आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune based Jasraj Joshi Wins Sa Re Ga Ma Pa 2012

काळजाला हात घालायचाय...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेजमध्ये असताना सारेगमपच्या ऑडिशन स्टेजलाच नाकारला गेलेला जसराज जोशी आज सबंध महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि विदेशातल्या संगीतप्रेमींच्या तोंडचे नाव झाला आहे...अर्थातच यामध्ये त्याच्या गाण्याचं मॅजिक आहेच...पण 10-12 वर्षांचा अव्याहत स्ट्रगलही आहे. रॉकस्टार जसराजशी साधलेला हा सूरसंवाद...

जसराज, मुळात तू थोडा विसरभोळा आहेस, असं तुझ्या मित्रांचं आणि घरच्यांचं म्हणणं आहे... हे आत्ता मिळालेलं घवघवीत यश तरी तुझ्या लक्षात आहे ना?
- अर्थातच... हे विसरता येणं शक्यच नाहीए... कारण एक स्पर्धा... मोठं व्यासपीठ... असं असलं तरी इतक्या वर्षांचे प्रयत्न, गेल्या चार महिन्यांत घरच्यांपासून, बायकोपासून दूर राहून केलेल्या या स्ट्रगलचा हा गोड शेवट आहे. त्यामुळे तो कायम लक्षात राहील हे नक्की!
खरंय, चार-साडेचार महिन्यांचा प्रवास, शूटिंग, रिहर्सल, हे सगळं सांभाळून गळा शाबूत ठेवायचा म्हणजे अवघड काम... कधी असं झालं नाही का रे की गळ्याने दगाच दिला...?
- झालं ना... मला आठवतंय... एका राउंडला अजय-अतुल परीक्षक म्हणून आले होते... मराठी आणि त्यातून पुण्याचे असल्याने जोरदार गावं, अशी माझी इच्छा होती. पण तब्येत खराब होती. आवाजही पार बसला होता. कसंबसं ‘सिंघम’ रेटलं... पार निराश झालो होतो. असं वाटलं, सगळं सोडून जावं परत पुण्याला. पण तेव्हा घरच्यांनी, विशेषत: माझ्या बायकोने, विनीने खूप समजावलं. पुन्हा रियाझ केला आणि दुस-या दिवशीचं ‘पिया हाजी अली’ फक्कड जमलं. सगळ्यांनी कौतुक केलं... हायसं वाटलं...
तुझी व्हरायटी आणि तुझ्या फ्यूजन गाण्यांनी सगळ्यांनाच वेड लावलं होतं... ही सगळी गाणी मेंटॉर्ससकट सगळ्यांनीच डोक्यावर घेतली. तुझा या कॉम्पिटिशनमधला सगळ्यात यादगार परफॉर्मन्स कुठला?
- (विचार करून) ‘सतरंगी रे’...सारेगमपचे टॉप 15 जेव्हा सादर करण्यात आले, त्या एपिसोडमध्ये मी गायलो होतो... माझं खूप आवडतं गाणं...रेहमानचे अद्वितीय सूर...आणि माझं थोडंबहुत व्हेरिएशन...भट्टी मस्त जमून आली...
शंकर महादेवन तर एकदम फिदा झाले होते, तुझ्यावर...
माझं भाग्य म्हणून मला ते मेंटॉर म्हणून मिळाले. त्यांच्या आवाजाचा आणि संगीताचा मी लहानपणापासून फॅन... त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं... पाश्चात्त्य आणि क्लासिकलचा मिलाफ असलेलं ‘फ्यूजन’ पण त्यांच्यामुळेच अंगात भिनलं... पुढे जाऊन त्यांच्यासारखं गायक-संगीतकार बनावं अशीच इच्छा आहे...
आणि तुझ्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल काय सांगशील?
- ते नुसते सेटवर प्रतिस्पर्धी... प्रत्यक्षात आम्ही सगळे जण छान मित्र झालो होतो. प्रत्येकाची खासियत वेगळी... प्रत्येकाचा जॉनर वेगळा... सगळे एकत्र राहायचो... रियाझ करायचो... अमानची जबरदस्त तयारी... जाझिमचा मखमली आवाज आणि त्याची झुळझुळणारी पेटी... आणि लाहोरचा नवाबी झैन... पठ्ठ्यानं सगळ्यांशी मैत्री केली... मोठा दिलदार माणूस...!
थोडंसं बालपणाकडे वळूया... संगीताशी गट्टी कशी काय जमली?
- आजोबा श्यामराव कुलकर्णी नावाजलेले गायक. त्यांच्याकडेच सुरुवातीचे धडे घेतले. नंतर मग कै.पं.गंगाधरबुवा पिंपळखरे, शेखर कुंभोजकर, राजेंद्र कंदलगावकर अशा नावाजलेल्या गुरूंकडे शिकलो. मुळात लहानपणी क्लासिकल गायची इच्छा होती; पण जाणकारांनी सांगितलं की आवाज क्लासिकलसाठी योग्य नाही. म्हणून मग हळूहळू सॉफ्टकडे वळत गेलो. पण ती गाणी सादर करण्याची माझी एक स्टाइल डेव्हलप केली... मग कॉलेज, कॉम्पिटिशन सगळं सुरू झालं...
आणखी कुठले महत्त्वाचे टप्पे वाटतात..ज्यांनी एक वेगळी दिशा दिली...?
- कॉलेजमध्ये असताना सारेगमची ऑडिशन पहिल्यांदा दिली... सिलेक्ट होता होता रिजेक्ट झालो. निराश झालो होतो; पण मग आणखी जोमाने कामाला लागलो. नवी गाणी कंपोझ केली. ‘शून्य’ नावाचा बँड तयार केला. ‘लंबाडा’ नावाच्या बँडबरोबर गाऊ लागलो. या सगळ्या काळात माझ्यातील गायक-संगीतकार अधिकाधिक परिपक्व झाला. त्यामुळे त्या रिजेक्ट झालेल्या ऑडिशनचे आभार मानले पाहिजेत. त्या रिजेक्शनमुळे हे सगळं कमावलं. सिलेक्ट झालो असतो तर वेगळंच काहीतरी घडलं असतं. त्यानंतर जवळपास 10 वर्षांनंतर शेवटचा प्रयत्न म्हणून मागच्या वर्षीची ऑडिशन दिली...आणि जिंकलोच एकदम...!
जसराज, सारेगमपमधली तुझी बहुतांश गाणी ठेका बदलल्याने... अंदाज बदलल्यामुळे किंवा फ्यूजन केल्यामुळे लोकांना आवडली...हे गिमिक का जाणीवपूर्वक?
- जाणीवपूर्वक...मला मुळातच कंपोझ करायची आवड...त्यामुळे स्पर्धेत सादर केलेलं एकही गाणं जसंच्या तसं म्हणणार नाही, असा चंगच बांधला होता. त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. शंकरजी मेंटॉर असल्याने त्यांनी फ्यूजनसाठी कायम प्रोत्साहन दिलं...त्यामुळेच माझी गाणी वेगळी ठरली...
तुझ्या दाढीचे... तुझ्या कपड्यांचे एकूण स्टाइलचे कोण कौतुक सगळ्यांना!
(हसून) मी खरं तर नेहमीचाच होतो... नेहमीसारखा... माझे मित्र सांगू शकतील...कॉलेजमध्येही असा वेगळाच राहायचो...काहीबाही कपडे घालायचो... माझा मोठा भाऊ जशन.. माझा स्टाइल आयकॉनच म्हणा ना... त्याला दाढीचे वेगवेगळे प्रकार करायची फार खोड. त्याचं पाहून मीही करायला लागलो. त्याचेच ब्रँडेड कपडे, बूट घालून मिरवायचो. त्यामुळे खरं सांगायचं तर ‘सारेगमप’मधली माझी स्टाइल म्हणजे, माझ्या कॉलेजच्या दिवसातील स्टाइलचं एक्स्टेंशन अर्थातच बरंचसं ग्लॅमरस...
आता पुढे काय... आता आणखी कसा जसराज ऐकायला मिळेल?
- असाच ओरिजिनल...! ‘सारेगमप’चं यश हळूहळू पचतंय...याचा नक्कीच फायदा होणार आहे. जास्तीत जास्त लोकांच्या काळजाला भिडेल असं गाणं गायचंय. ‘शून्य’ या आमच्या बँडला खूप मोठ्या पातळीवर न्यायचंय आणि एक उत्तम गायक आणि कंपोझर म्हणून नावारूपाला यायचंय...
swanandk85@gmail.com