आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Professor Satish Waghmare Article About Babasaheb Ambedkar, Divya Marathi

समग्र समाज कधी बघणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विसाव्या शतकातील एक जगमान्य महापुरुष, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती. समग्र आंबेडकरी जनतेची दसरा-दिवाळी! उद्यापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी भीमोत्सव साजरे होणार. हा संपूर्ण एप्रिल महिना म्हणजे आंबेडकरी विचारांच्या अस्मितेला सालाबादप्रमाणे धार लावली जाण्याचा कालखंड. आंबेडकर जयंतीला आंबेडकरी जनतेत अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते असायलाच हवे. समाजक्रांतीचे विराट तत्त्वज्ञान मांडणारी ताकद म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. दलित मुक्ती लढ्यास आरंभ करून भारतातील दलित, अस्पृश्यांची अस्मिता जागवली ती डॉ. आंबेडकरांनीच. आज थोडेफार प्रगत असलेले आंबेडकरी विचारांचे परंतु असंख्य गटातटात विभागलेले लोकदेखील उद्याच्या दिवसापुरता वेगळा जयभीम घालत नाहीत. फक्त उद्याच्या दिवसापुरता!

आंबेडकरी जनतेची दखल घ्यायलाच हवी, हा विचार इथल्या सर्व बिगर आंबेडकरी, राजकीय, बिगरराजकीय, सामाजिक, बिगरसामाजिक, साहित्यिक, बिगरसाहित्यिक आणि अजून बर्‍याच समूह गटांना करण्यास भाग पडणारा दिवस म्हणजे उद्याचा दिवस. मग काल का तसा विचार केला जात नाही? परवा-तेरवा काय होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरिता आवश्यक चिंतन आंबेडकरी समाजाने करणे अत्यंत गरजेचे आहे. बाबासाहेबांचे स्मरण करणे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता, प्रेम व्यक्त करणे म्हणजे केवळ उद्या नवे कपडे घालून पुतळ्याला हार घालून येणे नाही. वा नरड्याच्या नसा ताणून भाषणबाजी करणे नव्हे. बाबासाहेबांच्या विचारांचे बळ घेऊन जगण्याचा संकल्प करणे, तो काटेकोरपणे अमलात आणण्यासाठी राबणे, हे बाबासाहेबांचे खरे स्मरण ठरेल. वर्णद्वेष, वर्गद्वेष, जातीय अहंकार इत्यादी कुरुपे कापून काढून बाबासाहेबांच्या विचारांवर नीटस पावले टाकणे हे खरे स्मरण असेल.

दुर्दैवाने शिक्षित आंबेडकरी समाजाकडून, तरुणांकडून आज काय होतेय? एक भयानक जातीयवाद आंबेडकरी तरुणांकडून पोसला जातोय. तो अत्यंत घातक आहे. परिवर्तनाच्या लढाईमध्ये आवश्यक असणार्‍या समविचारी, इतर जातीय तरुण विचारवंतांना आंबेडकरी विचारधारेपासून दूर लोटण्याचे कुकर्म या नव्या जातीय अहंकारातून आंबेडकरी तरुण करत आहे. आंबेडकरांनी इथल्या सनातनी इतिहासाबरोबर जी झुंज दिली आणि यश खेचून आणले, त्या कडव्या झुंजीत बाबासाहेबांच्या बरोबर असणार्‍या लोकांत फक्त बाबासाहेबांच्याच समाजाचे लोक होते काय? चित्रे, लेले, चिटणीस, शास्त्री, सहस्रबुद्धे, ही सगळी सोबत असलेली माणसे ब्राह्मण जातीची होती. बाबासाहेबांनी यांच्या जातीचा द्वेष केला नाही. त्या जातीत असणार्‍या, काही लोक बाळगणार्‍या त्या वाईट वृत्तीचा त्यांनी द्वेष केला. वाईट वृत्तीविरहित समविचारी माणूस, तो कोणत्याही जातीचा असो; तो आपला मैत्र असायला हवा. आणि म्हणूनच बाबासाहेबांना त्यांच्या लढ्यात कित्येक सवर्णांनी साथ दिल्याचे आपल्याला दिसते. आजचा आपला तरुण सरसकट जात बडवताना जास्त दिसतो. आणि प्रवृत्तीवर आघात करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्याची कढी पातळ होते. हे निखालस कटू वास्तव जागोजागी पाहायला मिळते. थेट आणि प्रत्यक्ष लढ्यात शिक्षित तरुणांचा वाटा अत्यंत अल्प आहे. सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे शहरी तरुण अधिक सशक्तपणे व्यक्त होताना दिसून येतो. पण तो जे काही व्यक्त होतोय, ते कौतुकास्पद न ठरता चिंतनीय ठरते आहे.

आंबेडकरी तरुणांच्या डोळ्यांवर चश्मा आंबेडकरी विचारांचाच असायला हवा, हे हजार टक्के मान्य! पण त्या चश्म्यातून त्यांनी आंबेडकरी समाजाबरोबरच समग्र समाज पाहायला, अनुभवायला, मांडायला हवा. परखड आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आज आंबेडकरी तरुणाला आहे. पेपरमधल्या वधूवरविषयक जाहिरातीत ‘एस सी, एस टी क्षमस्व’ची खिल्ली उडवताना आपण धर्मांतरित, मातंग, चांभार वा भटके यांच्या मुली कितपत स्वीकारल्या आहेत? आजही लाडवन गोडवन, सोमवंशी, सूर्यवंशींची थेरं आंबेडकरी लग्नसराईत थैमान घालताना दिसतातच. नवसाहित्यिक, नवकलावंतांची तर बातच न्यारी. सूर्यनारायण आयुष्यात दोनदा भ्याला हे आपण जाणतो. सकाळचा नाष्टा म्हणून मारुती लाल फळ समजून सूर्याला गिळायला गेला त्या वेळेस, आणि नंतर काय ते राहू केतू शनी साडेसाती ग्रहण वगैरे या म्याटरमध्ये. नंतर बरेच दिवस तो कशाला भ्याल्याचे ऐकिवात न्हवते. पण हल्ली मात्र तो नवीन दलित कवींना चळाचळा कापू लागल्याचे ऐकून आहोत. हर कवितेत त्याला गिळले, गाडले जाण्याची धमकी सोसावी लागतेय. कवी लोकांनी पार वाट लावली त्याची! आणि हेच कवी लोक माहिती अधिकारात अर्ज करता का, म्हटले की सतीश शेट्टीचं उदाहरण देतात. नामदेव ढसाळ, दया पवार, राजा ढाले, अविनाश गायकवाड या कृतिशील कवींची लढाऊ परंपरा विसरून केवळ अनुकरणातून क्रांतीच्या नावचे पुळचट जहरी काव्य प्रसवत आहेत. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेत पुढे जात, त्यांनी आयुष्यभर जे विचार मांडले, जे विचार मातीतून माणूस घडवायला कारणीभूत ठरले, ते विचारधन आज नव्यानं दमदार संकल्प करून जोपासण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.

बाबासाहेब केवळ भावनेतून स्वीकारणे आजच्या काळात अत्यंत लटके आणि तात्पुरते बळ देणारे असेल. इथल्या प्रस्थापित समाज, राज्यकर्त्या समूहाशी लढताना नितांत गरज आहे ती बाबासाहेबांच्या सर्वंकष विचारांच्या अभ्यासाची, त्यांच्या सर्व जातिसमूहांकडे बघण्याच्या अभ्यासू दृष्टिकोनाची. बाबासाहेबांनी मी तीन गुरू केले असे म्हटले; भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतिराव फुले. या तिन्ही गुरूंनी त्यांची वैचारिक जडणघडण केली. यांच्या कुणाच्याही विचारात जातीपेक्षा प्रवृत्तीवर हल्ला, हे सूत्र आपल्याला आढळते. हेच नेमके लक्षात घेऊन प्रवृत्ती चेचायला हव्यात. बाबासाहेब समविचारी सहकारी ब्राह्मण समाजाचे, मराठा समाजाचे मैत्र राखूनदेखील कडवट व अजिबातच तडजोड नसलेली झुंज देत होते. ‘भाला’कार भोपटकर आणि बहिष्कृत भारतकार आंबेडकर यांच्यातला वाक्युद्धाचा रंग आपण पहिला तर बाबासाहेब जशास तसे, ठोशास ठोसा हे धोरण अगदी समर्थपणे वापरत होते, हे लक्षात येते. ‘अस्पृश्यांनी देवळात शिरण्याचा अविचार केल्यास त्यांच्या पाठी सडकल्या जाण्याचा संभव आहे.’ या धमकीला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, ‘आमच्या पाठी सडकण्याची धमकी देणार्‍यांची प्रसंग पडल्यास टाळकी शेकण्यास आम्ही कमी करणार नाही.’

धोरणाने बाबासाहेबांनी परजातीतील चांगले लोक स्वीकारले आणि वाईटांना सडकले. बाबासाहेबांच्या अनुयायांनादेखील हे सहज शक्य आहे. परिवर्तनाची, क्रांतीची सामाजिक लढाई हा फक्त आपलाच, आपल्याच जातीचा ठेका नसून समाविष्ट होणार्‍या सर्व परजातीतील समविचारी मित्रांना सामावून घेऊन, त्यांच्याबद्दल जातीय अहंकार न बाळगता, सामुदायिक लढा लढून जिंकणे, ही आजची खरी गरज आहे. दलित समाजात जन्माला आलेल्या बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे एक अखंड संघर्ष ! भारतात लोकशाही यावी म्हणून त्यांनी आपले आयुष्य वेचले, विद्वत्ता पणाला लावली. दलित जाती-जमातीत स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. मानवाला खरा मानवी चेहरा देणारे सामाजिक तत्त्वज्ञान विशद केले. आणि म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या दलित समाजातील तरुण विचारवंतांवर इतरांपेक्षा मणभर जास्त जबाबदारी आहे ती बाबासाहेबांचे क्रांतिकारी तत्त्वज्ञान काटेकोरपणे पाळण्याची. आणि त्यांनी ती समर्थपणे पेलायला हवी. हे बाबासाहेबांचे खरे स्मरण, वंदन आणि त्यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करणे ठरेल.