आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिखलीकरचा चिखल व विश्वेश्वरय्यांचे कमळ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची अभियांत्रिकी कारकिर्द नाशिक विभागातून (तेव्हाचा खानदेश विभाग) सुरू झाली आणि आपल्या गौरवशाली देदीप्यमान कामामुळे ज्यांना ‘भारतरत्न’ हा बहुमान मिळाला, त्याच नाशिकमध्ये चिखलीकर या कार्यकारी अभियंत्याला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक व्हावी आणि त्याच्याकडे शंभर कोटींहून अधिक बेहिशेबी संपत्ती सापडावी, हा मोठा दैवदुर्विलास आहे. चिखलीकरांची रक्कम मोजायला मशिन्स आणावी लागली आणि सोनं मोजायला सराफांना पाचारण करावे लागले. शिवाय ही संपत्ती तर फक्त घरात सापडलेली आहे. त्याशिवाय जमिनी, प्लॉट, अनेक शहरांतील घरे, लॉकर्स, सोने, पत्नी व नातेवाइकांच्या नावावरील संपत्ती यांची मोजदाद करायला आठ दिवसांपेक्षा अधिक काळ लागला. तरीदेखील या ज्ञात संपत्तीहून अधिक व अद्यापपावेतो अज्ञात असलेली संपत्ती कितीतरी ठिकाणी दडवलेली असेल, त्याचा अद्याप शोध लागायचा आहे. या प्रसंगाच्या निमित्ताने भारतरत्न विश्वेश्वरय्यांचे स्मरण आवर्जून झाले. त्यांच्या काही आठवणींना उजाळा मिळावा व सध्या अस्तित्वात असलेल्या हजारो अभियांत्रिकी महाविद्यालयांतून दरवर्षी उत्तीर्ण होणा-या लाखो अभियंत्यांच्या या तरुण पिढीला चिखलीकरांच्या चिखलाव्यतिरिक्त विश्वेश्वरय्यांच्या कमळाच्या सुरस कथा कळणे जसे आवश्यक आहे, तसेच एक अभियंता भारतरत्न का व कसा बनू शकतो आणि आपल्या कर्तबगारीने अभियांत्रिकी क्षेत्राची मान कशी उंचावू शकतो, याचेही ज्ञान असणे आवश्यक आहे.


घड्याळ्याच्या ठोक्यावर काम न करणारे विश्ववेश्वरय्या सकाळी नियोजित वेळेपेक्षा दोन-तीन तास आधीच कामावर जात. तसेच संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यालयात काम करीत. त्यांच्यामुळे त्यांच्या कार्यालयातील त्यांच्या कर्मचा-यांनादेखील सकाळ-संध्याकाळ अधिक काम करावे लागे. ही बाब विश्वेश्वरय्यांच्या लक्षात येताच त्यांनी शासनाला पत्र लिहून आपल्या कर्मचा-यांना अधिक कामाचा जादा मोबदला (ओव्हरटाइम) देण्यात यावा, याबद्दल विनंती केली. पण, अशी विनंती केली म्हणून विश्वेश्वरय्या मोठे नव्हते, तर या जादा मोबदल्याची रक्कम माझ्या पगारातून त्यांना देण्यात यावी; कारण माझ्या जास्त काम करण्याच्या सवयीमुळे हा जादा मोबदल्याचा भार शासनाच्या तिजोरीवर पडता कामा नये, ही त्यांची भूमिका होती. या भूमिकेमुळे विश्वेश्वरय्या महान होते. ज्यांची कार्यालये संध्याकाळनंतर गजबजतात व हा ओव्हरटाइम स्वत:ची लॉकर्स भरण्यासाठी कारणी लागतो, त्या सर्वांना विश्वेश्वरय्यांची ही भूमिका एक सणसणीत चपराक आहे. स्वत:ची लॉकर्स न भरता शासनाच्या तिजोरीचा विचार करणारे विश्वेश्वरय्या म्हणूनच भारतरत्न झाले आणि ज्यांनी लॉकर्स भरले त्यांच्या करोडो रुपयांच्या नोटांची किंमत आज रद्दीसमान झाली. त्यांच्या संपत्तीतील सगळ्या हि-यांचे कोळसे झाले. या सगळ्या संपत्तीचा आज ती ज्यांनी कमावली त्यांना काय फायदा? ना ते तिचा उपभोग घेऊ शकतात ना त्यामुळे ते मोठे झाले. भावी पिढीला चिखलीकरांच्या या प्रकरणामुळे हा मोठा संदेश मिळाला आहे की, जी संपत्ती आपल्याला बदनाम करते, तुरुंगात पाठवते, छातीत कळा आणते, ती चुकीच्या मार्गाने मिळवावी का? प्रामाणिकपणे काम करून भारतरत्न व्हायचे, हा विचार तरुण पिढीने आणि अभियंत्यांनी या निमित्ताने अवश्य करावा.


म्हैसूरचे दिवाण झाल्यानंतर विश्वेश्वरय्यांना त्यांच्या एका नातेवाइकाने विदेशातून आणलेली एक काठी भेट दिली. ‘मी ज्या पदावर काम करतो त्या पदावरून अशा विदेशी भेटी घेतल्या तर समाजात चुकीचा संदेश जाईल’, असे म्हणत त्यांनी ती भेट नम्रपणे नाकारली. बळजबरीने पैसे मागणारे आजचे भ्रष्ट अधिकारी पाहिले की, विश्वेश्वरय्यांचा नम्रपणा अधिकच उठून दिसतो. माणूस मोठा का होतो, याची कारणे अभियंत्यांच्या भावी पिढीने अशा घटनांतून समजून घेतली तरी देशात चांगलं काही घडायला सुरुवातहोईल. आयुष्य जगायला पैसा अवश्य लागतो. जो पैसा सुख व समाधान देतो तो चांगल्या मार्गाने अवश्य कमवावा. चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा असंख्य आजार, ताणतणाव, बदनामी व तुरुंगवास अवश्य देतो. सुरेश कलमाडी, सुरेश जैन, सतीश चिखलीकर अशा अनेक घटना व प्रसंगांतून हे वारंवार सिद्ध होत आले आहे.


एका बैठकीसाठी विश्वेश्वरय्या एकदा विदेशात गेले होते. बैठकीचे गाव बरेच दूर असल्याने त्या गावाच्या जवळ असलेल्या दुस-या गावी विश्वेश्वरय्या मुक्कामाला आदल्या दिवशी जाऊन राहिले. दुस-या दिवशी सकाळी उठून बैठकीच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावे म्हणून ते रेल्वेस्टेशनवर गेले. तेथे त्यांना त्या दिवशीची गाडी रद्द झाल्याचे कळले. त्यामुळे बैठकीला वेळेत पोहोचणे अशक्य झाले. शिवाय या बैठकीत विश्वेश्वरय्यांना भेटायला इतरही काही देशांचे प्रतिनिधी येणार होते. अस्वस्थ झालेल्या विश्वेश्वरय्यांनी तडक स्टेशनमास्टरचे कार्यालय गाठले आणि अतिशय ठाम व कणखर भाषेत त्याला त्यांनी सांगितले, की ‘तुमची गाडी ऐन वेळेला रद्द झाल्याने मी बैठकीला वेळेत पोहोचू शकत नाही. त्या बैठकीत मला भेटायला इतरही काही देशांचे प्रतिनिधी येणार आहेत. अशा महत्त्वाच्या बैठकीला मी वेळेत न पोहोचणे हा माझ्या देशाचा अपमान आहे व त्याला तुम्ही जबाबदार आहात. तसेच बैठकीच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी आता मला भाड्याने स्वतंत्र गाडी करावी लागली तर त्यासाठीचा खर्च हा माझ्या देशाच्या तिजोरीवर तुमच्यामुळे पडलेला अतिरिक्त बोजा असेल. सबब तुम्ही तुमच्या खर्चाने मला बैठकीच्या ठिकाणी पोहोचवा अथवा रद्द केलेली गाडी सुरू करा.’ विश्वेश्वरय्यांचा हा बाणेदारपणा व देशाभिमान पाहून फक्त त्यांच्यासाठी इंजिन व केवळ एक डबा असलेली विशेष गाडी त्यांना वेळेत त्यांच्या नियोजित स्थळी सोडण्यासाठी पाठवण्यात आली! याला नैतिक शक्ती म्हणतात! ही नैतिक ताकद का व कोठून येते, याचे चिंतन आजच्या सर्व अभियंत्यांनी करणे गरजेचे आहे.

मंत्री अथवा आपले वरिष्ठ जर अनैतिक व चुकीच्या गोष्टी करत असतील तर त्यांना ठामपणे नकार देण्याइतपत नैतिक शक्ती आजच्या किती अभियंत्यांकडे आहे? व ही शक्ती त्यांच्याकडे का नाही, याचे चिंतन होणे आवश्यक. विश्वेश्वरय्यांनी कधीही चुकीचे व अनैतिक काम केले नाही, शासनाची व पर्यायाने जनतेची प्रतारणा केली नाही आणि आपल्या कामावरील निष्ठा व त्यातून आलेली जबाबदारी आणि उत्तरदायित्व यासाठी ते नेहमी बांधील राहिले. आजचे अधिकारी ठामपणे असा नकार देऊ शकतील काय? भ्रष्ट पुढारी, त्यांना पैसे पुरवण्यासाठी निर्माण झालेल्या भ्रष्ट अधिका-यांची फळी, गुणवत्तेशी तडजोड करून भ्रष्ट अधिका-यांना पैसे चारणारे ठेकेदार, अशी ही साखळी थांबवायची असेल तर काय करता येईल, याचे चिंतन होणे आवश्यक आहे. कारण अशा भ्रष्टाचारामुळे निकृष्ट कामे, जनतेशी प्रतारणा, कर्तव्यदक्ष अधिका-यांची कुचंबणा, जनतेच्या पैशांवर गब्बर होणारे पुढारी व भ्रष्ट अधिकारी अशा सा-या गोष्टी घडतात.


यावर एक प्रभावी उपाय म्हणजे, गावागावातून आता सामाजिक संस्था, मित्रमंडळे, अशासकीय संस्था यांनी शासकीय अधिका-यांनी केलेल्या प्रत्येक निकृष्ट कामाविरुद्ध कनिष्ठ अभियंता ते त्या खात्याचा सचिव यांच्या पगारातून या कामाचा खर्च वसूल करण्यासाठी खटले दाखल करावे. समजा पाच कोटीचा एक रस्ता काही महिन्यांत खराब झाला व त्यासाठीचा हा खर्च अधिका-यांकडून वसूल झाला तर त्यानंतर गुणवत्तेवर नियंत्रण येऊन अधिका-यांचे उत्तरदायित्व सिद्ध होईल. स्वत:च्या खिशाला झळ पोहोचल्याशिवाय भ्रष्टाचार कमी होणे अशक्य आहे.
शासकीय बदल्यांचे अधिकार पुढारी व मंत्री यांच्याकडून काढून घेऊन त्यात पारदर्शकता येण्यासाठी ते लॉटरी पद्धतीने सर्वांसमक्ष सोडत काढून केले तरी भ्रष्टाचाराला मोठा आळा बसेल. 20-25 लाखांपर्यंतची रक्कम बदलीसाठी देणारा अधिकारी भ्रष्टाचार करणार नाही तर काय करेल? म्हणून बदल्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता येणे आवश्यक आहे.


विश्वेश्वरय्यांनी शहरांची रचना, नियोजन व बांधणी केली. धुळे शहर हे त्याचे उदाहरण आहे. त्यांनी धरणाचे व त्यांच्या दरवाजांचे संकल्पन (डिझाइन) केले. खडकवासला व म्हैसूरचे वृंदावन गार्डन व धरण हे त्याचे उदाहरण आहे. त्यांनी पाणीपुरवठ्याच्या योजना, रस्ते, उद्योगधंदे व स्थापत्य अभियांत्रिकीचे अनेक प्रकल्प स्वत: डिझाइन करून प्रत्यक्षात अंमलात आणले.
आज महापालिकेच्या वा शासनाच्या कोणत्याही अभियंत्याला फ्लायओव्हर, रस्ते, धरण, पाण्याच्या टाक्या, बहुमजली इमारती वा स्थापत्य अभियांत्रिकी प्रकल्पांचे कोणते डिझाइन येते ते विचारून पाहावे. अभियांत्रिकी व तांत्रिक कामापासून फारकत झाल्यापासून ते केवळ कारकून बनले आहेत. पैसे गोळा करणे, हडप करणे, वर पोहोचवणे यातच त्यांची कारकि र्द जाऊ लागल्याने त्यांच्या पदवीचा व अभियांत्रिकी ज्ञानाचा समाजाला काहीही उपयोग नाही. निदान कनिष्ठ अभियंते तरी बिलासाठी का होईना; पण थोडेफार तांत्रिक काम करतात, त्यावरची फळी तर इंजिनिअरिंगच विसरली आहे.


विश्वेश्वरय्या व आजचे अभियंते यांच्यात हा फरक आहे. भ्रष्टाचार व कामाच्या गुणवत्तेत तडजोड यामुळे निर्माण होणारे ताणतणाव, पैशाचे व्यवहार व त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न या सा-यांचा परिणाम म्हणून बहुसंख्य अभियंत्यांना कमी वयात मधुमेह, रक्तदाब व हृदयरोग अशा विकारांनी ग्रासले आहे. विश्वेश्वरय्या 101 वर्षे निरोगी जगले. वयाच्या शंभराव्या वर्षीही ते साइटवर उत्साहाने जात. चिखलीकरांनी घालून दिलेले उदाहरण डोळ्यापुढे असताना सर्व अभियंत्यांनी, किमान तरुण पिढीने विश्वेश्वरय्यांचा मार्ग अनुसरला तर याही चिखलातून कमळ उगवू शकते, याची खूणगाठ मनाशी बांधणे आवश्यक आहे. आपल्या कारकि र्दीचा शेवट तुरुंगात करण्याऐवजी तिची वाटचाल ‘भारतरत्न’ बनण्याच्या दिशेने होण्यासाठी विश्वेश्वरय्यांचे स्मरण करणे, ही आज काळाची गरज आहे.