आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएसआय मुख्य परीक्षा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व परीक्षेच्या निकालानंतर उमेदवारास मुख्य परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा लेखी, शारीरिक चाचणी व मुलाखत अशा तीन टप्प्यात पार पडते. मुख्य परीक्षेसाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्र निवडून परीक्षा शुल्क सादर करणे महत्त्वाचे ठरते. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेस पात्र समजले जात नाही. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न येथे विचारले जातात. यांस एकूण 400 गुण आहेत. प्रत्येकी 200 गुणांचे 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी विषय 130 गुणांसाठी तर इंग्रजी विषय 70 गुणांसाठी असतो. दोन तासांच्या कालावधीत उमेदवाराने हे पेपर सोडविणे गरजेचे असते. यासाठी पदवीचे ज्ञान उमेदवारास असणे आवश्यक आहे. पेपर क्रमांक 2 मध्ये सामान्यज्ञान, बुद्धिमापन व अन्य विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांत हे प्रश्न विचारले जातात.


० पेपर क्र. 1 : इंग्रजी व मराठी विषयातील सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार याचा अर्थ आणि उपयोग तसेच उता-यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात. इंग्रजीमधील काळ, उपपदे, कर्तरी व कर्मणी प्रयोग, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन, शब्दांच्या जाती, नाम, लिंग विचार, वचने, सर्वनाम, विशेषणे, क्रियापदे, विरामचिन्ह, वाक्यांचे प्रकार, भाषांचे अलंकार, म्हणी, वाक्प्रचार, आकलन यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मराठीतील वाक्प्रचार, म्हणी, तसेच अत्यावश्यक व्याकरण माहीत असणे गरजेचे आहे.


०पेपर क्र. 2 : पेपर क्रमांक 2 हा चालू घडामोडींवर आधारित असून जगातील तसेच भारतातील महत्त्वाच्या घडामोडी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन व अन्य विषयांचा समावेश या पेपरमध्ये होतो. चालू घडामोडी 30 गुण, बुद्धिमत्ता चाचणी 40 गुण, मुंबई पोलिस कायदा 40 गुण, मानवी हक्क व जबाबदा-या 40 गुण, महाराष्‍ट्राचा भूगोल 40 गुण, महाराष्‍ट्राचा इतिहास 25 गुण व भारतीय राज्यघटना 15 गुण असे ढोबळमनाने
प्रश्न विचारले जातात.
मुख्य परीक्षा ही औरंगाबाद, मुंबई, नागपूर व पुणे या चार केंद्रांमध्ये पार पडते. या केंद्रांमधून एक केंद्र उमेदवारास निवडावे लागते. या परीक्षेच्या गुणांची सीमारेषा, विविध सामाजिक प्रवर्गासाठी वेगवेगळी असते. या सीमारेषेहून अधिक गुण मिळविणा-या उमेदवारास शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी निवडले जाते. खुल्या गटातील उमेदवाराने 35 टक्के तर मागास गटातील उमेदवाराने 30 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असते. माजी सैनिक व गुणवत्ताधारक पात्र खेळाडूंनी 20 टक्के गुण मिळविणे आवश्यक असते. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याची बातमी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्यात येते. तसेच शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला ई-मेलद्वारे व मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे वैयक्तिकरीत्या कळविण्यात येते. मुख्य परीक्षेसाठी विविध खाजगी तसेच शासकीय मार्गदर्शन संस्थांकडून टेस्ट सिरीज उपलब्ध असते. उमेदवाराने या टेस्ट सिरीज देऊन आपला अभ्यास कसा सुरू आहे याची चाचपणी करून घ्यावी. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवाव्यात. जास्तीत जास्त सरावामधूनच उमेदवार परीक्षाभिमुख होऊ शकतो. पुढील लेखात प्रत्येक विषयाचा विस्ताराने अभ्यास कसा करावा व त्यासाठी बाजारातील कोणकोणते संदर्भ ग्रंथ वाचावेत, याची सखोल माहिती देणार आहोत.

क्रमश: