आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Professor Ranganath Tiwari Expressed His Feeling On Vijaynagar Empire

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विजयनगरच्या साम्राज्यावर प्रा. रंगनाथ तिवारींचे चिंतन लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनात निर्माण होणारे भाव, त्या भावनांचे आंदोलन, आंदोलनातून निर्माण होणा-या प्रतिमा अन् त्या प्रतिमांचे प्रत्यक्ष चित्रकृतीतून होणारे दर्शन साहित्य व्यक्त करत असते. अशाच साहित्याशी नाळ जुळलेले ख्यातनाम साहित्यिक म्हणजे प्रा. रंगनाथ तिवारी होय. मराठीतील अनेक ऐतिहासिक कादंब-या, कथासंग्रह आणि नाटके व हिंदीतून तीन कादंब-या लिहिणारे तिवारी सर सध्या विजयनगरचे साम्राज्य आणि योगी अरविंद यांचा अधिमानस्वाद या विषयावरील चिंतनात गुंतले आहेत.

21 जानेवारी 1933 रोजी सोलापूर येथे प्रा. तिवारी यांचा जन्म झाला. सर्वसाधारण कुंटुंबात जन्मलेल्या तिवारी सरांनी शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठातून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हिंदी विषयाचा विशेष लळा असल्यामुळे त्यांनी सन 1964 मध्ये अतिशय नावाजलेल्या अंबाजोगाईतील स्वाती रामानंद तीर्थ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य सुरू केले. रसाळ वाणीतून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेची गोडी वाढवताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मदतही केली. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर जाणा-या विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना शिक्षण सोडण्यापासून परावृत्त केले. देशभरातील विविध शासकीय कार्यालये आणि खासगी क्षेत्रातमध्ये त्यांचे विद्यार्थी नाव कमावत आहेत. इतिहासातील अनेक प्रसंगांचे जिवंत चित्रण करणे यात तिवारी सरांची हातोटी आहे. संपल्या सुरावटी, उत्तम पुरुष एकवचन, देवगिरी बिलावल (मराठी आणि हिंदी) यांसारख्या एकापेक्षा एक सरस कादंब-यांचे त्यांनी लेखन केले. स्वत: पुस्तके लिहिण्याबरोबरच अनेक हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत. इतिहासाच्या सोनेरी पानांवरील अनेक प्रसंग उत्कट आणि नाट्यमय रीतीने वाचकांपुढे ठेवणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. इतिहास आणि हिंदी हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय. त्यामुळे याच विषयांवरील अनेक पुस्तकांचे लेखन त्यांच्या हातून घडले. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने 1987-88 चा ह. ना. आपटे हा पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्यांच्याच ‘बेगम समरू’ या पुस्तकासाठी 2000-01 मध्ये राज्य शासनाचाच वि.स. खांडेकर पुरस्कार आणि सोलापूरचा भैरूरतन दमाणी पुरस्कारही मिळाला. तर काया-परकाया या या नाटकासाठीही 2004-05 मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. सखोल चिंतनातून उत्तमोत्तम ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्याच्या ध्यासातूनच त्यांनी ‘विजयनगरचे साम्राज्य’ या विषयावर काम सुरू केले आहे.

दक्षिण भारतातील हंपी येथे राजधानी असलेल्या विजयनगरच्या साम्राज्याला विशेष महत्त्व आहे. वरंगळच्या हरिहर व बुक्क या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. धार्मिक अन् कलासक्त राजा असा लौकिक असणारा आणि कलेची कदर करून गुणवान कलाकारांना पदरी बाळगणारे आणि स्वत:ही विपुल लेखन करणारा कृष्णदेवराय याच वंशातला. हे एकूण पाच भाऊ होते. त्यापैकी तिघे पूर्व किना-यावरील नेल्लोर ते पश्चिम किना-यावरचे बेळगाव येथे राज्य करत होते. महाराष्‍ट्र हरिहर राजाच्या अमलाखाली होता. दुसरा भाऊ होता कंप, त्याचे ‘उदयगिरी’ राज्य होते. मधला भाऊ बुक्कच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेगुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. दक्षिणेकडे शिमोगाजवळ अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता. इस्लामशी टक्कर देऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले राज्य उभे केले होते. बुक्करायाला कम्पराय नावाचा मुलगा होता. त्याने वीरबल्लाळाचे मदुरा काबीज केले. हा कम्परायही बुक्काप्रमाणेच शूर व कर्तबगार होता. त्याच्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्नीने लिहिलेल्या ‘कम्पराजविजयम’ या संस्कृत काव्यग्रंथात आढळतात. बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर त्याने दूसरा हरिहर असे नाव धारण करून स्वत:ला विजयनगरचा सम्राट घोषित केले. विजयनगर साम्राज्यातील अशा अनेक उत्कंठावर्धक घडामोडींनी भरलेला ग्रंथ तयार करण्यात तिवारी सर सध्या गुंतले आहेत.

विसाव्या शतकातील एक महान क्रांतदर्शी, युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी अशा अनेक उपाधींनी ओळखल्या जाणा-या योगी अरविंद यांचे जीवन आणि कार्य यावरही तिवारी सरांचे चिंतन सुरू असून दोन्ही पुस्तके लवकरच वाचकांना उपलब्ध होणार आहेत. स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ञ, योगी, महाकवी अशा अनेक भूमिकांमधून वाचकांना योगी अरविंद यांची ओळख करून देत त्यांच्या ‘अधिमानस्वाद’ या विषयाची माहिती देण्याचा तिवारी सरांचा मानस आहे.