आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: आधुनिक विचारधारेशी सुसंगत संशोधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रंथपरीक्षण, लेखनतंत्र, कथालेखन तंत्र या स्वरूपाच्या कार्यशाळा विद्यापीठात आयोजित केल्या जातात. अलीकडे राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने ही कार्यशाळा घेतली गेली. मॉरिशसहून महात्मा गांधी इन्स्टिट्यूटचे डॉ. बिद्दन अब्बा यांचे व्याख्यानही दूरवरचा मराठी संबंध कसा असतो, याचे दर्शन घडविणारा ठरला.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ‌्मय विभागाची पूर्वपरंपरा नि:संशय अध्यापन आणि संशोधनाशी निगडित आहे. त्यामुळे समीक्षा, संतसाहित्य, आधुनिक वाङ‌्मयीन प्रवाह, लोकसाहित्य, भाषाविज्ञान वाङ‌्मयेतिहास अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याचे प्रयत्न प्रारंभापासूनच आढळतात. अलीकडच्या काळात कालसुसंगत अशा भाषिक कौशल्य व सर्जनशील लेखनाचा विभागाच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला. 

याचबरोबर मराठवाड्यातील साहित्य, ग्रामीण-दलित स्त्रीवादी-आदिवासी यांच्या वाङ‌्मयीन चळवळी, साहित्याचे माध्यमांतर अशा आधुनिक विचारधारेला अभ्यासक्रमात स्थान दिले गेले आहे. तौलनिक साहित्याभ्यास, अनुवाद, मराठी लेखन, व्यावहारिक व उपयोजित मराठी, भारतीय संविधान, संशोधनाची तोंडओळख असे पूरक विषयही मराठीच्या अभ्यासक्रमात आले.
 
स्पर्धा परीक्षा (एम.पी.एस.सी./ यू.पी.एस.सी.) नेट, सेट, पेट यांसारख्या पात्रता परीक्षांना उपयुक्त ठरतील, अशा आशयविषयाचा समावेशही त्यात अंतर्भूत करण्यात आला आहे. जीवनजाणिवा आणि वाङ‌्मयीन जाणिवा विकसित होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी केली गेली आहे. अभ्यासक्रमाच्या या पायाभरणीतून तयार झालेला विद्यार्थी जेव्हा संशोधनाच्या क्षेत्रात उतरतो, तेव्हा भाषेचे व साहित्याचे सूक्ष्म विश्लेषण करू शकतो, असा दृष्टिकोन या पाठीमागे आहे.
 
सद्य:स्थितीत मराठी भाषा व वाङ‌्मय विभागात अनेकविध विषयांवर संशोधन चालू आहे. हे संशोधन केवळ ललित वाङ‌्मय प्रकारांशी निगडित न ठेवता, भाषेशी संबंधित असणारे विषयही या संशोधनकार्यात अंतर्भूत आहेत. त्यातही ललित साहित्य, वाङ‌्मय प्रकार, लोकसाहित्य या संदर्भातील विषय अभ्यासकांनी निवडले तरी त्यातही भाषिक अंगाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो. अलीकडच्या काळात संशोधनासाठी जे विषय आहेत, ते असे: साठोत्तरी नाटकातील भिन्न प्रवाह, मराठी कथेतील स्थित्यंतर व प्रयोगशीलता, महानुभाव व वारकरी यांचे रचनाप्रकार, कादंबरीचे निवेदन तंत्र, संतसाहित्यातील कृषी व पर्यावरणविषयक जाणिवा, नियतकालिकांची वाङ‌्मयीन कामगिरी, काव्यसमीक्षा, साहित्यकृतींचे माध्यमांतर, लोकगीतांचा समाजभाषा विज्ञानाच्या अंगाने अभ्यास, कादंबरीचा रूपबंध, म्हणी-उखाणे-वाक्प्रचार यांतून घडणारे लोकजीवनदर्शन, मराठी-हिंदीमधील दलित स्त्री आत्मकथने, मराठीतील (निवडक) वैचारिक लेखन, वाचनाभिरुची, आदिवासींच्या बोली, भटक्या विमुक्तांच्या बोली, विज्ञानसाहित्य, बालसाहित्य या विषयांवर संशोधन केले जात आहे. यातील काही विषयांवर संशोधन प्रबंध सिद्ध झाले आहेत. 
 
संशोधनासाठी जे विषय निवडले गेले आहेत, ते वाङ‌्मयीन प्रवाहांशी, वैचारिक लेखनाशी, वाङ‌्मयप्रकार व प्रवाहांच्या समीक्षेशी, संतसाहित्यातील अलक्षित राहिलेल्या विषयांशी, लोकसाहित्यातील शाब्दआविष्काराशी, बोली अभ्यासाशी, तौलनिक दिशेशी, स्थित्यंतरे व प्रयोगशीलतेशी निगडित आहेत. मराठी साहित्य व भाषेशी संबंधित असणारे येथील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या पिचलेले असतात. अभावग्रस्त वातावरणातून ते येतात. परंतु आनंदाची बाब म्हणजे, अलीकडच्या काळात सातपुड्याच्या परिसरात राहणारे आदिवासी विद्यार्थीही विभागात संशोधन करत आहेत. त्यांची बोली भिन्न आहे. तेही त्यांच्या बोलीची परंपरा, इतिहास, त्यांचे बोलीवाङ‌्मय यावर संशोधन करत आहेत. 
 
इमेल - dr.satishbadwe@gmail.com
मोबाइल क्र. - 9158997797
(मराठी भाषा व वाङ‌्मय विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
 
बातम्या आणखी आहेत...