशा स्वरूपाचं मराठी भाषाविषयक शोध-संशोधन सुरू आहे, याचा खास मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून इंटरनेट आवृत्तीच्या वाचकांसाठी विभागप्रमुखांच्या नजरेतून घेण्यात आलेला हा विशेष आढावा...
 
सार्थ संशोधन पुष्कळसे अल्प
एखादे बीज स्वत:ला आधी गाडून घेते आणि उद्या रोपटे होऊन वर येते, असा हुन्नर संशोधकांत हल्ली अपवादाने आढळतो. त्यामुळे ‘मराठी’त एम. फिल. काय अथवा पीएच.डी. काय, या उभय वर्गातील संशोधन ‘अप्रतिम’ या शब्दांत समाविष्ट करावे, असे नक्कीच नाही. बहुतांश विद्यापीठांत मराठी विषयनिष्ठ संशोधनाचा झपाटा आणि सपाटा वेगवान असा असतो, याला आमचेही विद्यापीठ अपवाद नाही. पण सार्थ (मिनिंगफूल) संशोधन पुष्कळसे अल्प आहे. संशोधन म्हटले की त्याला चिंतनमूल्य, समाजमूल्य, संदर्भमूल्य, वाङ‌्मयमूल्य ही चार मूल्ये किंवा यापैकी एखादे तरी ठळक मूल्य असणे अभिप्रेतच असते. तर मग या श्रेणीचा मूल्य शोध कमीच गवसतो. या न्यायाने मराठी संशोधनाचा विद्यमान दर्जा हिरमोड करतो.

मुळात संशोधन ही फावल्या वेळेची (लिझर) गोष्ट नव्हे. डोक्यात लोभ ठेवून पार पाडावयाचे हे कार्यपण नव्हे! तर उलट ज्ञानात्मक (कॉग्निटिव) असे बिरूद स्वीकारलेले पीएच.डी. कार्य आहे. मी इथे एक दाखला मुद्दाम नमूद करेन की, ‘बदलते ग्रामीण वास्तव आणि मराठी कादंबरी’ या विषयावर आसाराम लोमटे आमच्याकडे पीएच.डी. पदवी प्राप्त झाले! संशोधन कसे पाहिजे, याचा अप्रतिम नमुना म्हणून या प्रबंधाकडे बघता येईल. लोमटेंचा प्रबंध आमच्या विद्यापीठाच्या मराठी विभागाचे मी गौरवचिन्ह मानतो!

‘भाषा’ हा शब्द केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टीने म. जोतिराव फुले, संत तुकाराम, डॉ. आंबेडकर, वारकरी कीर्तन परंपरा किंवा दादा कोंडकेंच्या मराठी चित्रपटांची लोकभाषा, कृषी-संस्कृतीतील स्त्रिया-पुरुष यांची भाषा किंवा शाहीर आणि लोककलावंताची एक खास असलेली ‘ढंगदार-जोरदार भाषा’ आदींचा अभ्यास म्हणूनच कळीचा ठरायला हवा. यासाठी विद्यार्थीशोध आणि विद्यार्थी ‘घडविण्यासाठी’ आमचा सर्वतोपरी प्रयत्न असतो. संशोधनात रोगटपणा (मॉरबॅडिटी) मूळ धरू नये, याचाही यत्न आम्ही करतो. शक्यतोवर नावीन्यपूर्ण, जरा आव्हानात्मक पण दमछाक करणारे आणि शेवटी समाधान देणारे मराठी भाषेचे, साहित्याचे नूतन विषय आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो.

भालचंद्र नेमाडे किंवा भुजंग मेश्राम, विश्वास पाटील, अथवा आदिवासी विश्वातील मौलिक काव्यलेखन आणि याशिवायही नरेंद्र दाभोलकरांचे विचार वाङ‌्मय, भाषांतर, लोकसाहित्य, संत साहित्य असे विषय निवडत एम. फिल, पीएच. डी. प्रबंधलेखन करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तरीही व्याकरण विद्या, विज्ञानवाङ‌्मय, मराठी आणि सिनेमा, बोलीविज्ञान, भाषा, समाज, मराठी आणि साहित्य या धाटणींचे विषय निवडून त्यावर काही एक मौलिक संशोधन मराठीची ध्वजा उंच करायला साहाय्य करील, असा आमचा समकाल दृष्टिकोन आहे. समकालीन (कंटेम्पररी) स्वरूपाचे विषय निवडतानाच अन्वर्थक (रेलेव्हन्ट) स्वरूपाच्या विषयांचे वेध मराठी संशोधनाला लगडले पाहिजे. या दृष्टीने विद्यार्थीशोध विभाग घेत असतो. अशा संशोधनातच मला वाटते की, मराठीची समृद्धी सामावलेली आहे.

‘मराठी’ म्हणून आणि ‘भाषा’ म्हणून संशोधनाची पत व प्रत या दोन्ही गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी विद्यार्थी-शिक्षक या दोघांचीही असतेच! पण या पलीकडेही :
१) बिनमुद्द्यांचे (पॉइंटलेस) संशोधन होऊ नये.
२) संशोधनाच्या मुळाशी मूलाधार (ओरिजनल सोर्स) हा असायलाच हवा.
३) संशोधनात अभिरुचीची अनेकता (प्ल्यूरॅलिटी) जपणे व तिचे संवर्धन व्हायला हवे.
४) आपले हे संशोधन विचारसाहचर्य (असोसिएशन ऑफ आयडियाज) जपणारे असावे.
५) मराठीच्या या सांप्रत संशोधनातून मताभिनिवेशाचा (डॉग्मॅटिक) दर्प न येता मूल्यविधानाची (व्हॅल्यू जजमेन्ट) अनुभूती यायला हवी.
६) भाषिक विश्लेषण (व्हर्बल अॅनालिसिस) म्हणून तसेच अधिकृतता (ऑथेन्टिसिटी) म्हणून मराठीच्या या संशोधनाची प्रत आणि किंमत सदोदित जपताच आली पाहिजे.

वर निर्देश केलेल्या सहा सूत्रांचा विचार करूनच आम्ही पावले टाकतो. परिश्रम, प्रतिभा आणि नावीन्य हे तीन परवलीचे शब्द मराठीच्या संशोधनात आम्ही शक्यतोवर नजरेआड होऊ देत नाही. इतरांनीही होऊ देऊ नये.

सर्वंकष मुद्रा
विद्यापीठातल्या पीएच. डी. प्रबंधांवर जेव्हा बारीक-सूक्ष्म नजर टाकतो, तेव्हा घागरभर पाण्यातून मला समाधान देऊ पाहणारे काही थेंबच हाताशी लागतात, पण ही बाब खंतावणारी नाही. कारण, हे माझे म्हणणे नकारघंटेचे नसून वास्तवभेद सांगू पाहणारे आहे. 
 
मी वर्षभरातील मागच्या प्रबंधविषयांवर या निमित्त दृष्टी टाकली, तेव्हा ‘मराठी गूढकथा’, ‘स्त्री नाट्यलेखक’, मराठी कादंबरीतील धरणग्रस्त-भूकंपग्रस्त यांचे चित्रण, ‘जाहिरातलेखन’, अथवा ‘मराठी सामाजिक नाटकातील वैद्यकीय वास्तव’, ‘मराठी साहित्यातील तमाशा कलावंतांचे चित्रण’, ‘दि. बा. मोकाशी’ किंवा ‘सुबोध जावडेकर’ यांच्या निराळ्या विषयावर संशोधन झालेले पाहायला मिळाले. ‘कविता-रती’, ‘विचारशलाका’ यांसारख्या वाङ‌्मय आणि विचार परंपरा सशक्त चालविणाऱ्या अनियतकालिकांवरही संशोधन झाले आहे. इतकेच नव्हे तर दलित - आदिवासी - ग्रामीण - महानगरी आणि विविध नवप्रवाहांच्या मौलिक साहित्यावर, चळवळींवर संशोधन झालेले आहे. काही नवे संशोधन सुरू आहे. भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरी, कविता, समीक्षा, मुलाखती (‘हिंदू’ या नेमाडेकृत बृहत कादंबरीवर विनायक येवले नावाच्या विद्यार्थ्याचे संशोधन दखलपात्र ठरावे!) यांचा धांडोळा घेणारे संशोधन विद्यार्थी करत आहेत. याचबरोबर विज्ञान साहित्यावर मौलिक संशोधन झाले आहे. भविष्यात अलक्षित अशा बाल-कुमार साहित्य, बोलीवाङ‌्मय, अनुवादित साहित्य, आजची उत्तम मराठी दूरदर्शन मालिका आणि मराठी किंवा मराठी आणि दादा कोंडके ते नागराज मंजुळे किंवा जगदिश खेबुडकर ते गुरू ठाकुर या संबंधाने नवे संशोधन मराठीत करता येईल का, याविषयी मंथन व त्यासंबंधीची चाचपणी आम्ही करत आहोत.
 
भाषाविज्ञान, वाङ‌्मयेतिहास, साहित्यसिद्धांत, व्याकरण-रचना, मराठी छंद, वारकरी आणि महानुभाव साहित्य अथवा चळवळींचे साहित्य उदा. आदिवासी साहित्यातील आत्मकथने, मराठवाड्यातील सण-उत्सवांतील गाणी, वामनदादांची गाणी, महात्मा बसवेश्वरांचे वाङ‌्मय, आंबेडकरी विचारप्रवाह किंवा मराठी कादंबरीतील शेतमजुरांचे चित्रण, संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, तौलनिक साहित्य : मराठी आणि इतर भाषा, वारकरी वाङ‌्मयातील लौकिक जीवन, मराठी कादंबऱ्या आणि समस्याप्रधानता, मराठी वैचारिक साहित्य आणि भटक्या-विमुक्तांचे चित्रण आदी. हे तर मराठीच्या संशोधनात ‘मध्यवर्ती’ आहेच. पण त्यातील पुनरावृत्ती टाळून, एकच गोष्ट पुन:पुन्हा न मांडण्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. मराठी भाषा व इतिहास म्हणून आदिम (प्रिमिटिव्ह) विषययुक्त म्हणून उत्खनन व उत्कर्ष हा तर सतत मांडला जावाच, पण याशिवाय ‘नवे’, ‘आव्हानात्मक’ आणि मराठीजागर बुलंद करणारे पण संशोधन व्हावे, हा ध्यास आम्ही जपू पाहात आहोत.
(रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
 
इ-मेल - keshavdeshmukh74@gmail.com
मोबाइल - 9404670321, 9422721631
 
(समन्वय-संकलन : समीर परांजपे)
 
बातम्या आणखी आहेत...