आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभानः प्रकाशबिजं फलवणारं 'रिंगण'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अतुल पेठे आणि राजू इनामदार यांचे रिंगणनाट्य एक प्रयोग आहे. प्रायोगिक करायचं, म्हणून हा प्रयोग उभारलेला नाही. भवतालाच्या भानातून आकारलेला तो एक नाट्यचळवळीचा उत्तम नमुना आहे. नाटक लिहिणारे-करणारे-पाहणारे यांची समाज-संस्कृतीशी गुंफलेली ही एक धारा असते.
कसबा सांगावच्या आमच्या शाळेत माझ्यापेक्षा चार एक वर्षाने मोठा असणारा सुनिल स्वामी वेगळ्याच रूपात मला पुण्यात भेटला. त्याच्याबरोबर त्याची पत्नी शोभा (आमच्याच गावची) आणि इचलकरंजी परिसरातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते. सुनिल स्वामीला मी लहानपणापासून पाहात आलो आहे. कधी शाळेतल्या निवडणुकीतील कार्यकर्ता म्हणून, कधी हुशार विद्यार्थी म्हणून, तर कधी आमच्याबरोबरचा भजनकरी. त्याचे आजोबा आणि माझे आजोबा दोघेही वारकरी, जिवाभावाचे दोस्त आणि गांधीवादी कार्यकर्ते. ‘रिंगणनाट्य’ पुस्तक-प्रकाशन कार्यक्रमात सुनिल स्वामीने आपल्या कलाकार-दोस्तांबरोबर डॉ. आंबेडकर आणि संविधानावर पोवाडा सादर केला. त्याला पोवाडा सादर करताना पहिल्यांदाच पाहात होतो. अतुल पेठे-राजू इनामदार यांच्या दोन वर्षांच्या कार्यशाळेत शिकून, तिथून प्रेरणा घेऊन सुनिलसारखे कलाकार आपली कला सादर करत होते. इचलकरंजीजवळच्या कबनूरसारख्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सक्रिय सहभाग देत ही मंडळी दूरवर, पुण्याला अतुल-राजूच्या पुस्तक-प्रकाशनाला आले होते. माझ्यासाठी तो भावनिक आणि बौद्धिक अनुभव होता. वेगवेगळ्या काळाचे आणि संदर्भांचे डॉट्स जोडण्याचा अनुभव. नरेंद्र दाभोलकरांसारख्या धडाडीच्या कार्यकर्त्याने गावोगावी रुजवलेली ही समग्र, विवेकी विचारांची प्रकाशबीजे. भरण-पोषण करून ती प्रकाशबीजं फुलवणारं ‘रिंगणनाट्य’. गावोगावच्या, तळागाळातल्या प्रकाशबीजांचा सामूहिक मिलाफ महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांच्या ‘रिंगण’ प्रयत्नांतून दिसून येतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यानंतर एका अस्वस्थतेतून महाराष्ट्राच्या विविध भागांत ‘रिंगणनाट्य’ उभी राहिली. बघता-बघता नाटकाने चळवळीचे रूप धारण केले. त्यातून ‘सापडलं रे सापडलं’, ‘ऐसे कैसे झाले भोंदू’, ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम’ अशी वीस-एक नवीन नाटकं लिहिली गेली. तेवढीच नवीन गाणी आणि नव्या घोषणा उभ्या राहिल्या. खुनानंतरच्या भयावह वातावरणात अतुल पेठे लिहितात, “माझ्यासारखा नाटकवाला काय करू शकतो? माझ्यावर होणाऱ्या परिणामांना मी कशा तऱ्हेने वाट करून देऊ शकतो? नाटक हेच माध्यम आहे माझ्याजवळ, जे जाणवतं आहे ते बोलण्याचं! तेव्हा डॉक्टरांच्या खुनानंतर मला त्यांना आदरांजली वाहून सर्जनशील आणि सनदशीर निषेध करायचा होता. ‘रिंगण’ ही त्यातूनच पुढे आलेली संकल्पना आहे.”

अतुल पेठे आणि राजू इनामदार यांचे रिंगणनाट्य एक प्रयोग आहे. प्रायोगिक करायचं, म्हणून हा प्रयोग उभारलेला नाही. भवतालाच्या भानातून आकारलेला तो एक नाट्यचळवळीचा उत्तम नमुना आहे. नाटक लिहिणारे-करणारे-पाहणारे यांची समाज-संस्कृतीशी गुंफलेली ही एक धारा असते. ‘रिंगणनाट्य’ पुस्तकाच्या प्रकाशनादिवशी शैला दाभोलकरांनी एक मुद्दा सोप्या भाषेतून मांडला. तो मला महत्त्वाचा वाटतो. ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील पणशीकरांच्या अभिनयाने गाजलेल्या नाटकाबद्दलची आठवण त्या सांगत होत्या. एखाद्या भूमिकेत सहज शिरण्याच्या पणशीकरांच्या वकुबाचे कौतुक करून दाभोलकर ‘रिंगण नाटकातल्या’ कलाकारांच्या प्रक्रियेबद्दल इनसाईफूल बोलून गेल्या. त्यांच्या बोलण्याचा आशय असा होता की, चळवळीचा अविभाज्य भाग असलेल्या नाटकातल्या कलाकाराला भूमिकेत शिरून ‘अभिनय’ करावा लागत नाही, कारण तो ‘अभिनय’ जगत असतो. नाट्यकला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिनयाच्या दोन स्कूल्स समजून देण्यासाठी एखादा प्राध्यापक भलीमोठी तयारी करून वर्गात जातो. इथं ‘रिंगण’ हाच एक वर्ग बनतो. ‘रिंगण’मधला कलाकार भूमिकेत शिरत नसतो तर तो भूमिका जगत असतो. त्याला वेगळ्याने अभिनय करावा लागत नाही. अतुल पेठे आणि राजू इनामदार अशी भूमिका जगणाऱ्या कार्यकर्त्याला आणि ती सादर करणाऱ्या कलाकाराला जगण्याचे आणि कलेचे भान देत असतात. या भानाचे प्रत्यंतर ‘रिंगणनाट्य’ या पुस्तकातून पानोपानी दिसून येते.

साधना प्रकाशनाच्या ‘रिंगणनाट्य’ या देखण्या पुस्तकाचे स्वरूप नाट्य-कार्यशाळेची नोंदवही, असेच आहे. जगभरात अशा नोंदवह्या क्वचितच प्रकाशित केल्या जातात. मराठीत अशा नोंदवह्या प्रकाशित होण्याची परंपरा तशी नाहीच. जी काही आहे ती चरित्र वा आत्मचरित्राच्या स्वरूपात कुठे कुठे येते. मराठीत नाटककाराने नाटक लिहावे, दिग्दर्शकाने ते बसवावे आणि नटांनी दिग्दर्शकाला फॉलो करावे, असेच काहीसे. दिग्दर्शक नाटक कसे उभे करतो? दिग्दर्शकाचे नटाबरोबरचे नाते कशा स्वरूपाचे असते? नाटककार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांच्यातील देवाणघेवाण कशा स्वरूपाची असते, याच्या नोंदी वाचायला मिळणे वा ऐकणे अत्यंत दुर्मीळ असते. अशा नोंदी नसल्यामुळे नाटकात विविध कला आणि ज्ञानशाखांचा कसा संगम असतो, अशा मूलभूत माहितीवाचून इथली नाट्य-समाज-संस्कृती कुपोषितच राहते. मग, ‘नाटककाराचे नाटक’ आणि ‘दिग्दर्शकाचे नाटक’ अशा अर्ध्या-कच्च्या शिजलेल्या आणि सरधोपट विचारांचा प्रसार होत राहतो.

तर, ‘रिंगणनाट्य’ हे पुस्तक म्हणजे ‘महाराष्ट्र अंनिस लोकरंगमंच’च्या पाच दिवसीय ‘अनुभव कार्यशाळे’ची नोंदवही. ‘भारतीय संविधान’ हा या कार्यशाळेचा विषय. या कार्यशाळेव्यतिरिक्त वेगवेगळ्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इनामदार आयोजित करत आले आहेत. नाट्यक्षेत्रातील भरीव योगदानाविषयी अतुल पेठे माहितीचे आहेत, तर अजीम उर्फ राजू इनामदार यांचे सामाजिक चळवळीशी निगडित कार्य मान्यता पावलेले आहे. असे असले तरी हे दोघे कार्यशाळेत सामील झालेल्या कार्यकर्ते-कलाकारांना आपल्या बायोडेटाने आणि मास्तर-विद्यार्थी उतरंडीने दडपून टाकत नाहीत.

नाटक हा एक समग्र अनुभव असतो. ‘रिंगणनाट्य’ पुस्तकात नोंदवल्याप्रमाणे नाटक म्हणजे नुसती घोषणाबाजी नसते किंवा ‘सामाजिक’ वगैरे असं काही ढोबळ नसतं. ‘रिंगणनाट्य’ हे पुस्तक ‘सामाजिक नाटका’बद्दलच्या एका सार्वत्रिक समजावर बोट ठेवते, हे फार महत्त्वाचे, प्रामाणिक आणि जबाबदारीचे काम आहे. खरं तर, ‘सामाजिक’ आणि ‘नाटक’ वेगळं मानायचं काही कारण नाही. आपल्या संस्कृतीत कला आणि समाज यामधे सर्रास केल्या जाणाऱ्या ढोबळ तुलनेतून असं वेगळेपण येतं. तत्त्वज्ञान, कला आणि ज्ञान हातात हात घेऊन येतात. स्वतःकडे आणि भवतालाकडे पाहण्याची आपली दृष्टी आपल्या भूमिका, दृष्टिकोन आणि हेतू यातून विकसित होत जाते. उत्तम नाटक आणि सशक्त चळवळ एकमेकांतील गुंते समजून घेत आणि भवतालाच्या चिकित्सक भानातून आकाराला येते. ‘रिंगणनाट्या’च्या प्रयोगानंतर चर्चा होते. लोक अस्वस्थ होतात, प्रश्न विचारतात. या प्रश्नांची उत्तरं कलाकार वा समाज आपल्याला-स्वतःला-दुसऱ्याला देत असतात. एखादा वैज्ञानिक शोध, एखादा चित्रपट, एखादे तात्त्विक प्रवचन, एखादे गाणे, एखादी कादंबरी वा एखादे नाटक असे प्रश्न समोर ठेवत असतात. तिथे ती सुरुवात असते. यातल्या कशाचाही शेवट नसतो. एखादी सुरुवात नव्या प्रश्नोत्तरांची मालिका असते. या मालिकेतील एक कडी म्हणून ‘रिंगणनाट्या’कडे आपण पाहू. अशा कड्यांची मालिकाच जगभरात दिसून येते. एक कडी बादल सरकारांच्या नाटकाने दिली. एक, सफदर हाश्मींच्या नाटकाने दाखवली. दारिओ फो आणि फ्रँका रेम या इटालियन नाट्य कलाकारांनी एक कडी दिली. पॅलेस्टाईनमधल्या शोषण-संघर्षाला समोर आणणारे फ्रीडम थिएटरही अशी एक कडी ठरते. अशाच एका कडीचे हे रिंगणनाट्य आणि ‘रिंगणनाट्य’ पुस्तकाचा दस्तऐवज समाज, संस्कृती आणि कलेविषयीच्या समग्र भानासाठी बहुमोल ठरतात.

नाटक हा एक समग्र अनुभव असतो. ‘रिंगणनाट्य’ पुस्तकात नोंदवल्याप्रमाणे नाटक म्हणजे नुसती घोषणाबाजी नसते किंवा ‘सामाजिक’ वगैरे असं काही ढोबळ नसतं. ‘रिंगणनाट्य’ हे पुस्तक ‘सामाजिक नाटका’बद्दलच्या एका सार्वत्रिक समजावर बोट ठेवते, हे फार महत्त्वाचे, प्रामाणिक आणि जबाबदारीचे काम आहे.
potdar.ashutosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...